Headlines

Boat Capsizes in Godavari River 2 Women Death in Jalna


जालन्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. 40 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली आहे. या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर इतर प्रवाशांना वाचवण्यात स्थानिक प्रशासन आणि गावकऱ्यांना यश आलं आहे.

Jalna News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : जालना जिल्ह्यातील गोळेगाव येथे मंगळवारी सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. गोळेगाव येथून बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे जाणारी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीत बुडाल्याने दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य राबविण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गोळेगाव आणि पुरुषोत्तमपुरी या 2 गावांदरम्यान गोदावरी नदी ओलांडण्यासाठी नागरिकांकडून बोटीचा वापर केला जातो. संबंधित बोट ही वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याच बोटीमधून प्रवाशांची वाहतूक केली जात होती. घटनेच्या वेळी बोटीत क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवल्यामुळे नदीच्या मध्यभागी पोहोचताच बोटीचा तोल गेला आणि ती पाण्यात बुडाली.

बोट बुडाल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक जणांनी जीव वाचविण्यासाठी पोहण्याचा प्रयत्न केला, तर काही जण नदीच्या प्रवाहात वाहून जाण्याची भीती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत नदीत उतरून अनेक प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांच्या पथकाने घटनास्थळीच जखमींवर प्राथमिक उपचार केले. या घटनेतील गंभीर स्वरूपाच्या काही जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

या दुर्घटनेत 2 महिलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा येथील कुंबेफळ गावच्या रहिवासी कांता ज्ञानदेव आंधळे यांचा या घटनेत मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव जालनाच्या आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. तर बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गावच्या प्रमिला शेषराव राठोड यांचादेखील या घटनेत मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईक बीडच्या माजलगाव येथे त्यांचा मृतदेह घेऊन गेले आहेत.

गोदावरी नदीत 40 प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी बोट बुडाली

अपघातातील जखमी 12 महिलांना जालन्याच्या आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. तर इतर जे प्रवासी होते त्यांना कुठलीही दुखापत झाली नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, वाळू उपसा करणाऱ्या बोटीमधून प्रवासी वाहतूक कशी करण्यात आली? तसेच बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी का बसविण्यात आले? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाकडून घटनेचा सविस्तर पंचनामा करण्यात येत असून पुढील तपास सुरू आहे. गोदावरी नदीतील या दुर्घटनेमुळे नदीमार्गे होणाऱ्या प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा