Headlines

IND vs SL Second Test Result : भारताने श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकली, पण दुसऱ्या कसोटीत यजमानांचा पलटवार; कोणामुळे सामना अनिर्णित?


IND vs SL Second Test : कोलंबो कसोटीच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेने भारताला विजयापासून रोखले. सोनल दिनुशाच्या नाबाद १३३ धावांमुळे सामना ड्रॉ झाला, मात्र भारताने मालिका १-० ने जिंकली.

India vs Sri Lanka Test
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटी अखेर अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश आले आहे. गॉल कसोटीतील दणदणीत विजयानंतर कोलंबोमध्येही विजयाची स्वप्ने पाहणाऱ्या टीम इंडियाच्या मनसुब्यांवर एका श्रीलंकन पठ्ठ्याने एकट्याच्या जीवावर पाणी फेरले. सोनल दिनुशाच्या नाबाद १३३ धावांच्या मॅरेथॉन खेळीमुळे श्रीलंकेने दुसरा कसोटी सामना वाचवला. मात्र, पहिल्या कसोटीतील विजयाच्या जोरावर भारतीय संघाने या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० असा दिमाखदार विजय खिशात घातला आहे.

सोनल दिनुषा ठरला टीम इंडियासाठी कर्दनकाळ

या कसोटीत भारताने ५०३ धावांचा डोंगर उभारत आपला पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव स्वस्तात गुंडाळत भारताने २१३ धावांची भक्कम आघाडी घेतली आणि यजमानांना फॉलोऑन दिला. त्यामुळे भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण, चौथ्या दिवशी ६ बाद २२९ धावांवरून पाचव्या आणि अंतिम दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर सोनल दिनुशा आणि केशरा नुवांथा यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला.

Maharashtra TimesIND vs SL : भारताचा विजय हिरावून घेणारा श्रीलंकन फलंदाज कोण? BCCI उपाध्यक्षांकडून थेट सचिनशी तुलना, काय म्हणाले?

दिनुशाने अत्यंत चिवट आणि जिद्दीने फलंदाजी करत नाबाद १३३ धावांची खेळी साकारली. विशेष म्हणजे, या मालिकेतील हे त्याचे सलग तिसरे शतक ठरले. गॉल कसोटीत एक आणि कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात १०३ धावा केल्या होत्या. त्याने सातव्या विकेटसाठी केशरा नुवांथा (४६ धावा) याच्यासोबत ११२ धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी रचून भारताच्या हातून विजयाचा घास हिरावून घेतला.

४२९ धावांवर डाव घोषित अन् सामना ड्रॉ

पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांना विकेट्ससाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. श्रीलंकेने भारतीय आक्रमणाला निष्प्रभ ठरवत आपली एकूण आघाडी २१६ धावांपर्यंत पोहोचवली. अखेर श्रीलंकेने आपला दुसरा डाव ९ बाद ४२९ धावांवर घोषित केला, ज्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हस्तांदोलन करत हा सामना ड्रॉ करण्यावर संमती दर्शवली.

Maharashtra TimesIND vs AUS U-19 Series : बापाचा वारसा चालवणार पोरं! ज्युनियर ‘सेहवाग-द्रविड’ टीम इंडियात दाखल; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर, पाहा वेळापत्रक
भारताकडून या डावात युवा फिरकीपटू मानव सुथारने ४१ षटकांत १२१ धावा देऊन ३ बळी घेतले, तर अनुभवी रवींद्र जडेजाने ३८.३ षटकांत ९४ धावा देत ३ विकेट्स आपल्या नावावर केल्या. मात्र, त्यांना श्रीलंकेची शेपूट वेळेत गुंडाळता आली नाही. असे असले तरी, टीम इंडियाने मालिका खिशात घालत या श्रीलंका दौऱ्याचा शेवट गोड केला आहे.