Headlines

NEET Protest Turns Into Love Story Student Returns Home Married Video Viral | पोलिसांनी डोकं फोडलं अन् ती तरुणाच्या प्रेमात पडली, आंदोलन करायला दिल्लीत गेला अन् लग्न करून आला, व्हिडीओ झाला व्हायरल


Student Finds Love at Jantar Mantar During NEET Protest: दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट आंदोलनादरम्यान एका तरुणाची आणि तरुणीची ओळख होऊन पुढे त्यांचं लग्न झाल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर नेटकरी सुद्धा विविध प्रकारच्या मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

NEET Protest Viral Video
(फोटो सौजन्य – pmbiharicomedy2/Instagram)
नीट पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. या आंदोलनाचे पडसाद मुंबई, पुणे, बेंगळुरू, पटना, अहमदाबाद अशा देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये उमटताना तुम्हीही पाहिले असतील. पाहता पाहता हे आंदोलन इतकं मोठं झालं की, शेवटी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण या विद्यार्थी आंदोलनाचा वेगळाच फायदा एका तरुणाने घेतला. तो दिल्लीमध्ये आंदोलनासाठी गेला होता, पण थेट लग्न करूनच आपल्या घरी परतला. प्रशासनाविरोधात घोषणा देता देता तो एका तरुणीच्या प्रेमात पडला आणि आंदोलन संपता संपता तिच्यासोबत लग्न करून घरी परतला. या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी म्हणत आहेत, प्रोटेस्टचा खरा फायदा तर याच तरुणाने घेतला आहे.

हा व्हिडीओ होतोय व्हायरल

​ ​

वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या तरुणाने संपूर्ण किस्सा सांगितला. तो म्हणाला, “मी १५ दिवस दिल्लीमध्ये आंदोलन करत होतो. त्यावेळी आमची ओळख झाली आणि पुढे त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं.” त्याची पत्नी ही मूळची दिल्लीचीच रहिवासी आहे. जंतर-मंतरच्या परिसरात तिचं घर आहे. तिनेही नीटची परीक्षा दिली होती. त्यामुळे ती दररोज आंदोलनात सहभागी होण्यासाठी यायची. येताना ती त्या तरुणासाठी घरून विविध खाद्यपदार्थही आणायची.

आंदोलन सुरू असताना पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये तरुणाच्या डोक्याला दुखापत झाली. त्यावेळी याच तरुणीने हॉस्पिटलमध्ये त्याची देखभाल केली. दरम्यान, दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि पुढे त्यांनी लग्न केलं.

नेटकरी घेत आहेत फिरकी

तरुणाने सांगितलेली गोष्ट किती खरी आणि किती खोटी, हे सांगणं कठीण आहे. कारण अनेकदा प्रसिद्धीसाठी लोक वेगवेगळे दावे करत असतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ तुम्हीही पाहिले असतील. मात्र, या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणत आहे, “प्रोटेस्टचा खरा फायदा याच तरुणाला झाला.” तर कोणी म्हणत आहे, “प्रोटेस्ट ने बना दी जोडी.” काही जण दोघांचं अभिनंदनही करत आहेत. असो, या प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा