Headlines

हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर:पक्ष वाढीसाठी एकही बैठक नाही




हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले असून नेत्यांनी एकही बैठक घेतली नसल्याने पक्षाला बळ कसे मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्या ऐवजी इतरांकडेच विशेष लक्ष दिले जात असल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ असून हिंगोली भाजपाकडे, कळमनुरी शिंदेसेनेकडे तर वसमत राष्ट्रवादीकडे आहे. तर पालकमंत्री राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष वाढीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. तर भाजपाने हिंगोली जिल्ह्यात पक्षाला बळ मिळण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत. पक्षाच्या वारंवार बैठका घेऊन कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेतले जात आहे. तसेच शिंदेसेने कडून देखील पक्ष कार्यकर्त्यांना बळ देऊन जिल्ह्यात पक्ष वाढ केली आहे. तसेच महत्वाच्या पदासाठी कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्यामागे पाठबळ उभे केले आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदेसेनेला पक्ष वाढीसाठी मोठे पाठबळ मिळाले आहे मात्र या तुलनेमध्ये हिंगोलीचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे असताना देखील त्यांनी पक्ष वाढीसाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या नाहीत. केवळ ध्वजवंदनासाठी येणाऱ्या पालकमंत्र्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष केले. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समिती व इतर बैठकांच्या वेळी देखील पालकमंत्र्यांकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना पाठबळच देण्यात आले नाही त्या तुलनेत इतर पक्षाच्या नेत्यांनी आपापले कार्यकर्ते सांभाळून ठेवले. योजनांच्या निधी वाटपाचा वेळी देखील राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देण्यात आले. कार्यकर्त्यांकडून वारंवार निधीची मागणी केल्यानंतरही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले त्याचा परिणाम कार्यकर्त्यांच्या नाराजीतून उमटू लागला आहे. निधी वाटपाच्या वेळी कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान देऊन इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना जवळ करणाऱ्या पालकमंत्र्यांच्या धोरणामुळे कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आता पालकमंत्र्यांकडून हिंगोली जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी कधी बैठका घेतल्या जातात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत