India-UK Trade Deal: भारत आणि ब्रिटन यांच्यातील मुक्त व्यापार करार – FTA – आजपासून अंमलात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या 60 अब्ज डॉलर्स द्विपक्षीय व्यापार होत असून पुढील काही वर्षांत 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांची स्थिती बांगलादेश आणि चीनपेक्षा अधिक चांगली होईल. कोणत्या क्षेत्रांना फायदा होईल?

भारत-ब्रिटन FTA आजपासून अंमलात
गेल्या अनेक वर्षांच्या वाटाघाटी आणि एका वर्षापेक्षा जास्त काळ चाललेल्या अंमलबजावणी प्रक्रियेनंतर बहुप्रतीक्षित करार आजपासून अंमलात आला आहे. ब्रिटनने 117 वस्तू वगळता इतर सर्व उत्पादनांवर शून्य-टॅरिफ प्रणाली लागू केली, ज्याचा भारतीय वस्त्रोद्योग, खाद्य उत्पादने, चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे, अभियांत्रिकी वस्तू आणि औषधनिर्माण क्षेत्रांना सर्वाधिक फायदा होईल.
इलेकट्रीक गाड्यांवर टॅरिफ
वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल म्हणाले की, सरकारने 12000 उत्पादनांपैकी 89.5% उत्पादनांवरील टॅरिफ पूर्णपणे रद्द करण्यास किंवा कमी करण्यास सहमती दर्शवली आहे. FTA अंतर्गत 64% पेक्षा जास्त उत्पादनांना भारतात तात्काळ टॅरिफ-फ्री एन्ट्री मिळेल तर, उर्वरित उत्पादनांवर टप्प्याटप्प्याने शुल्क रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. 4.4% टॅरिफ लाइनमधील कारसह आणखी 536 वस्तूंवरील शुल्क कमी केले जाणार असून पहिल्या 5 वर्षांसाठी इलेक्ट्रिक वाहनांना या करारातून वगळले गेले आहे.
प्रीमियम व्हिस्की आणि जिन स्वस्त होणार
ब्रिटनमधून भारतात आयात केल्या जाणाऱ्या स्कॉच व्हिस्की आणि जिनवर याआधी 150% शुल्क आकारले जायचे तर, आता FTA नुसार शुल्क तात्काळ 75% पर्यंत आणि 10 वर्षांच्या आत केवळ 40% पर्यंत कमी केले जातील. तसेच प्रीमियम ब्रँड्सच्या किमती 5-10% कमी होऊ शकतात, म्हणजेच जे लोक अधूनमधून महागडी मद्ये खरेदी करतात त्यांना फायदा होईल.
आलिशान ब्रिटिश गाड्यांवर टप्प्याटप्प्याने सूट
ॲस्टन मार्टिन, बेंटले, जग्वार, लँड रोव्हर आणि रोल्स-रॉइस यांसारख्या वाहनांवरील शुल्क 15 वर्षांत 110% वरून 10% पर्यंत कमी केले जाईल. पहिल्या वर्षी ही सूट 20000 वाहनांना लागू होईल आणि दीर्घकाळात उच्चभ्रू लोकांना महागड्या गाड्या किंचित कमी किमतीत खरेदी करता येतील.
खाद्यपदार्थ आणि पेये
तसेच ब्रिटनमधून आयात होणाऱ्या सॅल्मन, मेंढीचे मांस, चॉकलेट, बिस्किटे आणि शीतपेयांवरील शुल्क कमी केले जाईल, ज्यामुळे ही उत्पादने स्वस्त होतील.
सौंदर्यप्रसाधने अन् वैद्यकीय उपकरणे
ब्रिटनमधील सौंदर्यप्रसाधने, वैद्यकीय उपकरणे आणि एरोस्पेस भागांवरील कमी शुल्कामुळे या वस्तू स्वस्त होतील व 15% वरून 3% पर्यंत शुल्क कमी होईल.
फॅशन आणि कपडे
ब्रिटनमधून आयात केले जाणारे ब्रँडेड कपडे, फॅशन उत्पादने आणि घरगुती वस्तू देखील स्वस्त होतील. फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूदेखील कमी किमतीत उपलब्ध होतील.
ब्रिटनसोबत FTA मुळे वस्त्रोद्योगाला फायदा
आजपासून अंमलात येणाऱ्या या मुक्त व्यापार करारामुळे वस्त्रोद्योग क्षेत्राला फायदा होणे अपेक्षित आहे. ब्रिटनमध्ये आता भारतीय कपडे आणि चादरी व पडदे यांसारख्या गृहवस्त्रांवर याआधी लादले जाणारे 8-12% टॅरिफ आता पूर्णपणे रद्द केला जाईल, ज्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनाम यासारख्या देशांच्या तुलनेत भारतीय कपडे स्वस्त आणि अधिक स्पर्धात्मक बनतील. तिरुप्पूर, सुरत आणि लुधियानासारख्या निर्यात केंद्रांमध्ये पुढील तीन वर्षांत 40% पर्यंत वाढ दिसून येऊ शकते.
औषधे आणि वैद्यकीय उपकरणे
या FTA मुळे भारतातील औषध कंपन्यांना ब्रिटनमध्ये जेनेरिक औषधांकरिता नोंदणी प्रक्रिया सुलभ होऊ शकेल. यामुळे यूके आरोग्य सेवेमध्ये (NHS) भारतीय औषधे सहज उपलब्ध होतील आणि औषध मंजुरीला गती मिळेल.
अन्न, चहा, मसाले आणि सागरी खाद्यपदार्थ
बासमती तांदूळ, कोळंबी यासारखे सागरी खाद्यपदार्थ तसेच उत्तम प्रतीचा चहा आणि मसाल्यांवर ब्रिटनमध्ये आयत शुल्क पूर्णपणे रद्द केले जातील. यामुळे आसाम, गुजरात, केरळ आणि पश्चिम बंगाल यासारख्या प्रदेशांमधील निर्यात उद्योगाला मोठी चालना मिळेल.
रसायने आणि विशेष सामग्री
कृषी रसायने, प्लॅस्टिक आणि विशेष रसायनांवरील कमी शुल्कांमुळे गुजरात आणि महाराष्ट्रासारख्या प्रमुख केंद्रांमधून होणाऱ्या निर्यातीला चालना मिळेल. या करारानुसार, भारताचे 2030 पर्यंत ब्रिटनला होणारी रासायनिक निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे.
हरित ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान
ब्रिटनसोबत मुक्त व्यापार करार सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि EV पायाभूत सुविधांसह नवीकरणीय ऊर्जेतील संयुक्त उपक्रमांसाठी मार्ग मोकळा करेल. ब्रिटन भारताच्या स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात अधिक गुंतवणूक करेल आणि नवीन तंत्रज्ञान सह-विकसित करेल.
रत्न आणि दागिने उद्योगासाठी सुवर्णसंधी
भारत जगातील आघाडीच्या रत्न आणि दागिन्यांच्या निर्यातदारांपैकी असून सध्या भारतातून ब्रिटनला अंदाजे 941 दशलक्ष डॉलर्स किमतीचे दागिन्यांची निर्यात होते, तर ब्रिटन दरवर्षी अंदाजे 3 अब्ज डॉलर्स किमतीच्या दागिन्यांची आयात करतो. अशा स्थितीत, FTA मुळे भारतीय दागिने कंपन्यांना संधी निर्माण होऊ शकते. या करारानंतर पुढील 2 ते 3 वर्षांत भारताची दागिन्यांच्या निर्यातीत दुपटीने वाढीचा अंदाज आहे. या क्षेत्रात बाजार टायटन आणि कल्याण ज्वेलर्ससारख्या कंपन्यांच्या शेअर्सवर लक्ष ठेवून असेल.

