Headlines

नागपूरच्या अंबाझरी रोडवर एसटी बस अन् दुधाच्या टेम्पोचा भीषण अपघात:65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी




नागपूरच्या अंबाझरी रोडवरील एलआयडी (इंदिरा गांधी रुग्णालय) चौकात सोमवारी एसटी बस आणि दूधवाहू वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका 65 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन पादचाऱ्यांसह वाहनाचा चालक असे एकूण चार जण जखमी झाले. या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आणि रस्त्यावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अमूल दूध वाहून नेणारी टाटा इंट्रा कमर्शिअल गाडी (एमएच-31, जीडी-0585) रामनगरकडून अभ्यंकर नगर चौकाकडे जात होती. त्याचवेळी शंकर नगर चौकाकडून अंबाझरी टी-पॉइंटकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने (एमएच-40, वाय-5126) दूधवाहू वाहनाला जोरदार धडक दिली. धडक इतकी तीव्र होती की एसटी बस अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटली आणि तिच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. धडकेच्या तीव्रतेमुळे दूधवाहू वाहन चौकात उभ्या असलेल्या तीन नागरिकांच्या अंगावर जाऊन आदळले. या अपघातात कॉर्पोरेशन कॉलनी येथील रहिवासी सुनील आनंदराव जाधव (वय 65) यांचा मृत्यू झाला.

गांधीनगरचे रहिवासी सुनील कुशालराव गुडदे (वय 62), कॉर्पोरेशन कॉलनीचे रहिवासी शैलेंद्र मारोतराव किनगावकर (वय 62) आणि दूधवाहू वाहनाचा चालक अभिषेक दुर्गाप्रसाद जगणे (वय 23, रा. खापरखेडा) हे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यांनी उलटलेल्या बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आपत्कालीन सेवा पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. बजाज नगर पोलिसांनी या प्रकरणी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत