Gadchiroli News: भामरागड तालुक्यातील गुंडेनूर नाल्यावरील पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. त्याचा फटका स्थानिक नागरिकांना बसत आहे. हे काम नेमके कधी पूर्ण होणार, असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

बंगाडी येथील संतोष जेट्टी (२९) यांना रविवारी रात्री अचानक तीव्र त्रास सुरू झाला. संसर्ग वाढल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आणि तातडीने उपचाराची आवश्यकता निर्माण झाली. मात्र, मुसळधार पावसामुळे रस्ते चिखलमय झाले होते, तर नद्या-नाल्यांना पूर आल्याने रुग्णवाहिकेला थेट गावात पोहोचणे शक्य नव्हते. उपचारासाठी विलंब झाल्यास अनर्थ ओढवू शकतो, ही भीती लक्षात घेऊन ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. त्यांनी संतोष यांना खाटेवर झोपवून चिखलाच्या वाटेने नदीकाठापर्यंत आणले. मध्यरात्रीचा काळोख, मुसळधार पाऊस आणि दुथडी भरून वाहणारा नाला अशा प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामस्थांनी धाडस करत टिनाच्या नावेच्या साहाय्याने त्यांना नदीपार नेले. त्यानंतर गुंडेनूर नाल्याजवळ उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
Pune Revenue Scam: महसूल विभागातील 15 अधिकारी निलंबित; कलम 155चा गैरवापर केल्याने सरकारचा दणका, प्रकरण काय?
लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी संतोष जेट्टी यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथून पुढील उपचारासाठी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
Tukuram Mundhe : आतापर्यंतच्या इतिहासातील FDA ची सर्वात मोठी कारवाई, 2 कोटी 93 लाखांचे खाद्यतेल जप्त
‘रुग्णवाहिका गावात पोहचली होती’
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी नावेतून नाला पार केल्याचा दावा फेटाळला आहे. ‘लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला पावसाळ्यापूर्वीच रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. आशासेविकांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित रुग्णाला रुग्णवाहिकेतूनच दवाखान्यात आणण्यात आले. बंगाडी नाला पार करून रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचली होती. त्यामुळे नावेतून नाला पार केल्याचा दावा तथ्यहीन आहे. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

