Headlines

chandrapur kidney sale racket busted 50 kidney sold cash transaction of up to rs 80 lakh for one ; 50 जणांच्या किडनींची विक्री? देशभरात रॅकेट सक्रिय; एकासाठी 80 लाख रुपयांपर्यंतचा रोखीने व्यवहार


Chandrapur Kidney Racket: सुरुवातीला हा गुन्हा केवळ कम्बोडियाशी संबंधित असल्याचे वाटत होते. मात्र तपास पुढे जाताच देशभरातील नामांकित रुग्णालये, डॉक्टर आणि दलालांची साखळी उघड झाली आहे.

chandrapur kidney racket
पन्नास जणांच्या किडनींची विक्री(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
पंकज मोहरीर, चंद्रपूर: किडनी रॅकेटमध्ये आजवरच्या तपासात ११ जणांची किडनीविक्री झाल्याचे अधिकृतरित्या समोर आले आहे. मात्र या रॅकेट अंतर्गत महाराष्ट्रासह विविध राज्यांतून सुमारे ५० जणांची किडनी विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सखोल तपास करण्यात आल्यास हा आकडा निश्चित होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील ३६ वर्षीय शेतकरी रोशन कुळे यांनी सावकारी कर्जापायी आपली किडनी विकल्याचे प्रकरण १६ डिसेंबर २०२५ रोजी उघडकीस आले होते. कुळे हे खासगी सावकारांच्या कर्जामुळे प्रचंड मानसिक तणावात होते. कर्ज फेडण्यासाठी कोणताही मार्ग उरला नसल्याने त्यांनी समाजमाध्यमाचा आधार घेतला. फेसबुकवर किडनीविक्री संदर्भात शोध घेत असताना त्यांची भेट डॉ. कृष्णा नावाच्या प्रोफाइलशी झाली. आरोपीने रोशन यांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांना किडनीच्या बदल्यात आठ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विमानाचे तिकीट आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करून रोशन यांना कम्बोडियाला नेण्यात आले. तिथल्या एका खासगी रुग्णालयात कुळे यांची किडनी काढण्यात आली. याविषयीच्या अधिक तपासातून किडनी रॅकेट उघडकीस आले.

Maharashtra TimesCrime News : आठवीतील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे, नामांकित शाळेतील शिक्षकाला अटक, महाराष्ट्र सुन्न
किडनी प्रत्यारोपण प्रकरणाचे देशांतर्गत जाळे उघड झाले. तामिळनाडू राज्यातील त्रिची शहरातील स्टार किम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी व दिल्ली येथील डॉ. रवींद्रपाल सिंग यांनी आपल्या रुग्णालयात अवैधरित्या किडनी प्रत्यारोपण केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. किडनी घेणाऱ्या व्यक्तीकडून ५० ते ८० लाख रुपये घेतले जात असल्याचे यातून उघड झाले असून किडनी देणाऱ्या व्यक्तीला फक्त पाच ते आठ लाख रुपये मिळत होते. डॉ. रवींद्रपाल सिंग याला दहा लाख रुपये, डॉ. राजरत्नम गोंविदस्वामीला सर्जरी व हॉस्पिटल उपलब्ध करून देण्यासाठी २० लाख तर क्रिष्णा उर्फ रामकृष्ण सुंचू व इतर लोकांना २० लाख रुपये मिळत होते.

या एकूणच प्रकरणात आतापर्यंत सहा सावकारांसह एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या किडनी विक्री प्रकरणात डॉ. रवींद्रपाल सिंग व तामिळनाडूचे डॉ. गोंविदस्वामी हे दोन प्रमुख आरोपी आहेत. क्रिष्णा व हिमांशू भारद्वाज यांचा साथीदार पॉल आणि डॉ. गोविंदस्वामी अद्याप फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध राज्यांत रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी ‘मटा’शी बोलताना दिली. तीन सावकारांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
Maharashtra TimesPolice Bharti: संग्रामचं वर्दीचं स्वप्न अधुरंच राहिलं, १६०० मीटर धावताना अचानक कोसळला; भर मैदानात काय घडलं?
दरम्यान, डॉ. सिंग याने चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना वारंवार ‘मला आठवत नाही’ असे उत्तर दिले होते. परिणामी किडनी रॅकेटची प्रगती मंदावली होती. मात्र आता कोलकाता, त्रिचीसह अनेक प्रयोगशाळांमधील वैद्यकीय व रक्त तपासणीची महत्त्वाची कागदपत्रे मिळालेली आहेत. नेमक्या किती लोकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या याबाबत माहिती पुढे येणार आहे.

उद्या डॉ. सिंगची सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून डॉ. रवींद्रपाल सिंग याला तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर चंद्रपूर पोलिसांसमोर तो हजेरी लावत आहे. यादरम्यान पोलिसांकडून चौकशी केली जात असली, तरी त्यात त्याच्याकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. याप्रकरणी उद्या, २४ फेब्रुवारी फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे
Maharashtra TimesChandrapur Crime: बायको नांदत नव्हती, आई सांभाळत होती; दारुडा मुलगा जन्मदात्या आईवर तुटून पडला, माऊलीनं जागेवर जीव सोडला, कारण फक्त….
कर्जाच्या विळख्यात अडकलेले लक्ष्य
डॉ. कृष्णा प्रामुख्याने कर्जबाजारी आणि आर्थिक संकटात सापडलेल्या युवकांना आपले लक्ष्य करीत होता. पीडितालाही कर्जातून मुक्त होण्यासाठी पैशांची गरज होती, अशाचाच फायदा या रॅकेटने घेतला.

२० कोटींची उलाढाल उघड
राज्य सरकारने विशेष तपास पथकाचे (एसआयटी) प्रमुख तथा अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांना मानवी अवयव आणि प्रत्यारोपण कायदा (थोटा), १९९४ अंतर्गत आरोपींची चौकशी आणि खटला चालवण्यासाठी अधिकृत केले आहे. एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासादरम्यान मागील काही महिन्यात बँक खात्यातून सुमारे २० कोटींचा व्यवहार झाला असल्याची माहिती आहे. मात्र ते पैसे त्यांच्या नियमित व्यवहारातील असल्याचा अंदाज असून तसा हा आर्थिक व्यवहार रोख रकमेनेच झाले असण्याची दाट शक्यता आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा