Headlines

Electricity Bill Waiver: थकबाकीवर माफीची मात्रा – maharashtra farmer electricity bill of rs 48 thoudand crore waiver special explained


राज्यातील शेतीपंपांच्या वीजबिलांची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा हा शेतकऱ्यांच्या जुन्या दुखण्यावरील इलाज म्हणता येईल. दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिलेला हा दुसरा दिलासा आहे. यामुळे सुमारे ४८ हजार कोटी रुपयांची थकबाकी माफ होणार असून, सुमारे ३० लाख शेतीपंपधारक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. या योजनेचे तपशील, त्यातील अटी-शर्ती अद्याप सरकारने जाहीर केलेल्या नाहीत; तसेच या योजनेसाठी पैसे कोठून आणणार, याचेही उत्तर सरकारने दिलेले नाही.

ही माहिती जाहीर झाल्यावरच त्याचे नेमके लाभ समोर येतील. परंतु, गेल्या वर्षी अतिवृष्टीने दिलेल्या फटक्यातून सावरत असतानाच यंदा दुष्काळी स्थितीच्या छायेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांची या थकबाकीतून सुटका होण्याची आशा या घोषणेमुळे निर्माण झाली आहे. शेतीपंपांसाठीच्या अनियमित वीजपुरवठ्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवण्याची दुसरी घोषणाही लाभदायक आहे. सध्या भारनियमनामुळे सुरू असलेली संतप्त शेतकऱ्यांची आंदोलने सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर बारा तास विजेची घोषणा प्रत्यक्षात येणे महत्त्वाचे आहे.

शेतीचा वीजपुरवठा, हा अनेक दशके चर्चा-वादांचा विषय. विधानसभेच्या निवडणुकीत तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांनसाठी ‘ मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ’ लागू केली; त्यामुळे ४० लाख शेतकऱ्यांना चालू वीजबिले येत नाहीत. मात्र, जुन्या बिलांची थकबाकी मोठी होती आणि ती वसूल होण्याची शक्यता अत्यल्प होती. शेतकऱ्यांच्या बिलांमध्ये थकबाकी दिसत असल्याने त्यांना नवी वीजजोडणी घेण्यात किंवा क्षमतावाढ करण्यात अडचणी येत होत्या, तर दुसरीकडे ताळेबंदात दिसणारा शेतीपंपांच्या वीजबिलांच्या थकबाकीचा डोंगर, ही ‘महावितरण’पुढील डोकेदुखी ठरली होती. अश्वशक्तीनुसार आकारण्यात आलेली ही बिले वादाचा विषय ठरली होती. कमी वीजवापर असतानाही अव्वाच्या सव्वा वीजबिले येत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या.

राज्य वीज नियामक आयोगाने नियुक्त केलेल्या कार्यगटांनी केलेल्या अभ्यासातही अशा बाबी आढळल्या होत्या. दुसरीकडे वीज वितरणातील गळती व चोरीचे प्रमाण १५ ते २० टक्क्यांवर पोहोचले होते; मात्र ते झाकण्यासाठी हा सर्व वीजवापर शेतीपंपांच्या बिलांमध्ये समाविष्ट करून तो शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येतो, असे आरोप अनेक शेतकरी नेते आणि वीजतज्ज्ञांनीही केले होते. ‘सरकार सावकारी पद्धतीने वीजबिलांची वसुली करते,’ असे आरोप फडणवीस यांनी पूर्वी विरोधात असताना केले होते आणि मध्य प्रदेशाने दिलेल्या अशा माफीचाही हवाला त्यांनी दिला होता.

एकीकडे नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा अशा पद्धतीने आलेली बिले भरण्यास विरोध होता. त्यामुळे ही थकबाकी वाढत गेली. ‘महावितरण’ची एकूण थकबाकी ८० हजार कोटी रुपयांच्या वर पोहोचलेली असताना त्यात शेतीपंपांच्या थकबाकीचे प्रमाण कागदावर तरी मोठे दिसत होते; तिचा निपटारा कधी तरी करावाच लागणार होता. अखेरीस सरकारने ही थकबाकी माफ करून शेतकरी आणि ‘महावितरण’लाही दिलासा देऊन स्वार्थ आणि परमार्थही साधला, असे म्हणता येईल.

अशा योजनांसाठी पैसे कोठून आणायचे, हा लाखमोलाचा प्रश्न. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने’साठी सरकारने २५ हजार कोटी रुपयांची आणि शेतकरी कर्जमाफीसाठी ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. फडणवीस यांच्या घोषणेनुसार वीजबिलांच्या थकबाकीमाफीसाठी ४८ हजार कोटी रुपये उभारावेे लागतील. सरकारने ‘महावितरण’ला अनुदान देणे, केंद्राच्या योजनांतून साह्य किंवा घरगुती-व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीजदरात वाढ करून हा तोटा भरून काढणे असे पर्याय आहेत.

महावितरण’ची फेररचना करून, शेतीसाठी स्वतंत्र कंपनीच्या स्थापनेतूनही काही भरीव व्यवस्था उभी राहणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिलांत माफी किंवा विविध कारणांमुळे अनुदान हे मार्ग अडचणीत नक्कीच आधार देतात; मात्र त्यावर सर्वस्वी अवलंबून राहता येणार नाही; त्यासाठी शेती फायद्यात येणे, हाच एकमेव आणि शाश्वत उपाय असून, आज ना उद्या त्याच मार्गाने जावे लागणार आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत