Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी मोठी कारवाई केली. कवंडे परिसरात माओवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू झाली. या शोध मोहिमेदरम्यान, माओवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर देत चार माओवाद्यांना कंठस्नान घातले.

गडचिरोली पोलिसांनी केली छत्तीसगड राज्याची सीमा सील
विशेष म्हणजे छत्तीसगड राज्यात मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाया सुरू असून नुकतेच नक्षल्यांचा नेता बसवा राजूसह तब्बल २७ माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना मोठे यश मिळाले. छत्तीसगड राज्यात सुरू असलेल्या कारवायामुळे माओवादी महाराष्ट्र आणि तेलंगाना राज्यात शिरकाव करणार याची शंका होती. त्या अनुषंगाने गडचिरोली पोलिसांनी छत्तीसगड राज्याची सीमा सील केली होती. मोठ्या प्रमाणात नक्षल शोध मोहीम अभियान राबविण्यासाठी सी ६० पार्ट्यां रवाना करण्यात आल्या होत्या. आज सकाळच्या सुमारास गडचिरोली पोलिसांना देखील मोठे यश मिळाले आहे.
इंजिनिअरिंगचा विद्यार्थी ते माओवाद्यांचा म्होरक्या; डोक्यावर ६ कोटींचं बक्षीस, चकमकीत ठार झालेला बसवराजू कोण होता?
मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक उडाल्यावर पोलिसांनी त्या परिसराला घेराव करून शोध मोहीम राबवित असताना माओवाद्यांचे चार मृतदेहासह एक स्वयंचलित सेल्फ लोडिंग रायफल (SLR),दोन ३०३ रायफल आणि एक भरमार मिळून आले. याशिवाय, घटनास्थळावरून वॉकी टॉकी, छावणी साहित्य, नक्षलवादी साहित्य इत्यादी जप्त करण्यात आले आहेत. सध्या त्या परिसरात शोधमोहिम तीव्र केले असून सविस्तर माहिती सायंकाळी ५.३० वाजता आयोजित पत्रकार परिषदेतून देणार असल्याची माहिती पोलीस विभागाने कळविली. पोलिसांना मोठे यश मिळाल्याचे बोलले जातंय.

