सोन्या-चांदीत सलग दुसऱ्या दिवशीही तेजीचा कल
देश-विदेशातील सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये तेजीचा कल पाहायला मिळत आहेत. मेटल बाजारात गेल्या काही दिवसांपासून वर-खाली सुरूच असून आता पश्चिम आशियातील युद्ध निवळण्याची चिन्हे दिसू लागल्यावर सोन्या-चांदीच्या गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
12 वर्ष जुना पीएफचा मोठा नियम बदलला; आता 25 हजारांपर्यंत ‘बेसिक’ असणाऱ्यांनाही पेन्शन, कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?
अशा परिस्थितीत, सकारात्मक घडामोडींचा मागोवा घेत देशांतर्गत वायदा बाजारात MCX वर सोन्याच्या दरात वाढ झाली. सोन्याच्या फ्युचर्स किमती 1.43 लाख रुपयांपर्यंत वाढल्या तर, चांदीच्या दरातही वाढ झाली असून सुमारे 2.19 लाख रुपये किलोवर उसळल्या आहेत. अशाप्रकारे, मुंबईच्या सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 143,360 रुपये 10 ग्रॅम आहे, तर 22 कॅरेट सोने 131,413 रुपये 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोने 107,520 रुपये 10 ग्रॅमला उपलब्ध आहे. तसेच, चांदीचा दर 2,19,310 रुपये किलोवर उसळला आहे.
दुसरीकडे, जागतिक बाजारात 4 ऑगस्ट रोजी सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली. सुरुवातीच्या व्यवहारात चांदीने सोन्याला मागे टाकत जवळपास 2 % वाढ नोंदवली तर, सध्या COMEX वर सोन्याचा भाव 0.62% वाढून प्रति औंस $4,115.90 वर पोहोचला. त्याचवेळी, COMEX चांदीचा भाव 1.91% वाढून प्रति औंस $58.96 वर पोहोचला. पण आता सोने-चांदीच्या किमतीत वाढीचे कारण काय? असा प्रश्न विचारला जात आहे.
पश्चिम आशियातील घटत्या तणावाचा परिणाम
अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य चर्चेबाबत परस्परविरोधी विधानांमुळे निर्माण झालेल्या भू-राजकीय तणावाचा सोन्याला पाठिंबा मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत वाटाघाटी सुरू आहेत आणि करार करण्यासाठी तेहरानला शेवटची संधी असल्याचे म्हटले. मात्र, इराणनेअमेरिकेसोबत कोणतीही वाटाघाटी सुरू नाही किंवा नजीकच्या काळात होण्याची शक्यता नसल्याचे म्हटले. या अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदार भू-राजकीय धोके आणि बाजारातील अस्थिरतेपासून बचाव करण्यासाठी सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेकडे वळत आहेत.
अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांविषयी निर्णयानंतर आता गुंतवणूकदार JOLTS डेटा, म्हणजेच नोकरीच्या संधींच्या आकडेवारीवर लक्ष ठेवून असतील. त्यानंतर शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी ADP खाजगी रोजगार अहवाल आणि नॉन-फार्म पेरोल्स डेटा प्रसिद्ध होईल. या आकडेवारीवरून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची ताकद आणि फेड रिझर्व्हला चलनविषयक धोरण आणखी कडक करण्याची किती शक्यता आहे, याचे संकेत मिळतील.
महागाईची चिंताही कायम
याशिवाय सोमवार, 3 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या नवीन आर्थिक आकडेवारीनुसार, जुलैमध्ये अमेरिकेतील उत्पादन क्रियाकलाप 4 वर्षांहून अधिक काळातील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे, जे आर्थिक मजबुती दर्शवते. तसेच मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आणि व्यवसायांचा खर्च वाढला ज्याचा सततचा दबाव महागाई उच्च ठेवू शकतो, ज्यामुळे फेड रिझर्व्हला धोरणात्मक निर्णय घेणे कठीण होऊ शकते.

