त.भा. प्रतिनिधी
नाशिक जिह्यांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यात आज सकाळी एकापाठोपाठ चार धक्के बसले, तर पालघर जिह्यातही भूकंपाचे सत्र कायम असल्याचे पाहायला मिळाले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि आसपासच्या परिसरात शनिवारी सकाळी 9.55 वाजल्यापासून भूकंपाचे चार सौम्य धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 नोंदवली गेली आहे.
एकापाठोपाठ एक अशा चार वेळा जमिनीला हादरे बसल्यामुळे बोरगाव परिसरातील ग्रामस्थ आणि नागरिक घराबाहेर पडले. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कुठलेही नुकसान झालेले नाही. जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अजिबात घाबरू नये, सतर्क राहावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
