चहूबाजूंनी दाटलेला अंधार भेदून ‘ऑर्किड’ला तारल्यानंतर माझा आत्मविश्वास अधिक भक्कम झाला आणि जोखीम पत्करण्याची क्षमताही वाढली. शिवाय याच संकटातून आयुष्यभर स्मरणात राहील असा धडादेखील मिळाला होता. या सर्वांची गोळाबेरीज करून मी नव्या उत्साहानं कामाला लागलो. रेस्टॉरंटसह ‘ऑर्किड’ शृंखलेचा विस्तार केला. आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत जगभरात ६९३ हॉटेल-रेस्टॉरंटची उभारणी मी केली आहे. यात यंदा आणखी सहा हॉटेलांची भर पडणार आहे. विशाल आणि विक्रम कामत ही माझी मुलं आता पुढील धुरा सांभाळत आहेत. मात्र, आजही व्यवसायात माझा सक्रिय सहभाग आहे.
हॉटेल व्यवसायातील माझ्या या अल्पशा योगदानाबद्दल देश-विदेशातील सुमारे ३९७पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्कारांचा हा आकडा ठळक दिसणारा असला, तरी या वाटचालीत आलेले अडथळे, अडचणी इतरांसाठी अदृश्य आहेत. ‘हॉटेल व्यवसायात यायचं असल्यास नेमकं काय करायला हवं,’ असा प्रश्न मला सातत्यानं विचारला जातो. त्यावर माझं पहिलं उत्तर असतं, ‘घामाला अत्तर समजण्याची तयारी हवी.’ या व्यवसायात झोकून देणाऱ्यांची दोन लग्ने होतात, असं मी नेहमी म्हणतो. एक आपल्या पती किंवा पत्नीशी आणि दुसरं हॉटेलसोबत.
या व्यवसायात उतरायचं असल्यास सर्वप्रथम त्याबाबत सखोल संशोधन, ‘SWOT’ (Strengths, Weaknesses, Opportunities, and Threats) विश्लेषण करणं क्रमप्राप्त आहे. जिथं व्यवसाय सुरू करायचा आहे, त्या परिसराचं बारकाईनं निरीक्षण करायला हवं. सर्वंकष अभ्यासानंतर तपशीलवार ‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ तयार करायला हवा. तो एखाद्या जाणकार व्यक्तीला दाखवून त्याचा सल्ला घ्यायला हवा.
अनेकदा असं होतं की व्यवसाय करायचा असतो, पण पुरसं आर्थिक भांडवल नसतं. अशावेळी तीन गोष्टी करता येतील. पहिली म्हणजे आपली संकल्पना एखाद्या यशस्वी, प्रामाणिक माणसाला दाखवावी. आपल्या अनुभवातून त्याची पडताळणी करून तो अर्थसाह्य करण्यास तयार झाला तर प्रश्नच मिटतो. दुसरं, भागीदारीसाठी प्रयत्न करता येईल. तिसरा पर्याय म्हणजे सरकारकडून लहान उद्योजकांना उत्तम अर्थसाह्य मिळत आहे; त्याचा लाभ घेता येईल. वडिलांच्या पैशांतून व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा मर्यादित भांडवल असेल, तर आधीच परवाना असलेलं, पण काही कारणास्तव बंद होण्याच्या मार्गावर असलेलं दुकान निवडायला हवं. परवान्यासह बऱ्याचशा गोष्टी तयार असल्यानं यात खूप पैसे वाचतात. याशिवाय नवीन सामग्रीऐवजी जुन्या वस्तू विकत घ्याव्यात. यातून बराच खर्च कमी होतो व दुर्दैवानं अपयश आलंच तर मोठा आर्थिक फटका बसत नाही.
रेस्टॉरंट सुरू करताना प्रशासकीय किंवा कायदेविषयक अडचणी या ओघानं आल्याच. अशा वेळी ‘रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशन’ची मदत घेता येते. या व्यवसायात केवळ डिग्री असून उपयोग नाही, तर यातील खाचखळगे जाणून घेण्यासाठी लहानात लहान गोष्टी शिकवेल अशा एखाद्या विश्वासार्ह माणसाकडे सहा महिने ते एक वर्ष काम करणं अत्यावश्यक आहे. त्यानंतर स्वमालकीच्या रेस्टॉरंटचा विस्तार करताना संबंधित परिसरातील नागरिकांचा कल कशाकडे आहे, याचा कानोसा घ्यायला हवा. म्हणजे दादरला रेस्टॉरंट करायचं असेल, तर तिथं झटपट देता येतील असे पदार्थ ठेवायला हवेत. याउलट चर्चगेट भागात दुपारच्या जेवणाची वेळ महत्त्वाची असते. या व्यतिरिक्त आजूबाजूला काय विकलं जातंय याचा अभ्यास करायला हवा. माझ्या मते, या व्यवसायात अन्य रेस्टॉरंट किंवा हॉटेलांपेक्षा खरी स्पर्धा रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्याशी असते. कारण त्याला फार कर भरायचे नसतात, कर्मचाऱ्यांच खर्च नसतो, इंटिरिअरची गरज नसते. या सर्वांतून त्याच्या खर्चात सुमारे ४० टक्के बचत होत असते. परिणामी, स्वस्तात खाद्यपदार्थ देणं त्याला शक्य असतं. त्यामुळे त्या अनुषंगानं आपणही खर्चाचं नियोजन करायला हवं. त्यासोबत इतरांपेक्षा आपण काय वेगळं आणि अधिक देऊ शकतो यावर बारकाईनं विचार व्हायला हवा. आपण देणार असलेले पदार्थ जिव्हेला सुखावणारे असावेत. कारण खवय्ये नेहमीच सर्वोत्तम स्वादाच्या शोधात असतात आणि ग्राहकाचं परत परत येणं हेच आपल्या यशाचं द्योतक असतं. महत्त्वाचं म्हणजे रोजच्या ग्राहकाला तुम्ही स्वादिष्ट पदार्थ दिले, तरी तो तेच ते खाऊन कंटाळतो. त्यामुळे मेन्यू सातत्यानं बदलायला हवा. फ्यूजन फूडला भविष्यात मागणी असेल. त्या जोडीला पारंपरिक पदार्थांची कासही धरायला हवी. ग्राहकांना पर्याय उपलब्ध करून द्यायला हवेत. सेवा क्षेत्र असल्यानं इथं तक्रारी येणारच, पण त्याचं रूपांतर आपण समाधानात करतो तेव्हा ग्राहक खूश होतो. त्यांना टिकवून ठेवायचं असेल, तर त्यांच्याशी नेहमी प्रेमानं, सौजन्यानं वागायला हवं.
अलीकडे एकूणच सभ्यता कमी झाल्याचं दिसतं. स्वतः गैरवर्तणूक करूनही व्हिडीओ शूटिंग, सोशल मीडियाची धमकी देणाऱ्या ग्राहकांनाही आज सामोरं जावं लागतं. त्यामुळे या व्यवसायात तहेत-हेच्या व्यक्ती भेटतील. ४० वर्षांपूर्वी एक जण रात्री माझ्याकडं आला आणि म्हणाला, ‘कामत हे नाव इंग्रजीत सहा अक्षरी (Kamats) आहे. त्यामुळे मराठीतही तीनऐवजी तेवढीच अक्षरं असायला हवीत.’ तो खूप दारू प्यायला होता. त्याला त्या वेळी समजावणं अशक्य होतं. त्यामुळे मी शांतपणे म्हणालो, ‘तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. कामतसाहेब आता घरी गेलेत. सकाळी नक्कीच मी तुमचा निरोप देऊन त्यांना नाव बदलायला सांगतो.’ तो खूश होऊन निघून गेला. अशी संयमानं परिस्थिती हाताळता आली पाहिजे.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेचं गणित पक्कं असायला हवं. ग्राहकाला त्यांची ऑर्डर जेवढ्या लवकर समोर मिळेल आणि खाऊन तो जितक्या लवकर बाहेर पडेल त्यानुसार आपला ‘टर्नओव्हर’ वाढेल. पार्सल सेवेवर कटाक्षानं लक्ष द्यायला हवं. त्यासाठी कधीतरी बाहेरून आपल्याच रेस्टॉरंटमधून पदार्थ मागवून चाचपणी करायला हवी. पहिले तीन महिने ते १०० दिवस नफ्याचा विचारही करायचा नाही. या दिवसांत धंद्याचा जम बसवण्यासाठी झोकून द्यायला हवं. आपल्या प्रयत्नांना यशाची साथ मिळाली, तर ती दुधावरची साय असते.
तोटा टाळायचा असल्यास नियोजनाला पर्याय नाही. रोजचे हिशेब रोज लिहायला हवेत. अन्यथा आपण किती तोट्यात आहोत ते कळत नाही. दुसरं म्हणजे न चालणारे पदार्थ अजिबात विलंब न करता बदलायला हवेत. किमती वस्तूंची तोडफोड होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. प्रत्येक गोष्ट जपून वापरून सर्व प्रकारचा अपव्यय, नासाडी टाळायला हवी. एवढं सगळं करून किंवा सर्व खबरदारी घेऊनही एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य काही संकट आलं तर ‘माघार घेणार नाही’ यावर आपण ठाम असायला हवं. असं अघटित घडलंच तर पहिल्यांदा परिस्थितीचं अवलोकन करायला हवं. समस्यारूपी मांजाचा गुंता सोडवताना योग्यप्रकारे गाठी शोधायला हव्यात. कर्मचारी आणि पुरवठादारांना विश्वासात घ्यायला हवं. ‘जसं यश माझ्यासोबत तुमचं आहे, तसंच अपयशही आपल्या दोघांचंच आहे’, हे त्यांना पटवून सांगायला हवं.
‘तुमच्यावेळी आजच्याएवढी स्पर्धा नव्हती’, असं मला अनेकदा सांगितलं जातं. पण तसं कधीच नसतं. ‘एसएससी’ पास होणाऱ्या प्रत्येकाला आपल्या वेळचा पेपर कठीण होता असंच वाटत असतं. अर्थात, एक गोष्ट नक्कीच आहे की, पूर्वी माणसं भुकेसाठी खायची. आज चवीसाठी आणि अनेकदा भूक नसेल, तरी दुसऱ्याला दाखवण्यासाठी खातात. पण स्पर्धा वाढली म्हणून तुम्ही माघार घेणार का? हाच व्यवसाय करायचा असेल तर अटीतटीच्या स्पर्धेतही तुम्ही कसे ‘धुरंधर’ ठरता, यावरून तुमचं नाव यशोपटलावर नोंदवलं जाईल.
चढ-उतारांच्या हिंदोळ्यावरील माझा व्यावसायिक प्रवास या लेखमालेतून तुमच्यापुढं मोकळेपणानं मांडता आला. माझ्या अनुभवांची ही ‘डीश’ तुम्हाला रुचकर वाटली असेल, अशी आशा बाळगतो आणि थांबतो.
(शब्दांकन : लहू सरफरे)

