Jalna Patel Dairy Food and Medicine Department Raid : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने कार्यवाहींचा धडाका लावलाय. अशातच जालन्यातील प्रसिद्ध पटेल डेअरीवर अचानक तपासणी मोहीम राबविली.

नियमानुसार दुधाचे नमुने संकलित केले
तपासणीदरम्यान डेअरीमध्ये सुमारे हजार लिटर म्हशीचं दूध साठवून ठेवण्यात आल्याचं आढळून आलं आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार दुधाचे नमुने संकलित करून ते अधिकृतरीत्या सील केले. हे नमुने पुढील रासायनिक विश्लेषणासाठी छत्रपती संभाजीनगर येथील अन्न विश्लेषक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. संबंधित अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार पुढील प्रशासकीय कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आली.
Karjat Roha Railway Line : कर्जत-रोहा रेल्वेमार्गाची नवी जोडणी; मालवाहतुकीच्या प्रवासवेळेत बचत होणार, प्रकल्पाची वैशिष्ट्ये अन् फायदे काय?
राज्यातील ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, तसेच भेसळयुक्त उत्पादनांवर आळा बसावा, या उद्देशाने विभागाकडून विविध ठिकाणी नियमित तपासण्या करण्यात येत आहेत. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये वाढती जागरूकता लक्षात घेऊन प्रशासनाने तपासणी मोहिमेला विशेष प्राधान्य दिले आहे. ही कारवाई सहायक आयुक्त नि. सु. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी तांबे, अन्न सुरक्षा अधिकारी अनुजा नगरारे आणि नमुना सहाय्यक धम्मदीप नरवडे यांच्या पथकाने पार पाडली. तपासणी प्रक्रियेदरम्यान सर्व नमुने निर्धारित नियमांनुसार संकलित करून पुढील चाचणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
डेअरीचे मालक काय म्हणाले?
दरम्यान, पटेल दूध डेअरीचे मालक अजीम पटेल यांनी या कारवाईबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, ‘अन्न व औषध प्रशासन विभागाकडून वेळोवेळी त्यांच्या डेअरीतील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. आतापर्यंत झालेल्या सर्व तपासण्यांमध्ये त्यांच्या डेअरीतील दूध शुद्ध आणि दर्जेदार असल्याचं अहवालातून सिद्ध झाले आहे. आज घेण्यात आलेले नमुनेही नियमित तपासणी प्रक्रियेचाच एक भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल’, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी डेअरीमध्ये कोणत्याही प्रकारची भेसळ अथवा मिलावट केली जात नसल्याचा दावा केला. ग्राहकांना उपलब्ध करून दिले जाणारे दूध हे स्वतःच्या म्हशींपासून मिळणारे असल्यामुळे गुणवत्ता आणि शुद्धतेबाबत कोणतीही तडजोड केली जात नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Nashik Crime : नाशिकमध्ये सुटकेसमधील महिलेच्या बॉडीचा उलगडा, 28 सीसीटीव्ही फुटेजची मदत; हातावरील टॅटूमुळे मोठी माहिती समोर
सध्या या प्रकरणात प्रयोगशाळेच्या अहवालाची प्रतीक्षा असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच दुधाच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष समोर येणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि डेअरी व्यवस्थापन या दोन्हींकडून तपासणी अहवालाकडे लक्ष लागले आहे. तर तुकाराम मुंडे यांच्या या कारवाया राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्या कारवायाचे स्वागत केले जात आहे.

