Headlines

Nepal Flash Flood : नेपाळमध्ये महापूर! हजारहून अधिक लोक गेले वाहून, घर पत्त्यांसारखे कोसळले


Nepal Flash Flood : नेपाळमध्ये बुधवारी आलेल्या पुरामुळे नदीच्या सीमावर्ती भागातील वस्त्याचा मोठा नुकसान झाला आहे. हजारहून अधिक लोक वाहून गेले आहे. अद्याप मृत्यूचा आकडा स्पष्ट झालेला नाही आहे. घरे देखील कोसळले आहे. या अचानक आलेल्या महापुराचा कारण हवामान विभाग आणि हाइड्रोलॉजी डिपार्टमेंट शोधात आहे.

nepal flash flood
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नेपाळ: तिबेटमधून नेपाळमध्ये आलेल्या पुराने रौद्ररूप घेतलं आहे. आज सकाळी रसुवा जिल्ह्यात भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे हजारोंहून अधिक लोक वाहून गेले तर घर पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. अनेक नदीकाठच्या वस्तींचं नुकसान झालं आहे. नेपाळने बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टर्स पाठवले आहे. आज बुधवारी आलेल्या या पुरात मृत्यू, जखमी आणि मालमत्तेच्या नुकसानीची अधिकृत आकडेवारी प्रशासनाने जाहीर केलेली नाहीय. परिस्थितीची गंभीरता बघता जवळपासच्या पाच जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी केलं आहे.

‘ग्लेशियल लेक आउटबर्स्ट’

प्राथमिक माहितीनुसार, उत्तरी रसुवामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. विशेषतः तिमुरे बाजार परिसर, तिमुरे कस्टम ऑफिस आणि स्याब्रुबेसीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जिल्हाधिकारी नुकसान झालेल्या भागाची विस्तृत माहिती गोळा करत आहे. हाइड्रोलॉजीच्या तज्ञांचं म्हणणं आहे की, पाण्याचा अचानक प्रवाह स्थानिक पावसाचं कारण नाही तर तिबेटमध्ये ‘ग्लेशियल लेक आउटबर्स्ट’ महापूर म्हणजे ग्लेशियर सरोवर फुटल्यानं आलं आहे. या नैसर्गिक आपत्तीत 1000 हून अधिक लोक वाहून गेले आहेत. उत्तरगया ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्ष चमेली गुरुंग यांच्या म्हणण्यानुसार, स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांती बाजार, परेबेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तर या वस्त्यांना पुरामुळे मोठा फटका बसला आहे.

महापुराच्या कारणाचा तपास सुरु

हवामानशास्त्र विभाग आणि हाइड्रोलॉजी डिपार्टमेंट हे स्थानिक प्रशासकीय कार्यालयांसोबत मिळून चिनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. या पुराचं मूळ स्थान कोणतं हे माहिती करण्यासाठी उपग्रह डेटाची पडताळणी करत आहे. नेपाळ आपदा व्यवस्थापन अधिकारी बाधित परिसरातील रहिवाशांना तत्काळ सुरक्षा उपाय करण्याचा सल्ला दिला आहे.

रसुवाचे मुख्य जिल्हाधिकारी काय म्हणाले?

पुराचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जिल्हा मुख्यालय आणि आसपासच्या परिसरात पाऊस झालेला नाही. वरच्या भागातील धरण फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असावा, असा संशय असल्याचं काठमांडूमधील रसुवाचे मुख्य जिल्हाधिकारी नरेंद्र परियार यांनी सांगितलं. पुढे ते म्हणाले की, ‘बचावकार्य सुरु आहे, पुरात अडकलेल्या लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून येत आहे. पण मी आताच काही स्पष्ट सांगू शकत नाही.

महापुराची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुराच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्थानिक नागरिकांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय. तर हजारहून अधिक लोक या महापुरात वाहून गेल्याची भीती आहे. नदीकाठच्या अनेक वस्त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हेलिकॉप्टर्स बचावकार्य करण्यासाठी पाठवण्यात आले होते. मात्र पूर बाधित भागात पाणी असल्याने हेलिकॉटर्स खाली उतरू शकले नाहीत, असं लष्कराचे प्रवक्ते राजाराम बस्नेत यांनी म्हटलं आहे.

भारतातील सीमावर्ती भागाला सतर्क राहण्याचा इशारा

नेपाळमधील आलेल्या पुराने त्रिशुला नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाढ होत आहे. हीच नदी पुढे नारायणी नदीला जाऊन मिळते. भारतात प्रवेश केल्यानंतर याच नदीला गंडक म्हणून ओळखलं जात. त्यामुळे भारतातील सीमावर्ती भागातील परिस्थितीवरही नियंत्रण ठेवणं अतिमहत्वाचं आहे. विशेषतः बिहारमधील नागरिकांनाही प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा