Jalna Ambad Tehsildar Bribe Case : तहसीलदार विजय चव्हाण यांच्या लाच प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी अवैध वाळू उत्खननाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील अंबड येथील तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांमुळे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा राज्यभर गाजत आहे. विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना 3 दिवसापूर्वी रंगेहाथ अटक झाल्यानंतर या प्रकरणात आता आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील तक्रारदार सुयोग सोळुंके याला जालना जिल्ह्यातील गोंदी पोलिसांनी अवैध वाळू उत्खननाशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अटक केली आहे.
तडिपारी, सुटका, पुन्हा अटक
सुयोग सोळुंके याच्यावर 2025 मध्ये अवैध वाळू उत्खनन, वाळू चोरी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे दाखल होऊन बराच कालावधी लोटल्यानंतर आता त्याच्यावर अटकेची कारवाई झाल्याने विविध स्तरांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही त्याच्यावर विविध गुन्ह्यांची नोंद असून, एका वर्षासाठी तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली होती. दोन महिन्यांपूर्वीच त्याची या कारवाईतून जामीनावर सुटका झाली होती.
विजय चव्हाणांना रंगेहाथ अटक
अवैध वाळू उत्खननासाठी वापरण्यात येणारे पोकलेन मशीन तसेच 6 हायवा वाहने सुरू ठेवण्यासाठी तहसीलदार विजय चव्हाण यांना 6 लाख 40 हजार रुपयांची लाच देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तहसीलदार विजय चव्हाण यांना छत्रपती संभाजी नगर येथे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या निवासस्थानी रंगेहाथ अटक केली होती. या कारवाईने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. यात आता तक्रारदाराला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.
सुयोग सोळुंके याच्याविरोधात गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 217/2025, 218/2025 आणि 230/2025 असे 3 स्वतंत्र गुन्हे नोंद आहेत. भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) तसेच गौण खनिज (विकास व विनियमन) अधिनियमातील कलम 3 आणि 4 अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये यापूर्वी त्याला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर जामीनही मंजूर झाला होता.
वाळू चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक
त्याच्याविरुद्ध एमपीडीए कायद्यांतर्गतही कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. आता पुन्हा एकदा वाळू चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आल्यानंतर जालन्याच्या अंबड न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अंबड लाच प्रकरणातील तक्रारदाराच्या अटकेमुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे, प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि अवैध वाळू उत्खननाशी संबंधित साखळी यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
तक्रारदार सुयोग सोळंके याला अटक झाली असल्याची माहिती जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना दिली आहे. या अटकेची आता संपूर्ण जिल्ह्यासह राज्यभरात चर्चा सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखीन काही घडामोडी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा