Headlines

Healthy Gut Signs, symptoms & foods diet for good Digestive Health; पचनसंस्था निरोगी असल्याची 5 लक्षणे, संकेत, आतडे साफ व हेल्दी ठेवणारे पदार्थ कोणते


पचनसंस्था म्हणजे केवळ अन्न पचवण्याचे केंद्र नसून ती शरीराच्या रोगप्रतिकारक शक्ती, मानसिक आरोग्य आणि एकूणच फिटनेसशी थेट जोडलेली असते. तुमचे पोट खरोखर निरोगी आहे की नाही, हे कसे ओळखायचे? नियमित शौच, गॅस-अपचनाचा त्रास नसणे, चांगली भूक, दिवसभर ऊर्जा टिकून राहणे आणि मजबूत रोगप्रतिकारक शक्ती ही निरोगी गट हेल्थची महत्त्वाची लक्षणे मानली जातात. पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात, कोणती लक्षणे धोक्याची घंटा ठरू शकतात आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन जाणून घ्या.

healthy gut signs
healthy gut signs
आपल्या शरीरातील पचनसंस्थेला (Gut) अनेकदा शरीराचा ‘दुसरा मेंदू’ म्हटले जाते, कारण तिचे काम केवळ अन्न पचवण्यापुरते मर्यादित नसते. आपल्या पोटात ट्रिलियन्सच्या संख्येने सूक्ष्मजीव राहतात, ज्याला ‘गट मायक्रोबायोम’ (Gut Microbiome) म्हणतात. हे सूक्ष्मजीव आपली पचनक्रिया, रोगप्रतिकारक शक्ती, चयापचय आणि मानसिक आरोग्यामध्येही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. निरोगी पोट शरीराला पोषक घटक शोषून घेण्यास मदत करते आणि संसर्गापासून संरक्षण करते. अनेक लोकांचा असा समज असतो की, पोटात दुखत नसेल तर पचनसंस्था निरोगी आहे; परंतु वैद्यकीय विज्ञानानुसार निरोगी पोटाची व्याख्या त्याहून व्यापक आहे. तुमची पचनसंस्था उत्तम काम करत आहे हे ओळखण्याचे वैज्ञानिक निकष काय आहेत, याचे सखोल विश्लेषण, आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

नियमित आणि त्रासमुक्त शौचास होणे

नियमित आणि त्रासमुक्त शौचास होणे

पचनसंस्था निरोगी असल्याचे सर्वात स्पष्ट आणि पहिले लक्षण म्हणजे नियमितपणे पोट साफ होणे. वैद्यकीय दृष्टीने, दिवसातून तीन वेळा ते आठवड्यातून तीन वेळा शौचास होणे आणि ते तुमच्या नेहमीच्या सवयीनुसार असणे सामान्य मानले जाते. निरोगी मल हे मऊ, योग्य आकाराचे आणि कोणत्याही त्रासाशिवाय किंवा जास्त जोर न लावता सहज बाहेर पडणारे असते. आहारातील बदलांमुळे कधीकधी बद्धकोष्टता (Constipation) किंवा जुलाब होणे सामान्य आहे; परंतु जर हा त्रास, किंवा मलमधून रक्त पडणे, पोटातील तीव्र वेदना काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

गॅस-अपचनाचा त्रास न होणे आणि उत्तम पचनक्रिया

गॅस-अपचनाचा त्रास न होणे आणि उत्तम पचनक्रिया

भरपूर जेवण केल्यानंतर थोडे सुस्त किंवा जड वाटणे सामान्य आहे, परंतु जर तुम्हाला वारंवार पोट फुगणे (Bloating), जास्त गॅस होणे किंवा खाल्ल्यानंतर लगेच अस्वस्थता जाणवत असेल, तर पचनसंस्थेत बिघाड असल्याचे ते लक्षण आहे. निरोगी पोटाची यंत्रणा अन्न अत्यंत प्रभावीपणे पचवते, ज्यामुळे छातीत जळजळ (Acid Reflux), आंबट ढेकर येणे, किंवा पोटात पेटके येणे यांसारखी लक्षणे उद्भवत नाहीत. जर ही लक्षणे वारंवार दिसत असतील, तर ती अन्नपदार्थांची ॲलर्जी, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS) किंवा इतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आजारांचे संकेत असू शकतात.

चांगली भूक लागणे आणि ऊर्जेची पातळी स्थिर राहणे

चांगली भूक लागणे आणि ऊर्जेची पातळी स्थिर राहणे

जेव्हा तुमची पचनसंस्था उत्तम काम करते, तेव्हा ती अन्नातील आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि पोषक घटक योग्य प्रकारे शोषून घेते. यामुळे शरीराला दिवसभर काम करण्यासाठी पुरेशी आणि स्थिर ऊर्जा मिळते. याउलट, जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल, भूक लागत नसेल, वजन अचानक कमी होत असेल किंवा शरीरात रक्ताची व पोषक घटकांची कमतरता जाणवत असेल, तर ते पचनमार्गातील दोषाचे लक्षण असू शकते. सिलियाक डिसीज, आतड्याला सूज येणारे आजार (IBD) किंवा यकृत-स्वादुपिंडाचे आजार पोषक तत्वांच्या शोषणात अडथळा आणतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये.

मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी त्वचा

मजबूत रोगप्रतिकारक शक्ती आणि निरोगी त्वचा

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, आपल्या शरीरातील ७०% रोगप्रतिकारक पेशी थेट पचनसंस्थेशी जोडलेल्या असतात. पोटातील चांगले जिवाणू हानिकारक बॅक्टेरियांना शरीरात वाढू देत नाहीत आणि आतड्याच्या आवरणाचे रक्षण करतात. पोटाचे आरोग्य चांगले असेल तर वारंवार होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी होतो. तसेच, पोटाच्या आरोग्याचा थेट संबंध आपल्या त्वचेशी असतो. जरी मुरुम (Acne) किंवा एक्जिमाची अनेक कारणे असली, तरी पोटातील बिघाडामुळे शरीरात वाढलेली सूज त्वचेचे आरोग्य खराब करू शकते. निरोगी पोटामुळे त्वचा, केस आणि स्नायूंना आवश्यक पोषण मिळून एकूणच आरोग्यात सुधारणा होते.

पोटाचे आरोग्य राखण्याचे उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

पोटाचे आरोग्य राखण्याचे उपाय आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

पोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्याही महागड्या औषधांची किंवा ‘गट क्लिंझिंग’ प्रॉडक्ट्सची गरज नसते, तर खालील साध्या सवयी उपयुक्त ठरतात:

  • आहार आणि पाणी : आहारात फायबरयुक्त पदार्थ (ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य) आणि प्रोबायोटिक्ससाठी दही किंवा ताकाचा समावेश करा. शरीरात पाण्याचे प्रमाण उत्तम ठेवा.
  • काय टाळावे? : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच्या मनाने अँटीबायोटिक्स गोळ्या घेणे पूर्णपणे बंद करा, कारण यामुळे पोटातील चांगले जिवाणू नष्ट होतात. अति-प्रोसेस्ड अन्न, साखर आणि अल्कोहोलचे सेवन टाळा.
  • डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? : जर तुम्हाला सतत पोटात दुखणे, शौचातून रक्त येणे किंवा काळी विष्ठा होणे, गिळताना त्रास होणे, सतत उलट्या किंवा तीव्र पोटफुगीचा त्रास होत असेल, तर घरगुती उपचार न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.
    पोटाचे आरोग्य म्हणजे केवळ पोट साफ होणे नव्हे, तर ती शरीराची ऊर्जा, मानसिक प्रसन्नता आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवून ठेवणारी मुख्य यंत्रणा आहे. पोटाच्या तक्रारींकडे कधीही ‘सामान्य त्रास’ म्हणून दुर्लक्ष करू नका.
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 18, 2026, 02:26 PMMedically Reviewed byDr Saiprasad Girish Lad
  • Jul 18, 2026, 02:26 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम