Headlines

Sonal Dinusha IND vs SL : टीम इंडियाला विजयापासून रोखलं, पण सामन्यानंतरच्या वक्तव्याने भारतीयांचं मन जिंकलं! दिनुशा नेमकं काय म्हणाला?


Sonal Dinusha Batting Against India : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या सोनल दिनुशाने सामन्यानंतर आपल्या कामगिरीमागचं श्रेय कोणाला दिलं? ४२० धावा आणि तीन शतकांनंतर श्रीलंकेच्या या फलंदाजाने नेमकं काय सांगितलं, जाणून घ्या.

Sonal Dinusha
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला होता. मात्र, दुसऱ्या कोलंबो कसोटीत टीम इंडियाला विजयाचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघ पाचव्या दिवशी सहज विजय मिळवेल, असे वाटत होते. पण, श्रीलंकेचा युवा फलंदाज सोनल दिनुशा टीम इंडियाच्या मार्गात एक मोठा डोंगर बनून उभा राहिला. त्याने शानदार शतक ठोकत सामन्याचे चित्रच पालटले आणि सामना अनिर्णित राखत तो श्रीलंकेचा नवा हिरो ठरला आहे. या सामन्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“भारताविरुद्ध धावा काढणं हे माझं भाग्य”

सोनलने या सामन्याच्या दोन्ही डावांत शतके झळकावली. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “मला वाटतं, मी आज ज्यांच्यामुळे धावा काढू शकलो, त्या सर्वांचे आभार मानले पाहिजेत. विशेषतः माझे कोचिंग स्टाफ, स्कूल कोच, प्रांतीय कोच, माझे कुटुंब आणि मित्र यांनी मला खूप प्रोत्साहन दिले. तयारीबाबत सांगायचे तर, इथल्या खेळपट्टीवर फिरकीला मोठी मदत मिळते, याचा मला अंदाज होता. त्यामुळे मी सरावादरम्यान अत्यंत बारकाईने सराव केला आणि म्हणूनच मला या धावा करता आल्या.”

Maharashtra TimesDevdutt Padikkal : नंबर-3 असो वा कुठलीही जागा, देशासाठी खेळणं महत्त्वाचं; देवदत्त पडिक्कल मालिकावीर पुरस्कारानंतर बोलताना काय म्हणाला?
या मालिकेत तब्बल ४२० धावा कुटणाऱ्या दिनुशाने पुढे सांगितले की, “भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध धावा काढणे हे खरोखरच माझे मोठे भाग्य आहे. एक खेळाडू म्हणून ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.”

सोनल दिनुशाचा शतकी धमाका

सोनल दिनुशाने कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात १६२ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १०३ धावांची शतकी खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने आपला हा खणखणीत फॉर्म कायम ठेवत २६४ चेंडूंचा सामना करत नाबाद १३३ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. दुसऱ्या डावात भारताचा एकही गोलंदाज त्याला बाद करू शकला नाही आणि त्याने एकाकी झुंज देत सामना ड्रॉ केला. विशेष म्हणजे, पहिल्या कसोटीतही त्याने पहिल्या डावात १०० आणि दुसऱ्या डावात ८४ धावांचे मोठे योगदान दिले होते. आपल्या या अफाट टॅलेंटची दखल त्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला घ्यायला भाग पाडले आहे.

Maharashtra TimesWTC Points Table : अशी मालिका जिंकून काय फायदा? दुसरी कसोटी अनिर्णित राहिल्याने भारताला मोठा फटका, आता फायनलमध्ये एन्ट्री कशी मिळणार?

कोलंबो कसोटीचा थरार

या सामन्यात टीम इंडियाने दुसऱ्या दिवशी १३८ षटकांत ९ बाद ५०३ धावांचा डोंगर उभारत आपला पहिला डाव घोषित केला होता. याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेचा पहिला डाव ८९.४ षटकांत २९० धावांवर आटोपला. भारताने २१३ धावांची मोठी आघाडी घेत श्रीलंकेला फॉलोऑन दिला. पण, दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांनी, विशेषतः सोनल दिनुशाने चिवट झुंज देत १५४ षटकांत ९ बाद ४२९ धावा केल्या आणि भारताच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून सामना अनिर्णित राखला.