‘जन नेता’ अभिनेते नंदामुरी बालकृष्ण यांच्या २०२३च्या ‘भगवंत केसरी’ या तेलुगू चित्रपटच्या कथाबीजावर उभा आहे. यात भावनिक नाट्य, राजकीय भाष्य, अॅक्शन आणि ‘स्टारपूजे’चा मेळ आहे. कथा थलपती वेत्री कोंडन (सी. जोसेफ विजय) या माजी पोलिस अधिकाऱ्याभोवती फिरते. कर्मधर्म संयोगानं त्यानं बैजू) या आपल्या मुलीवर संकट कोसळतं. या संकटाचा सामना करताना त्याची गाठ आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यापारी जॉन हिमलरशी (बॉबी देओल) पडते; विविधांगी प्रश्नाची सरबत्ती सुरू होते. सिनेमाची सुरुवात नाट्यमय आहे. तुरुंगातील अॅक्शन, विजयची दमदार एंट्री आणि त्याच्या व्यक्तिरेखेभोवती उभा केलेला करिष्मा प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो. मात्र त्यानंतर चित्रपट अचानक आफ्रिकेतील युद्ध, पाकिस्तानमधील दहशतवाद, ड्रोन हल्ले, रोबोटिक्स, जागतिक कटकारस्थानं आणि भारतीय लोकशाहीवरील हल्ल्यांच्या दिशेनं सरकतो… नव्हे भरकटतो! कथा एका भावनिक नात्यापासून सुरू होते आणि काही वेळातच व्हिडीओ गेमच्या पातळीवरील काल्पनिक युद्धपटात रूपांतरित होते. हा पटकथेचा प्रवास इतका विस्कळीत आहे, की चित्रपट नेमका काय सांगू इच्छितो, याचाच विसर पडतो.
दिग्दर्शक एच. विनोद यांनी ‘भगवंत केसरी’च्या भावनिक गाभ्याला राजकीय थ्रिलरचं आवरण देण्याचा प्रयत्न केलाय. कागदावर ही कल्पना आकर्षक वाटते; मात्र पडद्यावर दोन वेगवेगळे चित्रपट जबरदस्तीनं जोडल्यासारखे वाटतात. तसंच व्हिएफएक्स, सीजीआयचं काम सुमार आहे. तीन वर्षं निर्मितीत असलेल्या मोठ्या बजेटच्या चित्रपटाकडून अपेक्षित असलेली तांत्रिक गुणवत्ता येथे दिसत नाही. तीन तासांचा प्रदीर्घ कालावधीही चित्रपटाला मारक ठरतो अभिनयाच्या बाबतीत विजय संपूर्ण चित्रपट स्वतःच्या खांद्यावर पेलण्याचा प्रयत्न करतो. त्याची स्टारपॉवर, पडद्यावरील राजेशाही थाट आणि काही भावनिक प्रसंगांतील संयत अभिनय हेच चित्रपटाचं खरं बळ आहे. विशेषतः ममिता बैजू हिच्याबरोबरच्या प्रसंगांत विजयमधला ‘हिरो’ न दिसता त्याच्यातला हळवा अभिनेता पाहायला मिळतो. मात्र चित्रपट सतत त्याला माणूस म्हणून नव्हे, तर देवत्वप्राप्त नेता म्हणून सादर करण्याचा हट्ट धरतो. प्रत्येक पात्र, उपकथा आणि अॅक्शन प्रसंगाचा उद्देश एकच दिसतो; विजयची प्रतिमा विराट बनवणं, हीच चित्रपटाची मोठी चूक आहे. ‘घिली’, ‘ननबन’ किंवा ‘थेरी’मध्ये विजय आधी माणूस आणि नंतर नायक होता; ‘जन नेता’ मध्ये मात्र आधी ‘पुतळा’ उभारला जातो आणि मग त्यात माणूस शोधण्याचा प्रयत्न केला जातो. सहकलाकार म्हणून पूजा हेगडे, प्रकाश राज आणि गौतम वासुदेव मेनन यांना फारसा वाव नाही. अनिरुद्ध रविचंदरचे पार्श्वसंगीत काही दृश्यांना उभारी देते; मात्र कमकुवत लेखनाला संगीतही वाचवू शकत नाही.
‘जन नेता’चा सर्वात गंभीर दोष म्हणजे त्याचा राजकीय दृष्टिकोन नव्हे, तर त्यातील कथनकातील बारकाव्यांचा अभाव. बरं, सिनेमा पाहताना मधेच शाहरुख खानच्या ‘जवान’ सिनेमाची आठवणही होते. लोकशाही, सत्तेचा गैरवापर आणि जनतेसाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज यांसारखे मुद्दे चित्रपट मांडतो; पण ते कथेतून उलगडत नाहीत, तर प्रचारसभेतील भाषणांसारखे थेट कानावर आदळतात. थिएटरमध्ये टाळ्या, जल्लोष नक्कीच कानी पडतात; पण तो उत्साह ओसरल्यानंतर ‘जन नेता’ सिनेमा म्हणून पोकळ वाटतो. प्रेक्षकांचा लाडका थलपती विजय हा एक उत्तम अभिनेता आहे! त्यात सिनेकारकिर्दीतील त्याचा हा शेवटचा पट; परंतु तो ‘सिनेमा’ म्हणून अधिक कल्पक, प्रगल्भ, सिनेमॅटिक असायला हवा होता.
सिनेमा जन नेता (जन नायकन)
दिग्दर्शक, पटकथा : एच. विनोद
कथा: अनिल रवीपुडी
कलाकार: सी. जोसेफ विजय, ममिता बैजू,
बॉबी देओल, पूजा हेगडे, प्रकाश राज
छायांकन : सत्यन सूर्यन
संकलन : प्रदीप राघव
दर्जा: अडीच स्टार
