त. भा. प्रतिनिधी पुणे
शनिवारी राज्याच्या अनेक भागात पावसाने उसंत घेतली. तसेच दिवसभरात सुर्यनारायणाचे दर्शन झाल्याने दिलासा मिळाला. दरम्यान, रविवारी कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे.
उत्तरपश्चिम बंगालचा उपसागर तसेच दक्षिणपश्चिम राजस्थानच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, याच्या प्रभावामुळे ओरिसा राज्यात 28 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान,राज्यातील पावसाची तीव्रता शनिवारी किंचित कमी होती. पावसाने ब्रेक घेतल्याने तसेच सुर्यनारायणाचे दर्शन झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. दिवसभर अधूनमधून पावसाची एखाद दुसरी सर येत असल्याने वातावरण आल्हाददायक झाले. राज्याच्या बहुतांश भागात अशी स्थिती होती. यामुळे अनेक धरणांतून होणारा विसर्गही बंद करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या चार दिवसातील पावसाच्या स्थितीमुळे राज्याच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे.
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस
बंगालचा उपसागर तसेच राजस्थानवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याकडे बाष्पयुक्त वारे येत आहेत. रविवारी अनेक रायगड, रत्नागिरी, सातारा घाट परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर पुणे घाट भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यानंतर राज्याच्या अनेक भागातील पाऊस हळूहळू कमी होणार आहे.
राज्यातील धरणांत 56 टक्के पाणीसाठा
जून महिना कोरडा गेल्यानंतर राज्यातील धरणांमध्ये जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने राज्याचा पाणीसाठा 56 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात जून महिन्यात पाणीसाठा निम्याहूनही कमी होता. मात्र, जुलै महिन्यात राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस झाला. विशेषत: 6 ते 9 जुलै तसेच 20 ते 25 जुलै या कालावधीत अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे संबंधित धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
मात्र, राज्यभर पावसाचे वितरण अद्याप असमान असल्याने काही भागांमध्ये जलस्थिती अद्याप अपेक्षित पातळीपर्यंत पोचलेली नाही. त्यासाठी उपलब्ध जलसाठ्याचे नियोजनबद्ध व काटेकोर व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मराठवाडा व विदर्भातील काही प्रकल्पांमध्ये परिस्थिती अद्याप समाधानकारक नाही.
बुलढाणा जिह्यातील खडकपूर्णा, सोलापूर जिह्यातील सिद्धेश्वर, अहिल्यानगर जिह्यातील सीना-कोळेगाव आणि अमरावती जिह्यातील बोरगाव या प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शून्य टक्के आहे. बीड जिह्यातील माजलगाव (13 टक्के), धाराशिव जिह्यातील मांजरा (25 टक्के), अकोला जिह्यातील काटेपूर्णा (17 टक्के), यवतमाळ जिह्यातील सिरपूर (18 टक्के) आणि परभणी जिह्यातील निम्न दुधना (23 टक्के) या प्रकल्पांमध्येही पाणीसाठा तुलनेने कमी आहे.
राज्यातील जलस्थिती
विभाग–साठा (टीएमसीमध्ये)- टक्के
पुणे -368.5–68
कोकण -102.3–79
नाशिक- 122.6 –58
नागपूर -78.6 –47
अमरावती -59.7 –43
संभाजीनगर -71.1 –28
