तीन वर्षांचा चिमुकला अंधारात स्कूटरवर रडत होता. नाना, नाना म्हणत तो अश्रू ढाळत होता. तेव्हा काही वाटसरुंचे लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यानंतर धक्कादायक उलगडा झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती: आई, वडील आपल्या मुलांसाठी प्रत्येक संकटाचा सामना करतात. आपल्या लेकरांसाठी आई, बाप अडचणींशी दोन हात करतात. पण आंध्र प्रदेशातील एका जोडप्यानं आपल्या चिमुकल्याला अंधाऱ्या रात्री स्कूटर जवळ सोडून गोदावरी नदीत उडी घेतली. तीन वर्षांचा चिमुकला स्कूटरवर धाय मोकलून रडत होता. आपल्यानंतर लेकराचं काय होईल, याचा विचार न करताच त्याच्या आई, वडिलांनी जीवन संपवलं. नकळतण्या वयात आई, वडिलांच्या मायेला पोरका झाला. ही दुर्दैवी घटना पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील चिंचिनाडा वशिष्ठ पुलावर घडली.
तीन वर्षांचा चिमुकला स्कूटरवर रडत राहिला. पण त्या परिस्थितीतही त्याचे आई, वडील त्याला एकटं सोडून गेले. त्यांनी गोदावरी नदीत उडी घेतली. गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. ३ वर्षांचा मुलगा आता अनाथ झाला आहे. त्याच्या आई, वडिलांची ओळख पटली आहे. डोडा साई (२९) आणि शिरीषा (२८) अशी त्याच्या आई, वडिलांची नावं आहेत. ते वेलपुरु गावचे रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साई आणि शिरीषा गुरुवारी रात्री १० च्या सुमारास त्यांच्या ३ वर्षीय मुलाला स्कूटरवर घेऊन पुलाजवळ पोहोचले. त्यावेळी नदीतील पाण्याची पातळी जास्त होती. त्यांनी मुलाला स्कूटरवर सोडलं. अंधाऱ्या रात्री मुलगा पुलावर एकटाच रडत होता. वाटसरुंचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
अम्मा… नाना… म्हणत चिमुकला रडत होता. आई, वडील चिमुकल्याला सोडून दूर गेल्याचं पादचाऱ्यांच्या लक्षात आलं. थोड्याच वेळात पोलीस तिथे दाखल झाले. त्यांनी मुलाला सोबत नेली. स्कूटरही ताब्यात घेतली. यानंतर मुलाला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आलं. नदीत उडी घेतलेल्या जोडप्याचा शोध सुरू करण्यात आला. दोघांचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. पण शोध मोहीम सुरूच आहे.
मुलाचे वडील डोडा साई चालक म्हणून काम करत होते, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. आंध्र प्रदेशात येण्याआधी ते आखाती देशात काम करत होते. कर्ज आणि आर्थिक विवंचना यामुळे ते त्रस्त होते. त्यामुळे त्यांना घरही विकावं लागलं. पण जोडप्याच्या मृत्यूमागे हेच एकमेव कारण असल्याचं पोलिसांच्या तपासात सिद्ध झालेलं नाही. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. जोडप्याच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. त्यांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा