Devendra fadnavis serious allegations on rahul gandhi pune event registration of female students; राहुल गांधींचा पुण्यात तरुणांशी संवाद कार्यक्रम; विद्यार्थिनींच्या सहभागावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केला गंभीर आरोप
Devendra fadnavis serious allegations on rahul gandhi pune event registration of female students; राहुल गांधींचा पुण्यात तरुणांशी संवाद कार्यक्रम; विद्यार्थिनींच्या सहभागावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी केला गंभीर आरोप
नागपूर : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात तरुण आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. ‘छात्रों की गूँज’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी तरुणांशी संवाद साधत आहेत, ही आनंदाची बाब आहे. मात्र, हा संवाद सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी खुला असता तर अधिक आनंद झाला असता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावा केला की, “माझ्याकडे जी माहिती आहे, त्यानुसार काँग्रेसच्या नेत्यांकडून संचालित महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची नोंदणी करून त्यांनाच या कार्यक्रमात आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्याही आपल्याच मुली आहेत आणि राहुल गांधी त्यांच्याशी संवाद साधत आहेत याचा आनंद आहे. ‘छात्र संवाद’ असे राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचे नाव देण्यात आले आहे. हा कार्यक्रम खुला ठेवला असता आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यामध्ये सहभागी होता आले असते, तर अधिक चांगले झाले असते. मात्र, पुणे आणि पुण्याच्या आसपास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या किंवा नेत्यांच्या शिक्षण संस्था आहेत, त्या शिक्षण संस्थांमधील मुला-मुलींनाच या कार्यक्रमासाठी बोलावण्यात आले आहे. काँग्रेसच्या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांनाच या कार्यक्रमात प्रवेश दिला जात असल्याने राहुल गांधी यांचा हा कार्यक्रम एका नियंत्रित वातावरणात होत आहे,” असा हल्लाबोल फडणवीस यांनी केला.
दरम्यान, ‘वंदे मातरम्’च्या दोनच कडव्यांच्या मुद्द्यावरूनही फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. स्वतंत्र भारताच्या संसदेत घेतलेला निर्णय न मानणे ही संविधानविरोधी भूमिका असल्याचे ते म्हणाले. भारतात आता इंग्रजांचे राज्य नाही, भारत स्वतंत्र आहे, भारताच्या संसदेने घेतलेला निर्णय हा संविधानिक असतो. स्वतंत्र भारताच्या संसदेत घेतलेला निर्णय न मानणे आणि गुलामीच्या परंपरेचे पालन करणे, हे मानसिक गुलामीचे लक्षण आहे. संविधानाच्या विरोधात वागण्याची मानसिकता अशा वक्तव्यांतून दिसून येते, असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्र्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या निर्णयाचेही देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले. विद्यापीठे ही देशाचे भविष्य घडवणारी केंद्रे आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास सरकारची दिशा, देशासमोरील आव्हाने आणि जगातील बदल याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या आकांक्षा आणि भावना थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेविषयी काय म्हणाले मुख्यमंत्री?
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. योजनेचे नियम आणि निकष ठरवण्यात आले असून लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एक कोटी ६५ लाख महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असून त्या पात्र ठरल्या आहेत. पात्र महिलांना कोणताही खंड न पडता योजनेचे पैसे मिळत राहतील, असे त्यांनी सांगितले. काही लाभार्थ्यांच्या कुटुंबात आयकर भरणारे सदस्य असल्याचे, तर काही महिला सरकारी नोकरीत असल्याचे पडताळणीत समोर आले. अशा अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. काही पुरुष लाभार्थीही आढळून आले असून त्यांनाही योजनेतून थेट वगळण्यात आले आहे.
सरकारी नोकरीत असलेल्या महिलांनी नियमबाह्य पद्धतीने योजनेचा लाभ घेतल्याचे आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा सरकारचा विचार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत आमचे सरकार आहे, तोपर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळत राहतील, लाडकी बहीण योजना बंद करण्याची मागणी करणारेच आता या योजनेबाबत सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसची भूमिका ही राजकीय सोयीची असून मतांच्या लांगूलचालनासाठी अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा