El nino to increase fish prices probability of reduced mackerel availability; एल-निनोचा परिणाम आता थेट तुमच्या जेवणावर होणार, मासे महागणार; इन्कॉइसने दिला इशारा
El nino to increase fish prices probability of reduced mackerel availability; एल-निनोचा परिणाम आता थेट तुमच्या जेवणावर होणार, मासे महागणार; इन्कॉइसने दिला इशारा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: पापलेट, सुरमई, रावस, जिताडा अशा मातब्बर माशांच्या तुलनेत अगदी स्वस्त आणि म्हणूनच सर्वसामान्य मत्स्यप्रेमींच्या आहाराचा अविभाज्य घटक असलेला बांगडा आता काही महिन्यांतच दुर्मीळ होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या मासळी बाजारांमध्ये ताज्या बांगड्यासाठी होणारी गर्दी आणि पेडव्याच्या हंगामाची वाट पाहणारे मासेप्रेमी… या सगळ्यांवर येत्या काही महिन्यांत एल-निनोचा परिणाम दिसू शकतो. समुद्राचे वाढते तापमान आणि बदलणारे सागरी वातावरण यामुळे बांगडा, पेडवा यांसारख्या माशांच्या उपलब्धतेवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (इन्कॉइस) दिला आहे.
सध्या पॅसिफिक महासागरात विकसित होत असलेला एल-निनो येत्या हिवाळ्यात अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम भारतीय महासागरावरही होणार असून, समुद्रपृष्ठाचे तापमान पुढील वर्षी एप्रिल-मेपर्यंत सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील सागरी परिसंस्थेवर ताण वाढणार आहे. याबाबत इन्कॉइसने आपले पहिले विशेष बुलेटिन सादर करत संभाव्य धोक्यांबाबत माहिती दिली आहे.
तज्ज्ञांच्या मते, समुद्रातील तापमान वाढले की अनेक माशांच्या प्रजाती थंड आणि अनुकूल वातावरणाच्या शोधात खोल पाण्यात किंवा इतर भागात स्थलांतर करतात. त्यामुळे पारंपरिक मासेमारी क्षेत्रांमध्ये त्यांची संख्या कमी होऊ शकते. बांगडा आणि पेडवा या दोन्ही प्रजातींबाबत अशीच शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही माशांची वाढही अपेक्षेइतकी होणार नाही. परिणामी मासळीची पकड कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील किनारी भागात बांगडा आणि पेडवा ही केवळ मासळी नाही, तर अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आहाराचा भाग आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील बाजारपेठांमध्ये या माशांना मोठी मागणी असते. पापलेट, सुरमई, रावस या माशांच्या तुलनेत स्वस्त असलेला बांगडा हा राज्यातील कष्टकरी वर्गाच्या आहारातील मुख्य घटक असतो. त्यामुळे आवक कमी झाली, तर दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचा परिणाम ग्राहकांसह मासेमारी व्यवसायावरही होऊ शकतो.
बंगालच्या उपसागरात यंदाच्या पावसाळ्यात समुद्र अधिक खवळलेला राहू शकतो. त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर किनारी धूप आणि पूरस्थितीचा धोका वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अरबी समुद्र तुलनेने शांत राहण्याचा अंदाज असल्याने पश्चिम किनारपट्टीवरील सागरी कामकाजासाठी काहीसा दिलासा मिळू शकतो.
इन्कॉइसने मासेमारी आणि इतर सागरी क्षेत्रांशी संबंधित घटकांना वेळोवेळी दिले जाणारे इशारे, सूचना आणि सल्ले लक्षात ठेवण्याचे आवाहन केले आहे. समुद्रातील बदलांची ही चाहूल सध्या कागदावर दिसत असली, तरी त्याचे पडसाद पुढील काही महिन्यांत थेट कोळ्यांच्या जाळ्यात आणि सर्वसामान्यांच्या ताटात उमटू शकतात.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा