Nanded Krishna Patil Ashtikar : आज नियोजन भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. भाजपच्या अमर राजुरकर यांना 339 मते मिळाली, कृष्णा आष्टीकर यांना 84 मते आणि वंचितचे प्रशांत इंगोले यांना केवळ 5 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे अमर राजुरकर यांनी निवडणूक जिंकून हॅट्रिक साधली आहे.

शेवटच्याक्षणी पक्षाच्या आदेशामुळे माघार
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण 452 नगरसेवक मतदारांपैकी 451 जणांनी मतदान केले. महाविकास आघाडीकडून कृष्णा पाटील आष्टीकर, महायुतीकडून अशोक चव्हाण यांचे विश्वासू अमर राजुरकर आणि वंचितकडून नगरसेवक प्रशांत इंगोले हे निवडणुकीच्या रिंगणात होते. सुरुवातीपासून नांदेडची निवडणूक चर्चेची ठरली होती. काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलेल्या रामदास पाटील सोमठाणकर यांना शेवटच्या क्षणी पक्षाच्या आदेशामुळे माघार घ्यावी लागली. तर अपक्ष अर्ज दाखल केलेल्या खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील यांना महाविकास आघाडीकडून पुरस्कृत उमेदवार जाहीर करण्यात आले.
Gokul Gite : नाशकात शिंदेसेनेचा गेम, अपक्ष गोकुळ गितेंचा विजयाचा गुलाल; पराभवानंतर शिंदेंची नवी खेळी, एका फोनवर बाजू पालटणार?
दरम्यान, आज नियोजन भवन येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. भाजपच्या अमर राजुरकर यांना 339 मते मिळाली, कृष्णा आष्टीकर यांना 84 मते आणि वंचितचे प्रशांत इंगोले यांना केवळ 5 मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे अमर राजुरकर यांनी निवडणूक जिंकून हॅट्रिक साधली आहे. 2010 मध्ये काँग्रेसमध्ये असताना त्यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर 2016 मध्ये 43 मतांनी विजय मिळवला होता. दरम्यान, अमर राजुरकर पहिल्यांदा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आजच्या विजयानंतर भाजपकडून जल्लोष करण्यात आला.
‘ऑपरेशन टायगर’चा आष्टीकरांना फटका
काँग्रेसकडे 92 संख्याबळ असताना 19 संख्याबळ असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला नांदेडची जागा सुटली. त्यामुळे उमेदवारी दाखल केलेल्या काँग्रेसचे रामदास पाटील सोमठाणकर यांना माघार घ्यावी लागली. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चूरस निर्माण झाली असताना मतदानाच्या दोन दिवसापूर्वी ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरु झाली आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेना शिंदे गटात सामील होणार असल्याच्या बातम्या धडकल्या. त्यामुळे काँग्रेससह शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील नगरसेवक संभ्रमात पडले होते. महाविकास आघाडीच्या उमेदवाराची देखील धाकधुक वाढली होती. आपला विजय निश्चित असल्याचा दावा करणाऱ्या कृष्णा पाटील आष्टीकर यांना मात्र ‘ऑपरेशन टायगर’मुळे फटका बसला. अपेक्षेप्रमाणे 84 मते महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाली. मुलाचा पराभव खासदार पित्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
काँग्रेसची मतं फुटली
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील मतफुटीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाविकास आघाडीकडे शेकडोच्या संख्येने संख्याबळ असताना कृष्णा पाटील यांना केवळ एवढीच मते मिळाली. काँग्रेसकडे 92 , तर शिवसेना ठाकरे गटाकडे 19 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 23 असे एकूण 134 मतदार आहेत. तरी देखील उमेदवाराला शंभरी आकडा गाठता आला नाही. तेव्हा काँग्रेसची मते फुटल्याची जोरदार चर्चा आहे. अनेकांनी भाजप उमेदवाराला साथ दिल्याची देखील चर्चा आहे. या मत फुटीनंतर काँग्रेस काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

