Auto-Rickshaw Fare Hike:शासनाने जाहीर केलेली १ रुपयाने रिक्षा भाडेवाड ही रिक्षाचालक संघटनांना मान्य नाही. भाडेवाढ घसघशीत मिळावी अशी मागणी करण्यात रिक्षा संघटनांकडून करण्यात येत आहे

एक रुपयांची भाडेवाढ मान्य नाही
अशातच रिक्षाचालकांना शासनाने जाहीर केलेली एक रुपयांची भाडेवाढ मान्य नसून अधिक भाडेवाढ मिळावी ,अशी रिक्षाचालक संघटनांची मागणी आहे.ही मागणी मान्य झाल्यास प्रवाशांवरील आर्थिक भार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
अतिरिक्त भार प्रवाशांवर
उच्च न्यायालयाने मीटरप्रमाणे रिक्षा सेवा देण्याचे आदेश दिले असले, तरी कल्याण आणि डोंबिवलीत मीटर रिक्षांची अंमलबजावणी अद्याप पूर्णपणे झालेली नाही. तरीही मीटर दरवाढीचा आधार घेत शेअर रिक्षांच्या भाड्यात वाढ केली जाते. अनेक भागांत रिक्षाचालकांनी सीएनजीआणि सुटे भाग महागल्याचे कारण देत यापूर्वीच भाडेवाढ केली आहे. आता शासनाने केलेली भाडेवाढ लागू केल्यास त्याचा अतिरिक्त भार प्रवाशांवर पडण्याची शक्यता आहे.
भाडेवाढ अपुरी
मागील दोन वर्षांत महागाई वाढल्याचे कारण देत रिक्षा संघटनांकडून भाडेवाढीची मागणी केली जात होती.या पार्श्वभूमीवर नुकत्याच मुंबईत झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत प्रती टप्पा एक रुपया भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही भाडेवाढ सप्टेंबरपासून अमलात येणार असली ,तरी रिक्षा संघटनांनी ती अपुरी असल्याचे म्हटले आहे.
खटुआ समितीच्या अहवालातील निकषांनुसार भाडेवाढ मिळावी ,अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी मान्य व्हावी ,यासाठी संघंटनांनी दबाव निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
प्रवाशांकडून व्यक्त केली जाते.
रिक्षांसाठी ठरवलेले दर हे तीन प्रवासी गृहीत धरून निश्चित केले जातात. प्रत्यक्षात मात्र अनेक भागांत चार प्रवासी बसवले जातात. काही ठिकाणी पाच प्रवासी बसवून वाहतूक केली जाते.यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण होतो. वाहतूक विभागाकडून या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजीही प्रवाशांकडून व्यक्त केली जाते.
रिक्षाचालकांचा भाडेवाढीचा आग्रह प्रवशांना मान्य नाही
वाहतूक विभागाने तपासणी मोहीम राबविल्यास रिक्षाचालकांना चौथी सीट भरणे शक्य होत नाही. अशा वेळी काही ठिकाणी रिक्षा अचानक नाक्यांवरून गायब होतात. तर काही वेळा तीन प्रवाशांकडूनच चौथ्या सीटचे भाडे वसूल केले जाते. या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकांचा भाडेवाढीचा आग्रह प्रवशांना मान्य नसल्याचे दिसते.
एक रुपयांऐवजी सुमारे ३० रुपयांची भाडेवाढ मिळावी
डोंबिवलीतील लाल बावटा संघटनेने मागील दोन वर्षांत भाडेवाढ न झाल्याचा आणि महागाई चार पटीने वाढल्याचा दावा करत एक रुपयांऐवजी सुमारे ३० रुपयांची भाडेवाढ मिळावी,अशी मागणी केली आहे.भाजपप्रणीत संघटनेनेही भाडेवाढीच्या निर्णयावर फेरविचार करण्याची मागणी केली आहे. काही संघंटनांनी एक रुपयांच्या भाडेवाढीचा लाभ घेण्यासाठी मीटर कॅलिब्रेशनसाठी एक हजार ते दीड हजार रुपये खर्च कारावा लागणार असल्याचे अधिक भाडेवाढ आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
आवश्यक ती कार्यवाही केली जाईल
दरम्यान ,याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी शासनाने १ सप्टेंबरपासून एक रुपया भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असला ,तरी त्याचा अध्यादेश प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल , असे त्यांनी स्पष्ट केले.

