Headlines

Nagpur BJP State President Ravindra Chavan Told to Activists and Leaders Importance of Social Media; ‘आपण सोशल मीडियावर कमी पडतो’; भाजप नेते अन् कार्यकर्त्यांना रविंद्र चव्हाणांकडून थेट कानपिचक्या, नेमकं काय म्हणाले?


Nagpur Ravindra Chavhan on Social Media : ‘नागपूर पदवीधर मतदारसंघातील विजयासाठी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील एकूण अंदाजे 12 लक्ष सुशिक्षित पदवीधर मतदारांपैकी किमान 50 हजार नवे मतदार नोंदणी करून घ्यावे आणि सोशल मीडियावर तसेच नागरिकांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीत सक्रिय होत केंद्र तसेच राज्य सरकारने केलेल्या कामांचं प्रमोशन करावं’, अशा सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना दिल्या.

Nagpur Ravindra Chavhan on Social Media
भाजप आमदार रविंद्र चव्हाण बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर केंद्र आणि राज्य सरकारचं काम लोकांपर्यंत पोहचवण्याचा कानमंत्र दिला. ‘यात कुठंतरी इतका मोठा पक्ष असताना दुर्लक्ष होत’, असल्याचं म्हणत रविंद्र चव्हाणांनी चांगलंच सुनावल्याची चर्चा आहे. भाजपकडे मोठं संघटन, पण पक्ष डिजिटल प्लॅटफॉर्मवर अपेक्षित ताकदीनं सक्रिय नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि एक्ससारख्या माध्यमांवर पक्षाची भूमिका आणि सरकारची कामे प्रभावीपणे पोहोचवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

रविंद्र चव्हाण काय म्हणाले?

नागपूर शहर, ग्रामीण आणि वर्धा मिळून सुमारे अंदाजे सत्तर लाख लोकसंख्या आहे. यापैकी सुशिक्षित पदवीधर अंदाजे 12 लाख असावेत असा अंदाज आहे. आपली राज्यात दीड लाखांपेक्षा जास्त सक्रिय सदस्य असलेली पार्टी. इथल्या 80 टक्के लोकांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय असल्याचं सांगितलं आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्याचे मुख्यमंत्रीआणि राज्याचे मंत्री यांनी घेतलेले निर्णय पाहून त्यासाठी डिजाइन बनवून तुमचं नाव, तुमचं पद यांचा उल्लेख करून आपल्या पेजवर टाकत राहिलो आणि शेअर करत राहिलो तर महाराष्ट्रात एक चांगलं वातावरण तयार करण्यात यशस्वी ठरू.

Maharashtra TimesRatnagiri News : आदल्या दिवशी विद्यार्थ्यांना शिकवलं, दुसऱ्या दिवशी निधनाची बातमी, लाडके राहुल सप्रे सर सोडून गेले; विद्यार्थ्यांसह अख्खं गाव भावूक
आपल्यापैकी सोशल मिडिया क्षेत्रात तज्ज्ञ कोण आहे. त्याचे ऐकून हे जर केलं तर त्याचे परिणाम लवकर दिसतील. केंद्र आणि राज्य सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचविणे, यावर भर दिला पाहिजे. काही शक्ती अजेंडा घेऊन उतरतील. मग आपण काय करावं? तुमच्यापैकी नगरसेवक किती आहेत इथे. फक्त नगरसेवकच नाही, बाकी बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आदी मुख्य कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे. आपण जेव्हा लोकांच्या भेटी घेतो. तेव्हा ते आपल्या समस्या सांगतात. त्या ऐकल्याच पाहिजे. पण त्याचवेळी आपण व्होकल झालो पाहिजे. आपली भाजप कार्यकर्ते म्हणून वेगळी ओळख व्हावी आणि आपण ठरवायचं की, अशावेळी त्यांना काय सांगावं?

अटलजींपासून मोदीजींपर्यंत राष्ट्रहिताचाच अजेंडा

आपण राजकारणात कशासाठी आहोत. सत्तेसाठी नव्हे तर राष्ट्राचे हित साधण्यासाठी आहोत. गेल्या काही काळात आपण प्रत्येक निवडणुका जिंकत आहोत. आपला जाहीरनामा अजेंडा हा अटलजींपासून मोदीजींपर्यंत राष्ट्रहिताचाच तोच अजेंडा आहे. वेगळं काही नाही. राष्ट्राचं हित आणि विकास हाच अजेंडा आहे. पश्चिम बंगालची निवडणूक जिंकल्यानं देशाचं काय भलं झालं ते आपल्याला सर्वांना माहिती असून आपण बोलत नाही. ते आपण सांगितलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्याच दिवशी कॅबिनेट निर्णय झाला की घुसखोरी जिथून होते ती जागा केंद्राला देण्याचा निर्णय झाला. मोदींनी देशाच्या पुढील भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक निर्णय घेतले आहेत. आपण जर तिरंगा रॅली करत आहोत तर कशासाठी ते सांगितलं पाहिजे, असंही चव्हाणयांनी स्पष्ट सांगितलं.

Maharashtra TimesRamraje Nimbalkar : जोपर्यंत राजा टिकून, तोपर्यंत खेळ जिवंत, रामराजेंचा इशारा नेमका कुणाला?
रशियाच्या अंतराळवीरांनी भारताचा तिरंगा दाखवून भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. का दिल्या? भारत त्या स्थितीत पोहोचला आहे. 2047चा विकसित भारत बनविण्यासाठी आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा काय रोल आहे ते सांगणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात आधी दुष्काळ कसा होता. आपण काय करू शकलो. कागदावर असलेल्या योजना प्रत्यक्षात आणल्या. याला केंद्राचं असलेलं योगदान काय. पुढच्या पिढीला दिशा देणाऱ्या या सर्व योजना आहेत. 14 तास लोडशेडींग होतं. आज वन नेशन वन ग्रीड योजना राबवली गेली. विजेचा पुरवठा, विजेचे दर कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न केले गेले. उद्योग क्षेत्रात काय होत आहेत. GST वर बोललो पाहिजे. या सर्व गोष्टी लोकांपर्यंत चांगलं सांगण्यास सुरुवात करा. ज्या राष्ट्रीयत्वाच्या धाग्यानं आपण सारे जोडले गेलो आहोत, ज्या राष्ट्रीयत्वसाठी आपण राजकारणात आलो, ते आपले मूळ सामान्य लोकांपर्यंत अधिक प्रमाणात सांगायला सुरुवात करा.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा