Ajinkya Rahane Old Video: अजिंक्य रहाणेनं आणखी एक संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळालं नाही. निवृत्तीनंतर त्याचा हा जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अजिंक्यचे चाहते भावुक झाले आहेत.

काय म्हणाला अजिंक्य?
हा व्हिडीओ @Naresh_Nehraa या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. २०२५ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर होता. त्यावेळी समालोचन करत असताना अजिंक्य रहाणेनं त्याला आणखी क्रिकेट खेळायचं असल्याचं सांगितलं होतं.
“मी निवड समितीच्या सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ती गोष्ट माझ्या हातात नव्हती. माझ्या हातात फक्त एवढंच आहे की क्रिकेट खेळत राहणं आणि त्या खेळाचा आनंद घेत राहणं. मला कसोटी क्रिकेट खेळायला आवडतं. लाल चेंडूवर खेळण्याची मजा काही औरच आहे. क्रिकेट या खेळावर माझं खूप प्रेम आहे.” असं संभाषण या व्हिडीओमध्ये अजिंक्य रहाणे करताना दिसत आहे.
…अन् पुन्हा अजिंक्यला संधी मिळाली नाही
अजिंक्य रहाणेनं भारतासाठी ८५ कसोटी, ९० एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्यानं ८ हजारांहून अधिक धावा केल्या, तर १५ शतकं आणि ५० हून अधिक अर्धशतकं झळकावली. “जहाँ मॅटर बड़े होते हैं, वहाँ अजिंक्य रहाणे खड़े होते हैं,” असं त्याच्याबद्दल म्हटलं जायचं. कारण संघ अडचणीत असताना त्यानं अनेकदा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
अजिंक्यनं शेवटचा कसोटी सामना २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या WTC फायनलमध्ये खेळला होता. या सामन्यात त्यानं ८९ धावांची खेळी केली होती. मात्र, भारतीय संघाचा पराभव झाला. त्यानंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसला, पण आंतरराष्ट्रीय संघात त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. आता त्याच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत असून चाहते त्यावर भावुक प्रतिक्रिया देत आहेत.

