Bhandup Woman falls off 10th floor of SRA Building saved after falling on tree Crime News; भांडुपमध्ये दहाव्या मजल्यावरुन नवविवाहिता पडली, पण झाडावर अडकून बचावली; मांडीत फांदी घुसली, फायर ब्रिगेडने कौशल्याने उतरवलं
Bhandup Woman falls off 10th floor of SRA Building saved after falling on tree Crime News; भांडुपमध्ये दहाव्या मजल्यावरुन नवविवाहिता पडली, पण झाडावर अडकून बचावली; मांडीत फांदी घुसली, फायर ब्रिगेडने कौशल्याने उतरवलं
Bhandup Woman falls off Building saved by tree : इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन खाली पडलेल्या नवविवाहित महिलेचा जीव झाडाच्या फांद्यामध्ये अडकल्याने वाचला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : भांडुपच्या तुळशेतपाडामध्ये एसआरए इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन खाली पडलेल्या एका महिलेचा जीव झाडाच्या फांद्यामध्ये अडकल्याने वाचल्याची घटना बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांनी बचावकार्य करत तिची सुखरूप सुटका केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाला त्यांना खाली उतरवण्यात यश आले. या महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रतीक्षा हिवराळे (२६) असे महिलेचे नाव असून या घटनेमागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
दहाव्या मजल्यावरुन खाली कोसळली
बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास भांडुप पश्चिम तुळशेतपाडामधील सनशाइन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील प्रतीक्षा हिवराळे या राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन खाली पडल्या आणि झाडाच्या फांदीवर अडकल्या. प्रतीक्षा यांनी इमारतीतून उडी मारल्याचा दावा केला जात आहे, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
याबाबत कॉल प्राप्त झाला होताच, तात्काळ अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस दाखल झाले. प्रतीक्षा या सुमारे २० ते २५ फूट उंचीवर होत्या. झाडाच्या फांदीमुळे त्यांचा खाली पडण्याचा वेग रोखला गेला. फांदी त्यांच्या मांडीत घुसल्यामुळे त्या अधांतरी अडकून राहिल्या. मुंबई अग्निशमन दलाने अत्यंत कौशल्याने बचावकार्य राबवून जमिनीपासून सुमारे २० फूट उंचीवरुन त्यांना खाली उतरवले.
“भांडुप पश्चिम येथील तळमजला अधिक २१ मजले असलेल्या एसआरए इमारतीच्या दहाव्या मजल्यावरुन या महिलेने सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास उडी मारली. आम्हाला सकाळी ९:३३ वाजता फोन आला आणि आम्ही त्वरित घटनास्थळी पोहोचलो. एका झाडामुळे तिचा खाली पडण्याचा वेग मंदावला होता, असे तिथे गेल्यावर आम्हाला आढळले. झाडाची साधारण ५०-६० मिमी जाडीची फांदी तिच्या उजव्या मांडीत घुसली होती, त्यामुळे ती झाडावर, जमिनीपासून सुमारे २० फूट उंचीवर अडकून पडली होती. आमच्या जवानांनी ‘अँगस लॅडर’च्या (विशेष शिडीच्या) मदतीने त्या फांदीपर्यंत पोहोचून तिला आधार दिला” अशी माहिती अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिली.
मांडीत घुसलेली फांदी कापली
स्टेशन ऑफिसर व्ही. एस. बंडगर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई अग्निशमन दलाचे पथक ‘क्विक रिस्पॉन्स व्हेईकल’ घेऊन घटनास्थळी पोहोचले. महिलेला अधिक दुखापत होणार नाही याची काळजी घेत, पथकाने सर्वप्रथम इलेक्ट्रिक सॉच्या साहाय्याने त्यांच्या उजव्या मांडीत घुसलेली फांदी कापली.
दरम्यान, जवानांनी कॅनव्हास स्ट्रेचरचा वापर करुन ‘स्लिंग’सारखी (झोळीसारखी) व्यवस्था केली आणि इमारतीच्या वरच्या मजल्यांवरुन दोरांच्या साहाय्याने तिला स्थिर धरुन ठेवले. त्यानंतर, त्या महिलेला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले. तिला रुग्णालयात नेणे शक्य व्हावे यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी तिच्या मांडीत घुसलेली फांदी दोन्ही बाजूंनी कापली. “वैद्यकीय कारणास्तव आम्ही मांडीत घुसलेले फांदीचे तुकडे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही” असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
बरीच दुखापत झाल्याने महिलेला मुलुंड जनरल हॉस्पिटल येथे दाखल केले. प्रथमोपचार करुन त्यांनी पुढील उपचारांकरता सायन रुग्णालयात नेण्यात आले.
जबाब नोंदवणे बाकी
“झाडावर अडकल्यामुळेच त्या महिलेचा जीव वाचला. झाड उंच असले तरी ते खूप मोठे किंवा दाट फांद्यांचे नव्हते; त्याला फारच कमी फांद्या होत्या” असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. शुद्धीवर असलेल्या या जखमी महिलेला सुरुवातीला अग्रवाल रुग्णालयात नेण्यात आले, तिथे तिला प्राथमिक उपचार देण्यात आले; त्यानंतर तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी तिला सायन रुग्णालयात हलवण्यात आले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा