महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Biggest Oil Producer in the World: इराण आणि अमेरिकेत कधी ‘घडलंय’ तर कधी ‘बिघडलंय’ असंच पाहायला मिळत आहे. पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी 60 दिवसांसाठी शांतता करार केला आणि अमेरिकेने इराणला पुन्हा एकदा जागतिक बाजारात तेल विकायला ग्रीन सिग्नल दिला. होर्मुझ सामुद्रधुनी खुली झाल्यानंतर तेलपुरवठा कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुन्हा सुरू होण्याची आशा निर्माण झालेली पण अजूनही अडथळा कायम असल्याचं दिसत आहे.

पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुझ सामुद्रधुनी ठप्प पडली, जी जगाला 20% हून अधिक कच्च्या तेलाचा पुरवठा करते. परिणामी युद्ध सुरू राहिल्यास जगाला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तेल संकटाला सामोरे जावे लागेल, असा तज्ञांनी इशारा दिला होता.
इराण-अमेरिकेत 60 दिवसांचा करार
मात्र, अशी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच अमेरिका आणि इराण यांच्यात 17 जून रोजी शांतता करार झाला. दोघांनी पश्चिम आशियातील संघर्षाला विराम लावण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आणि यासह 60 दिवसांची वाटाघाटी सुरू झाली. सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर अमेरिकेने इराणच्या तेलावरील निर्बंध 60 दिवसांसाठी उठवले, ज्यामुळे इराणला पुन्हा एकदा बाजारात तेल विकायची संधी मिळाली. आता अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेला तेलाचा खेळ जगाने पाहिला, त्यामुळे या खेळातील सर्वात मोठा खेळाडू कोण आहे हेही समजून घेणे महत्त्वाचे आहे.
कोण आहे तेलाचा बादशाह?
अमेरिका जागतिक तेलाचा महाकाय देश असून इथे कच्च्या तेलाचे सर्वाधिक उत्पादन केले जाते. यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे EIA नुसार, 2025 पर्यंत अमेरिका दररोज 13.5 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेलाचे उत्पादन करेल. तसेच जगाच्या एकूण कच्च्या तेल उत्पादनापैकी एकट्या अमेरिकेचा 16% वाटा आहे.
कुठं होतं कच्च्या तेलाचे सर्वाधिक उत्पादन
एकीकडे क्रूडच्या उत्पादनात रशिया आघाडीवर होता, पण सध्या अमेरिकेने पुढाकार घेतल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास एक चतुर्थांश उत्पादन पर्मियन बेसिनमधून होते, जे पश्चिम टेक्सास आणि आग्नेय न्यू मेक्सिकोपर्यंत पसरलेले आहे. तसेच पर्मियन बेसिन आणि टेक्सासशिवाय अलास्का आणि मेक्सिकोच्या आखातातही अमेरिकेकडे तेलाचे कोठे साठे आहेत.
रशियाच्या कच्च्या तेलाचे उत्पादन घटले
अशाप्रकारे, जगात सर्वाधिक तेलाच्या उत्पादनात अमेरिकेमागे रशियाचा नंबर लागतो, ज्याच्या उत्पादनात 2025 मध्ये 10.5 दशलक्ष बॅरलपर्यंत वाढ अपेक्षित आहे. तब्बल चार वर्षांपेक्षा जास्त काळापासून युक्रेनसोबत युद्ध लढणाऱ्या रशियाला या काळात परिणामही भोगावे लागले आहेत. 2022 पासून रशियाच्या कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट होत गेली असून 2022 च्या तुलनेत 2025 मध्ये त्यात 4% हून अधिक घट दिसून आली आहे.
आखाती देशांची परिस्थिती काय?
आखाती देशांमध्ये कच्च्या तेलाच्या विहिरी आहेत, म्हणूनच तेलाच्या उत्पादनात या प्रदेशातील देश आघाडीवर असतात. आखाती देश अजूनही जगातील सर्वात मोठे तेल केंद्र असून पहिल्या 10 तेल उत्पादकांमध्ये 5 मध्य-पूर्वेकडील देश आहेत. सौदी अरेबियाने दररोज 9 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाचे उत्पादन करून आघाडी घेतली तर, इराक दररोज 4.3 दशलक्ष बॅरल उत्पादन करतो, इराणने 4.2 दशलक्ष बॅरल, संयुक्त अरब अमिरातीने 3.8 दशलक्ष आणि कुवेतने 2.6 दशलक्ष बॅरल उत्पादन केले.
तेलाचा सर्वात मोठा तेल साठा कुठं?
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा तेलसाठा आहे. व्हेनेझुएलाकडे 303 अब्ज बॅरल तेलाचा साठा असल्याचं ओपेकच्या आकडेवारीनुसार स्पष्ट होते. त्याचवेळी, सौदी अरेबियाकडे 367 अब्ज बॅरल तेल साठा, इराणकडे 208 अब्ज बॅरलपेक्षा जास्त आणि अमेरिकेकडे केवळ 45 अब्ज बॅरल तेलसाठा आहे.
