जूनअखेर लांबलेला मान्सून आता वादळासह देशभरात पाणी पाणी करण्यास सज्जा झाला आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा पाऊस आणि वादळी पावसाबाबत तणावपूर्ण इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्या, ३० जून रोजी उत्तर प्रदेश आणि बिहारसह २१ राज्यांसाठी पाऊस आणि वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या १२ तासांत ताशी ७० ते ७५ किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहणार आहे. या वादळामुळे अनेक राज्यांमध्ये मोठी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडू शकतात. यांसदर्भात हवामान विभागाने पावसात प्रवास करताना घनदाट जंगल असलेले भाग टाळावेत अशी सूचना दिली आहे.
दरम्यान, डोंगराळ राज्यांमधील लोकांमध्येही चिंता वाढली आहे. या काळात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही राज्यांमध्ये मोठ्या गारपिटीचा इशाराही दिला आहे. लोकांनी या काळात घराबाहेर पडणे टाळावे.
महाराष्ट्रात कुठे पडणार पाऊस
मिळालेल्या माहितीनुसार हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 22 जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून, 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परिणामी महाराष्ट्रात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
राज्यात या ठिकाणी बरसणार सरी
महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे; हवामान विभागाने 28 जून ते 4 जुलै या कालावधीत कोकण आणि गोव्यात बऱ्यापैकी सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून, काही भागांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील इतर भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
