Headlines

रक्षाबंधनच्या आधीच बहिणीचा मृत्यू; इस्त्रीने चटके देत मारहाण केल्याचा आरोप, 17 वर्षे छळ सोसला, शिल्पाचा संशयास्पद मृत्यू, भावाचा दावा


पुण्यात एका उच्चभ्रू कुटुंबातील महिलेने स्वत:ला संपवलं आहे. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या सासरच्यांनी गेल्या 17 वर्षांपासून मुलीचा छळ केल्याचा आरोप मृतक शिल्पाच्या आई-वडील आणि भावाने केला आहे.

Shilpa Gaware Case
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : रक्षाबंधनच्या निमित्ताने भावाला राखी बांधण्यासाठी माहेरी येण्याची तयारी असतानाच विवाहित शिल्पा कलाटे हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शिल्पाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा गंभीर संशय तिच्या माहेरच्यांनी व्यक्त केला असून, सासरच्या मंडळींकडून तब्बल 17 वर्षांपासून छळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शिल्पाचा भाऊ संतोष कलाटे यांनी आपल्या बहिणीच्या मृत्यूबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. रक्षाबंधनसाठी खरेदी करण्यासाठी शिल्पा माहेरी आली होती. त्यावेळी ती व्यवस्थित बोलून गेली; मात्र काही वेळातच परिस्थिती बदलली. “हॉस्पिटलमध्ये या,” असा निरोप मिळाल्यानंतर कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले असताना डॉक्टरांनी शिल्पाला मृत घोषित केले होते, असे संतोष कलाटे यांनी सांगितले.

शिल्पाच्या भावाचे गंभीर आरोप

शिल्पाच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून तिला सातत्याने त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. पैशांवरून तसेच संपत्तीतील हिस्स्यावरून वाद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. मद्यपान करून मारहाण केली जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे.

जमिनी दिल्यानंतरही मुलीचा छळ केल्याचा आरोप

शिल्पाचे आई-वडील रतन कलाटे आणि गुलाब कलाटे यांनीही मुलीच्या संसारातील 17 वर्षांच्या छळाचा पाढा वाचला. मामुर्डी आणि म्हाळुंगे येथील जमीन दिल्यानंतरही सासरच्या मंडळींकडून अधिक संपत्ती आणि पैशांसाठी दबाव आणला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. रक्षाबंधनसाठी माहेरी येतानाही तिला अडवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. काही वेळा संध्याकाळी उशिरा तिला माहेरी पाठवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

शिल्पाच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप

“मारहाण करायचे, इस्त्रीचे चटके दिले,” असा धक्कादायक आरोप शिल्पाच्या आई-वडिलांनी केला आहे. मुलीच्या छळाबाबत सासू-सासऱ्यांनी हस्तक्षेप करण्याऐवजी त्याला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

मृत्यूपूर्वी शिल्पाचं आई-वडिलांशी बोलणं

शिल्पाच्या मृत्यूपूर्वी रात्री साडेअकरा ते बाराच्या सुमारास तिच्याशी फोनवर बोलणे झाले होते, असे कुटुंबीय सांगतात. जेवण केले का, गोळ्या घेतल्या का, अशी विचारपूस झाली होती. त्याचवेळी सासरी भांडण आणि शिवीगाळ सुरू असल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. शिल्पाचा पती मद्यपान केलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शिल्पाच्या भावाला घातपाताचा संशय

या प्रकरणात आणखी एक गंभीर मुद्दा कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे. आत्महत्या करणारी व्यक्ती साधारणपणे दरवाजा बंद करते; मात्र शिल्पाच्या मृत्यूच्या वेळी दरवाजा उघडा होता, असा दावा तिच्या भावाने केला. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार नसून घातपात असण्याचा संशय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिल्पाच्या पतीची गुन्हेगारी पार्श्वभूमी

शिल्पाच्या भावाने तिच्या सासरच्या मंडळींशी संबंधित जुन्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही उल्लेख केला आहे. सचिन आणि संदीप गवारे यांच्यावर पूर्वी हत्येचा गुन्हा असल्याचा दावा त्यांनी केला. त्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

संतोष कलाटे काय म्हणाले?

“आम्हाला खोटी माहिती देऊन आमची बहीण त्या घरात दिली. १७ वर्षे तिचा छळ सहन करावा लागला. आता माझ्या बहिणीला गमावलं,” अशी संतप्त भावना संतोष कलाटे यांनी व्यक्त केली.

शिल्पाच्या आई-वडिलांची कठोर कारवाई करण्याची मागणी

दरम्यान, शिल्पाच्या आई-वडिलांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “माझ्या मुलाला राखी बांधायला आता माझी मुलगी नाही. दुसऱ्या कोणत्याही मुलीने असा छळ सहन करू नये. आम्ही फसलो, तुम्ही फसू नका,” असे आवाहन त्यांनी केले.

पोलिसांकडून तपास सुरु

शिल्पाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला? हा सध्या या प्रकरणातील सर्वात मोठा प्रश्न आहे. कुटुंबीयांचे आरोप, मृत्यूची परिस्थिती, घटनास्थळीची स्थिती आणि उपलब्ध पुरावे यांची पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिल्पाने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला? याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा