Headlines

५ दिवसांच्या आठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांची निदर्शने:छत्रपती संभाजीनगरात युनायटेड फोरमच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन




छत्रपती संभाजीनगर येथे बँक कर्मचाऱ्यांनी ५ दिवसांच्या आठवड्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली बुधवारी जालना रोडवरील बँक ऑफ इंडिया कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. कामाचा ताण, मानसिक आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात संतुलन राखण्यासाठी ही मागणी तात्काळ मान्य करावी, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. या आंदोलनात शहरातील विविध बँकांचे शेकडो कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. यामध्ये महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. ‘आयबोक’चे (AIBOC) कॉम्रेड अमोल गायके यांनी आंदोलनाला संबोधित करताना सांगितले की, शनिवार आणि रविवारची सुट्टी ही ‘लक्झरी’ नसून मानसिक आणि शारीरिक ऊर्जेसाठी अत्यंत गरजेची आहे. बँकिंग क्षेत्रातील सुमारे ९० टक्के कर्मचारी व अधिकाऱ्यांची कुटुंबे मूळ गावी किंवा दुसऱ्या शहरात राहतात, ज्यामुळे त्यांना ताण येतो. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे अनेक अधिकारी रात्री उशिरापर्यंत काम करत आहेत. इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) गेल्या १५ वर्षांपासून पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी तत्त्वतः मान्य केली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून याला अद्याप हिरवा कंदील मिळाला नसल्याने बँक कर्मचाऱ्यांना पुन्हा आंदोलनासाठी रस्त्यावर उतरावे लागले असल्याचे गायके यांनी स्पष्ट केले. एनसीबीई (NCBE) चे ललित निकुंभ यांनी सांगितले की, बँकिंग क्षेत्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि कर्मचारी या क्षेत्राची ताकद आहेत. २०११ पासून आम्ही पाच दिवसांच्या आठवड्याची मागणी करत आहोत. कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचे जॉइंट सेक्रेटरी व ग्रामीण बँकेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड कैलास कानडे यांनी सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमुळे बँक कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या ताणावर भर दिला. सततच्या कामामुळे कर्मचारी मानसिकदृष्ट्या थकतात, त्यामुळे ‘वर्क-लाईफ बॅलन्स’ राखण्यासाठी ५ दिवसांचा आठवडा लागू करणे हाच पर्याय असल्याचे ते म्हणाले. सेंट्रल बँकेचे व महाराष्ट्र स्टेट बँक सेक्रेटरी राहुल साळुंखे यांनी समारोपाचे भाषण केले आणि तरुण कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. कॉम्रेड राजेंद्र देवळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर कॉम्रेड प्रणव कोशिके यांनी आभार प्रदर्शन केले. या निदर्शनांमध्ये सचिन देशपांडे, पियुष बिराडे, मारुती निकम यांच्यासह जवळपास २०० हून अधिक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत