Tiranga Yatra: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सगळीकडे दिसून येत असताना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी तिरंग्याप्रती असलेल प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित केली.

तिरंगा यात्रा
‘स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करणे, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणे; तसेच राष्ट्रध्वज तिरंग्याप्रति असलेला अभिमान, सन्मान आणि आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रा क्रांती चौकात पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी ते बोलत होते.
भाजप पदाधिकाऱ्यांसह युवावर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
याप्रसंगी विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकाऱ्यांसह युवावर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगराने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मागे टाकले
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई, पुणे येथे तिरंगा यात्रेला प्रचंड गर्दी होती, परंतु छत्रपती संभाजीनगराने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मागे टाकले. ही गर्दी पाहता देवगिरी किल्ल्यावरील सर्व सेना क्रांती चौकात उतरल्याचे दिसते. आपला राष्ट्रध्वज – तिरंगा हा आपली आनबान आणि शान आहे. ह्या तिरंग्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले. हा तिरंगाहीच आपली खरी ओळख आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संदेश दिला, ९ ते १५ ऑगस्टपर्यंत तिरंगा यात्रा काढून देशप्रेमाने ओतप्रोत मातृभूमीचे दर्शन घडवू. त्यानुसार आज हा जनसमुदाय तिरंग्याच्या प्रेमासाठी एकत्र आला आहे.
देश बदलतोय, राज्य बदलतंय
फडणवीस पुढे म्हणाले की, जगात बलशाली देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली. जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केले. राज्याची अर्थव्यवस्था २०१३-१४ मध्ये १२ ते १३ लाख कोटी रुपये होती. जी वाढून आता सुमारे ५० लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. देश बदलतोय, राज्य बदलतंय, मराठवाड्यातही परिवर्तन होत आहे.
पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही.
या पिढीने दुष्काळ पाहिला. आमचा संकल्प आहे मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनीमार्गे मराठवाड्यात आणून इथला भाग सुजलाम सुफलाम करू.आपण तिसरी स्टार्ट अप इको सिस्टीम तयार केली. त्यात तरुणाईचे योगदान मोठे आहे. नव संशोधनात तरुणाई अग्रेसर आहे. त्याबळावरच आपला भारत विकसित भारत म्हणून वाटचाल करीत आहे,असे त्यांनी नमूद केले.
देशापेक्षा १३ महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले.
मराठवाड्याला देशापेक्षा १३ महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले. निजामाच्या राजवटीतून मोकळा श्वास घेण्यासाठी हजारो देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांचे स्मरण आपण करू. आज आपण एक प्रतिज्ञा करू. आपल्या देशासाठी,राज्यासाठी समाजासाठी जगू, देशासाठी गरज पडली तर मरायला तयार राहू, असे त्यांनी नमूद केले. सभास्थानी प्रारंभी वंदे मातरम्, राज्यगीत झाले व राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.
राजकीय नेतृत्वात हिंमत नव्हती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकात देशाला प्रगतीपथावर नेले. २०१४ पूर्वी भारताला एक कमजोर देश म्हणून बघितले जात होते. दहशतवादी स्फोट घडवून निघून जात. आपल्या सैनिकांमध्ये ताकद होती, परंतु तत्कालीन राजकीय नेतृत्वात हिंमत नव्हती. २०१४ मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी सांगितले, की खबरदार आमच्या देशाकडे वाकडी नजर केली, तर घुसकर मारेंगे…आणि आपल्या सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या घरात घुसून मारले, असे फडणवीस यांनी सांगितले.

