Headlines

India vs Sri Lanka Test Series KL Rahul Yashasvi Jaiswal practice Tanush Kotian; संधी हुकलेल्या फिरकीपटूचा मारा, श्रीलंका दौऱ्यासाठी फलंदाजांचा घोटून सराव, दोन धुरंधरांचा वांद्य्रात सराव


Ind vs SL Test Series : पावसाच्या सरीही थोड्या फार अंतराने येत असल्याने कधी इनडोअर, तर कधी ढगाळ अशा दोन्ही वातावरणात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी सराव केला. या सरावात त्यांनी भेदक मारा करणाऱ्या फिरकी गोलंदाजीविरुद्ध आपले तंत्र जास्त घोटवून घेतले.

Ind vs SL Test Cricket Match Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ मंगळवारी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंकेत दाखल झाला. मात्र, रवाना होण्याच्या काही तासांपूर्वीही भारतीय संघातील के. एल. राहुल आणि यशस्वी जयस्वाल हे प्रमुख फलंदाज वांद्रे येथील क्रिकेट अकादमीत सराव करत होते.

भारत-श्रीलंकेदरम्यानच्या दोन सामन्यांच्या मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. त्याआधी भारतीय संघ एक तीनदिवसीय सराव सामना खेळणार आहे. ही दोन सामन्यांची मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या मालिकेत भारताचे पारडे जड असले, तरी भारतीय खेळाडू कुठलाही धोका पत्करणार नाही. त्यातच गेले काही महिने आणि गतमोसमातील कसोटीतील अपयशी कामगिरीनंतर कानाला खडा लावून भारताच्या कसोटी संघातील फलंदाजांनी पूर्वतयारीत कोणतीही कमतरता ठेवलेली नाही.

राहुल आणि जयस्वाल यांचा सराव

यासाठी ठोस पूर्वतयारी व्हावी म्हणून या दोन फलंदाजांचा वांद्रे पश्चिम येथील विंग्ज स्पोर्ट्स सेंटर येथे हा सराव सुरू होता. भारताचे माजी क्रिकेटपटू जतीन परांजपे यांची ही अकादमी आहे. अन् येथे या दोन फलंदाजांचा सराव रविवारी आणि सोमवारी रंगला होता. सोमवारी मुंबईत ढगाळ वातावरण होते. पावसाच्या सरीही थोड्या फार अंतराने येत होत्या. मात्र, त्यानुसार कधी इनडोअर, तर कधी ढगाळ वातावरण अशा दोन्ही वातावरणात राहुल आणि जयस्वाल यांनी सराव केला. या सरावात राहुल आणि जयस्वाल यांनी फिरकी गोलंदाजीविरुद्ध आपले तंत्र जास्त घोटवून घेतले.

फिरकी माऱ्याचा अधिक सराव

मुंबईचे आघाडीचे फिरकी गोलंदाज या दोन्ही फलंदाजांना मारा करत होते. ज्यात तनुष कोटियनसारख्या अनुभवी, गुणी फिरकी गोलंदाजाचाही समावेश होता. एरवी भारताचे फलंदाज नव्या चेंडूंनिशी सराव करण्यास प्राधान्य देतात. मात्र, श्रीलंकेत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व असण्याची शक्यता असल्याने राहुल आणि जयस्वाल यांनीही फिरकी माऱ्यापुढे जास्त सराव करणे पसंत केले. या फिरकी गोलंदाजांमध्ये लेगस्पिनर, डावखुरे फिरकी गोलंदाज आणि ऑफस्पिनरचा समावेश होता. ‘गेले दोन दिवस राहुल आणि जयस्वाल अकादमीत सरावासाठी येत होते. जयस्वाल दोन दिवसांपासून सराव करत होता, तर राहुल सोमवारी येथे आला. त्यांनी एकत्र सरावही केला. श्रीलंकेतील वातावरण आणि त्यांचा फिरकीवरील भर लक्षात घेता राहुल आणि जयस्वाल यांनी नेट सरावात फिरकीला महत्त्व देणे साहजिकच होते,’ असे परांजपे यांनी सांगितले.

Maharashtra TimesSunil Gavaskar : राहुल द्रविडशी तुलना, भारतीय क्रिकेटमधील चुकांवर बोट, सुनील गावसकरांनी रहाणेचं भरभरुन कौतुक केलं, काय म्हणाले?

तनुष सरावाचा गोलंदाज?

तनुष कोटियन याची श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने तज्ज्ञ आणि माजी खेळाडूंनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, ऐन संघात संधी मिळाली नसली तरी मुंबईचा हा गुणी फिरकी गोलंदाज नेट सरावातील गोलंदाज म्हणून भारतीय संघासह श्रीलंकेला जाणार असल्याचे वृत्त आहे. या मालिकेत भारताच्या फलंदाजांना आव्हानात्मक फिरकीचा सामना करावा लागू शकतो. त्या दृष्टीने सरावात आपल्या फलंदाजांना सर्वप्रकारच्या फिरकी गोलंदाजांचा सामना करायला मिळावा, अशी संघव्यवस्थापनाची धारणा आहे. त्या दृष्टीने निवड समितीने नेट गोलंदाज म्हणून कोटियनसह (ऑफस्पिन), विप्रज निगम (लेगस्पिन), शिवांग कुमार (डावखुरा मनगटी फिरकी गोलंदाज) आणि हर्ष दुबे (डावखुरा फिरकी गोलंदाज) यांनाही टीम इंडियासह श्रीलंकेला पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, मानव सुतार आणि सारांश जैन यांचा समावेश आहे.

जाडेजाचे कौतुक

‘आक्रमक दृष्टिकोन ठेवल्याने रवींद्र जाडेजाचा कसोटी क्रिकेटपटू म्हणून मोठा विकास झाला आहे,’ असे मत माजी कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने व्यक्त केले. सुरुवातीला जाडेजाचा भर कमीत कमी धावा देण्यावर होता. आता मात्र तो विकेटचा विचार करतो आहे, असे पुजाराला वाटते. ‘बळी घेण्यासोबतच त्याने फलंदाजीतही अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले असून, लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले आहे,’ असे सांगायलाही पुजारा विसरला नाही.

Maharashtra TimesAuqib Nabi Selection : वेगवान गोलंदाजी नाही तर मग आकिब नबीची खरी ताकद नेमकी काय? इरफान पठाणने दिलं उत्तरजाडेजाने ८९ कसोटींमध्ये २५.१२च्या प्रभावी सरासरीने ३४८ विकेट घेतल्या आहेत. पुजारा म्हणाला, ‘आता त्याला स्वतःच्या ताकदीची जाणीव झाली असून, तो त्यानुसारच गोलंदाजी करत आहे. प्रत्येक सामन्यात तो चेंडू यष्ट्यांच्या रेषेत टप्पा पाडून फलंदाजाला बाद करण्याचा प्रयत्न करत असतो.’ पुजाराने जाडेजाचे कौतुक केले असले, तरी निवड समिती त्याच्या पर्यायाचाही विचार करते आहे. त्यामुळे या दौऱ्यात सारांश जैनचा समावेश करण्यात आला आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा