Paranormal Investigation: जपानमधील Kachimode कंपनी कथित हॉन्टेड घरांची वैज्ञानिक उपकरणांच्या मदतीने तपासणी करून ती भुताटकीमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देते. हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका रात्रीसाठी ५५ हजार रुपये दिले जातात.

नेमका हा प्रकार आहे तरी काय?
आपल्या आसपास अशा अनेक पडीत जागा किंवा घरे असतात, जी हॉन्टेड प्लेस म्हणून ओळखली जातात. त्या ठिकाणी भूतं आहेत, अतृप्त आत्मे फिरतात किंवा नकारात्मक ऊर्जा आहे, असे सांगितले जाते. अशा अफवा हळूहळू सर्वत्र पसरतात आणि त्या जागेविषयी लोकांच्या मनात भीती निर्माण होते. एखाद्या बिल्डरने त्या जागेवर इमारत बांधली तरी अनेकजण तेथे घर खरेदी करण्यास घाबरतात.
अशा हॉन्टेड जागांविषयी लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी जपानमधील Kachimode या प्रॉपर्टी मॅनेजमेंट कंपनीने ‘घोस्ट इन्व्हेस्टिगेशन’ ही सेवा सुरू केली आहे. हे काम करणाऱ्या व्यक्तींना कंपनी एका रात्रीसाठी ८८ हजार येन, म्हणजेच जवळपास ५५ हजार रुपये, देते.
या घोस्ट इन्व्हेस्टिगेशनमध्ये नेमकं काय केलं जातं?
समजा एखादं कुप्रसिद्ध घर आहे आणि त्या घरात भूतं आहेत, असा लोकांचा विश्वास आहे. अशा ठिकाणी Kachimode कंपनी आपले प्रशिक्षित कर्मचारी पाठवते. हे कर्मचारी व्हिडिओ कॅमेरे, ऑडिओ रेकॉर्डर, थर्मोग्राफी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डिटेक्टर आणि इतर सेन्सर्सच्या मदतीने घराचे निरीक्षण करतात. हे निरीक्षण रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत केले जाते. तपासणीनंतर संबंधित घराबाबत सविस्तर अहवाल तयार केला जातो आणि भुताटकीचे कोणतेही पुरावे आढळले नसल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.
सध्या ही कंपनी केवळ जपानमध्येच कार्यरत आहे. मात्र, भविष्यात अशी एखादी कंपनी भारतातही सुरू झाली, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कारण भारतातही अशा अनेक जागा आहेत, जिथे भुतांचा वावर असल्याचा दावा केला जातो. असो, पण तुम्ही अशा एखाद्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज कराल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
(फोटो सौजन्य – Rıfat Gadimov/pexels.com)

