पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि खुसखुशीत भजींचा मोह टाळणं जवळजवळ अशक्यच होतं. विशेषतः “खेकडा कांदा भजी” म्हणजेच कांद्याच्या पातळ पाकळ्यांनी बनलेली कुरकुरीत भजी ही प्रत्येक फूड लव्हरची पहिली पसंती असते.बाहेर मिळणारी ही भजी इतकी हलकी आणि खुसखुशीत कशी बनते, आणि त्यात थेंबभरही पाणी न घालता ती इतकी परफेक्ट का लागते, हे अनेकांना नेहमीच उत्सुकतेचा विषय वाटतो.

खरंतर स्ट्रीट फूडची खरी मजा त्याच्या साधेपणात असते. कमी साहित्य, कमी प्रक्रिया पण तरीही जबरदस्त चव हेच या पदार्थांचं वैशिष्ट्य. कांदा भजीही त्याला अपवाद नाही. कांद्याच्या नैसर्गिक गोडसर चवीला मसाल्यांचा तिखटपणा आणि बेसन-तांदळाच्या पिठाची कुरकुरीतपणा मिळून एकदम संतुलित चव तयार होते. त्यामुळे ही भजी चहासोबत खाल्ली की साधा स्नॅकसुद्धा खास वाटू लागतो.
आज आपण अशीच एक खास स्ट्रीट फूड स्टाईल खेकडा कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत, ज्यामध्ये पाणी अजिबात वापरले जात नाही. कांद्यामधील नैसर्गिक ओलावा, मसाले आणि योग्य प्रमाणातील बेसन-तांदळाचे पीठ यामुळे ही भजी अत्यंत कुरकुरीत आणि हलकी होते. या पद्धतीत कोणताही बाह्य ओलावा न घालता मिश्रण तयार केलं जातं, ज्यामुळे भजी तळताना ती तेलात तुटत नाहीत आणि सुंदर “खेकडा” सारखा आकार टिकून राहतो.ही रेसिपी खास करून पावसाळ्यासाठी परफेक्ट आहे कारण बाहेरच्या ओलसर हवेमुळे भजी खाण्याची इच्छा आणखी वाढते. गरम तेलात तळलेली, सोनेरी रंगाची, हलकी कुरकुरीत भजी आणि बाजूला हिरव्या मिरच्या किंवा चटणी असेल तर त्या क्षणाचा आनंदच वेगळा असतो. (फोटो सौजन्य :- @MadhurasRecipe Marathi)
साहित्य
ही भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य अगदी साधे आणि घरात सहज उपलब्ध असते
- उभे काप केलेले कांदे
- चवीनुसार मीठ
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- बेसन
- तांदळाचं पीठ
- लाल तिखट
- हळद
- ओवा
- चिमूटभर हिंग
- हिरव्या मिरच्या (ऐच्छिक)
- तळण्यासाठी तेल
भजीची खास ट्रिक – पाणी न घालता कुरकुरीतपणा कसा येतो?
या रेसिपीचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे पाणी अजिबात न घालणं. कांदा हा स्वतःच रसाळ असतो. त्यात मीठ घातल्यावर तो थोडा पाणी सोडतो. हेच नैसर्गिक पाणी भजीच्या मिश्रणाला बांधण्यासाठी पुरेसं असतं.
जर पाणी घातलं तर
- मिश्रण पातळ होतं
- भजी तेलात तुटतात
- कुरकुरीतपणा कमी होतो
कांदा तयार करणे
सुरुवातीला कांदे उभे पातळ कापून घ्या. हे काप फार जाड नसावेत, कारण जाड कांदा भजी नीट शिजत नाही. कांद्याच्या पाकळ्या वेगळ्या करा, म्हणजे त्यांचा “खेकडा” सारखा आकार तयार होईल.
मीठ आणि कोथिंबीर मिसळणे
कांद्यामध्ये चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. हाताने हलकेच मिक्स करा. या टप्प्यावर कांदा थोडा मऊ होतो आणि त्यातून नैसर्गिक पाणी सुटायला सुरुवात होते. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांदा हलकासा मॅश करणे. यामुळे भजी अधिक घट्ट आणि एकत्र बांधलेली राहते.
15 मिनिटे विश्रांती
मिश्रण झाकून 15 मिनिटे बाजूला ठेवा. या वेळेत कांदा आपला रस सोडतो आणि भजीसाठी योग्य बेस तयार होतो.
कोरडे मसाले आणि पीठ घालणे
- आता त्यात खालील घटक घाला
- बेसन
- तांदळाचं पीठ
- लाल तिखट
- हळद
- ओवा
- चिमूटभर हिंग
- मीठ
- हिरवी मिरची
मिश्रण तयार होणे
थोड्याच वेळात तुम्हाला दिसेल की कांद्याच्या पाण्यामुळे बेसन आणि पीठ एकत्र चिकटू लागते. हे मिश्रण थोडं घट्ट आणि चिकट असावं. जर खूप कोरडं वाटलं तर अजून थोडं कांदा मॅश करा.कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल खूप गरम नसावं, नाहीतर भजी बाहेरून जळतात आणि आतून कच्ची राहतात.
भजी तळणेभजी छान कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढा आणि टिश्यू पेपरवर ठेवा, म्हणजे अतिरिक्त तेल निघून जाईल.

