Haryanvi Singer Ankit Baliyan Death हरियाणामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून प्रसिद्ध गायकाचा जागीच संपल्यामुळे त्याच्या आईला धक्का बसला आहे. संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको केला आहे.

सायंकाळी 7 च्या सुमारास गायकावर हा जीवघेणा हल्ला झाला. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, चार हल्लेखोर जिमबाहेर अंकित बाहेर येण्याची वाट पाहत दबा धरून बसले होते. हत्येच्या बातमीमुळे परिसरात लोकांची गर्दी जमली आणि तणाव व चितेंचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे संतप्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत रस्ता रोको आंदोलन सुरू केले. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
अंकित जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी करत होता
अंकित बालियान हा जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याची तयारी करत होता. मात्र, त्याच्या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंकित त्याच्या हरियाणवी गाण्यांसाठी खूप लोकप्रिय होता. त्याचा जन्म शामली येथे झाला असला तरी तो हरियाणातील सोनीपत येथे राहत होता; पुढे गेल्या काही महिन्यांपासून तो आपल्या कुटुंबासह गावातच राहत होता.
हत्येच्या एक तास आधी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट
हत्येच्या साधारण एक तास आधी, म्हणजेच संध्याकाळी 6 वाजता अंकितने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये तो कारमध्ये बसून ‘मर्डर मार दे सडक के ऊपर’ हे गाणे गाताना दिसत होता.
अंकित आपल्या गाण्यांमधून वारंवार ‘गन कल्चर’चा उल्लेख करत असे.
अंकित आपल्या गाण्यातून अनेकदा बंदुकी संस्कृतीचा संदर्भ देत असे. त्याचे ‘भारी कोर्ट में गोली हे गाणे 15 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित झाले होते आणि त्यानंतर त्यावर बंदी घालण्यात आली. या गाण्यामुळे हरियाणवी संगीत क्षेत्रात तो चर्चेत आला. 2023 मध्ये शामली येथे त्याने आयोजित केलेल्या रोडशोमुळेही प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले गेले होते.
जिममधून बाहेर पडताना त्याच्यावर गोळीबार
अंकित हा शामली जिल्ह्यातील ‘बंटीखेडा’ गावचा रहिवासी होता. बुधवारी संध्याकाळी, नेहमीच्या दिनचर्येनुसार तो ‘सिटी कोतवाली’ परिसरातील ‘आर्यपुरी नाला ट्रॅक’जवळ असलेल्या जिममध्ये गेला होता. संध्याकाळी 7 च्या सुमारास, जेव्हा तो जिममधून बाहेर पडून आपल्या ‘स्कॉर्पिओ’ गाडीत बसणार होता, तेव्हा दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आणि लोकांची पळापळ झाली.
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, अंकितने हल्लेखोरांपासून वाचण्याचा प्रयत्न केला. त्याच्या स्कॉर्पिओच्या ड्रायव्हरच्या बाजूला भिंत असल्याने, त्याने गाडीच्या दुसऱ्या बाजूने आत शिरण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी, हल्लेखोरांनी स्कॉर्पिओचा दरवाजा उघडला आणि त्याच्यावर धाडधाड गोळ्या झाडल्या. अंकितला पाच गोळ्या लागल्या. हल्ला केल्यानंतर, चारही आरोपी पायीच घटनास्थळावरून पळून गेले.
आई आपल्या मुलाचे डोके मांडीवर घेऊन रस्त्यावर बसली
या हत्येनंतर अंकितचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कुटुंबीयांनी दिल्ली मुझफ्फरनगर महामार्गावरील ‘वर्मा मार्केट’ चौकाजवळ रस्ता रोखला; ही जागा गुन्ह्याच्या ठिकाणापासून साधारण 50 मीटर अंतरावर आहे. अंकितच्या गावातील अनेक लोक ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून घटनास्थळी दाखल होत आहेत. ‘भास्कर’च्या वृत्तानुसार, अंकितची आई आपल्या मुलाचे डोके मांडीवर घेऊन रस्त्यावर बसली होती. रडत असताना ती केवळ एकच गोष्ट वारंवार म्हणत होती: “बोलू नका, शांत राहा ; माझा मुलगा झोपला आहे.”
घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधीक्षक यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. संतप्त जमावाला शांत करून परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून सापडलेल्या काडतुसांचे रिकामे कव्हर्स देखील ताब्यात घेतले आहेत. हत्येमागचे कारण शोधण्यासाठी आणि आरोपींची ओळख पटवण्यासाठी सध्या तपास सुरू आहे.

