Headlines

Nitin Navin: काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या शोकसभेला भाजप खासदारांची उपस्थिती; नेतृत्त्वाकडून जोरदार कानउघाडणी


काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या शोकसभेला उपस्थित राहिलेल्या भाजपच्या खासदारांची पक्ष नेतृत्त्वानं जोरदार कानउघाडणी केली आहे. नेतृत्त्वाकडून त्यांना समज देण्यात आली आहे.

modi and navin
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: काँग्रेसचे दिग्गज नेते सज्जन कुमार यांच्या शोकसभेला गेलेल्या भाजपच्या खासदारांची पक्ष नेतृत्त्वानं कानउघाडणी केली आहे. भाजपचे तीन खासदार काँग्रेसचे दिवंगत नेते सज्जन कुमार यांच्या शोकसभेला गेले होते. त्यांना पक्ष नेतृत्त्वाकडून सुनावण्यात आलं आहे. सज्जन कुमार यांचं २० ऑगस्टला दिल्लीत निधन झालं. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या शोकसभेला भाजपचे तीन खासदार पोहोचले होते.

भाजप खासदार कमलजीत सहरावत, रामवीर सिंह बिधुडी आणि योगेंद्र चंदौलिया काँग्रेसचे दिवंगत नेते सज्जन कुमार यांच्या शोकसभेला उपस्थित राहिले होते. शीख विरोधी दंगलीत सज्जन कुमार दोषी ठरले होते. त्या प्रकरणात त्यांना न्यायालयानं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. हीच शिक्षा भोगत असताना सज्जन कुमार यांचा मृत्यू झाला.

शीख विरोधी दंगलीतील दोषी सज्जन कुमार यांच्या शोकसभेला भाजपचे तीन खासदार उपस्थित राहिले. याबद्दल भाजपचे वरिष्ठ नेते आणि शीख दंगल पीडितांसाठी न्यायालयीन लढा देणारे वकील एच. एस. फुल्का यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. ‘तिन्ही खासदारांच्या बहिष्काराची मागणी केली होती. शीख विरोधी दंगलीच्या पीडितांना न्याय मिळावा आणि शीखांचा मारेकरी तुरुंगात राहावा याची काळजी भाजपनं नेहमीच घेतली आहे. दंगल पीडितांबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असायला हवी. ते आजही त्या काळ्या आठवणी सोबत घेऊन जगत आहेत,’ असं फुल्का यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शीख विरोधी दंगलीत दोषी आढळून आलेल्या, त्याच प्रकरणात शिक्षा भोगताना जीव मरण पावलेल्या सज्जन कुमार यांच्या शोकसभेला भाजपचे तीन खासदार पोहोचल्याबद्दल फुल्का यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला.

सज्जन कुमार यांना आदर्श म्हटल्यानं काँग्रेस चे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा काही दिवसांपूर्वीच अडचणीत आले होते. त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे काँग्रेसमधूनच ही मागणी झाली. हरियाणा विधानसभेचे माजी अध्यक्ष कुलदीप शर्मा यांनी या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहिलं होतं.