Oil Companies Benefiting from Iran War: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे एकावेळी कच्च्या तेलाच्या किमती 200 डॉलर बॅरलपर्यंत पोहोचण्याचा अंदाज बांधला जात होता. वेगवेगळ्या देशात या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही वाढल्या, ज्याला भारतही अपवाद ठरला नाही. पण इराण युद्ध तेल कंपन्यांच्या पथ्थ्यावर पडलं आणि ऑइल कंपन्यांची चांदी झाली.

सर्वसामान्यांना महागड्या पेट्रोल-डिझेलमधून दिलासा कधी?
तब्बल दोन महिन्यांपूर्वी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ नोंदवली गेलेली, ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशावरील आर्थिक ताण वाढला होता. त्याचप्रमाणे अमेरिकेसह जगातील इतरही देशांमध्ये इंधन दरवाढ केली गेली पण, या दरम्यान तेल कंपन्यांचा नफा पाहून आता सर्वसामान्यांना दिलासा कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
तेलाच्या दरवाढीचा भडका
मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाल्यापासून, एप्रिल ते जून दरम्यान, कच्च्या तेलाची किंमत 70 डॉलरवरून 120 डॉलरपर्यंत वाढलेली. अशाप्रकारे, तेलाच्या किमती तीन महिन्यांत 23 टक्क्यांनी उसळल्या. त्याचप्रमाणे, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने जागतिक महागाईही वाढली, पण या काळात जागतिक 6 प्रमुख तेल कंपन्यांनी विक्रमी नफा कमावला. पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनी ठप्प झाली ज्यामुळे जगभरातील ऊर्जा पुरवठा कमजोर झाला, परिणामी अनेक महिन्यांपासून तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आणि जगभरातील ऊर्जा बाजारांवर परिणाम झाला.
युद्धाच्या वणव्यात तेल कंपन्यांना अफाट नफा
या दरम्यान, आखाती प्रदेशापासून हजारो मैल दूर, अमेरिका आणि युरोपमध्ये घरगुती किमती गगनाला भिडल्या असताना जगातील 6 सर्वात मोठ्या तेल कंपन्यांनी एप्रिल ते जून दरम्यान 81 अब्ज डॉलर्सचा नफा कमावला, असे अल जझीराच्या धक्कादायक अहवालातून समोर आले आहे. म्हणजे भारतीय रुपयात या तेल कंपन्यांनी अंदाजे 7 लाख कोटींचा नफा कमावला, जो भारताच्या 6.81 लाख कोटींच्या संपूर्ण वार्षिक संरक्षण बजेटपेक्षा जास्त आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष अद्याप संपले नसून युद्ध लांबत चालल्याने व संघर्ष लाला समुद्रापर्यंत व्यापल्यामुळे ExxonMobil, शेवरॉन, शेल आणि बीपी यांसारख्या कंपन्यांनी या अस्थिरतेच्या काळात अब्जावधींचा नफा कमावला. इराणशी संबंधित युद्धामुळे या मोठ्या तेल कंपन्यांनी नेमकी किती कमाई केली?
एक्सॉनमोबिल
अमेरिकेतील सर्वात मोठ्या तेल कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 14.5 अब्ज डॉलर्सची कमाई (आणि 14.7 अब्ज डॉलर्सची अडजस्टेड कमाई) नोंदवली, जी कंपनीची गेल्या चार वर्षांतील सर्वोत्तम तिमाही कामगिरी आहे.
शेवरॉन
अमेरिकेतील दुसऱ्या सर्वात मोठ्या कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 12 अब्ज डॉलर्सची कमाई जाहीर केली असून गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक तिमाही नफा ठरला आणि विश्लेषकांचे अंदाजही मागे टाकले. रॉयटर्सच्या अहवालानुसार वाढत्या जागतिक तेल किमतींमुळे अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम दोन्ही कामकाजांना चालना मिळाली, ज्यामुळे अपस्ट्रीमची कमाई वार्षिक 200% वाढून 8.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर डाउनस्ट्रीमची कमाई 4.9 अब्ज डॉलर्सवर पोहोचली – जी 2010 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनची शेवरॉनची सर्वोत्तम कामगिरी आहे.
शेल
युरोपमधील सर्वात मोठी तेल कंपनी – शेल – या ब्रिटिश-डच समूहाने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील कमाईत दुप्पट वाढ नोंदवली. मध्य-पूर्वेतील उत्पादनात व्यत्यय येऊनही वाढत्या तेल व गॅसच्या किमती आणि LNG क्षेत्रातील भक्कम कामगिरीच्या जोरावर कंपनीने जवळपास 10 अब्ज डॉलर्सची कमाई केली, जी विश्लेषकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त आहे.
टोटलएनर्जीज
तेलाच्या वाढत्या किमती आणि रसायनांच्या रिफायनरीजमधील भक्कम नफ्याच्या जोरावर या फ्रेंच तेल कंपनीची कमाई दुसऱ्या तिमाहीत 67% वाढली आणि गेल्या तीन वर्षांतील ही कंपनीची सर्वोत्तम तिमाही ठरली.
बीपी
ब्रिटनमधील आणखी एका प्रमुख तेल कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 5.73 अब्ज डॉलर्सचा नफा नोंदवला, जो मागील वर्षी याच तिमाहीत 2.35 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत दुप्पट आणि विश्लेषकांच्या अंदाजापेक्षाही जास्त आहे.
सौदी आरामको
युद्धाच्या काळातील तेल कंपन्यांचा नफा केवळ पाश्चात्य तेल कंपन्यांपुरताच मर्यादित राहिला नाही.जगातील सर्वात मोठी सरकारी तेल उत्पादक कंपनी – सौदी अरामको – नेही तिमाही कमाईत मोठी वाढ नोंदवली आणि वार्षिक आधारावर 44% वाढून 32.69 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

