Headlines

Amit Shah Meet CM Thalapathy Vijay: कोवलमचा संवादसेतू – amit shah meets tamil nadu cm joseph vijay ahead of southern zonal council meeting


Amit Shah Meet CM Thalapathy Vijay: काँग्रेस कार्यकारिणीने नुकताच लोकसभेची सदस्यसंख्या गोठवण्याचा आणि त्यातूनच महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा ठराव करून आपली या विषयावरील भूमिका स्पष्ट केली आहे. याच परिषदेत कर्नाटकाचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी त्याचाच पुनरुच्चारही केला, ही बाबदेखील लक्षणीय आहे.

amit shah vijay
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मतदारसंघ फेररचनेच्या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दक्षिणेकडील राज्यांच्या प्रमुखांशी साधलेला संवाद आणि या प्रश्नावर आजवर ठाम विरोधी भूमिका घेणाऱ्या तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी घेतलेला सौम्य पवित्रा, यांमधून या गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील विषयातील कोंडी फुटण्याबाबत आशा निर्माण झाली आहे. अर्थात, त्यानंतर तमिळनाडूत उभा राहिलेला राजकीय वाद आणि राज्य सरकारची सारवासारव पाहता ‘दिल्ली अजून दूर’ असली, तरी चर्चा सुरू करण्यासाठी एक पाऊल पुढे पडले, असे म्हणता येईल.

दुसरीकडे शहा यांनीही एका सभेत ‘फेररचनेमध्ये दक्षिणेकडील राज्यांमधील जागा कमी होणार नाहीत,’ अशी हमी दिली आहे. आजवर फोडाफोडीद्वारे फेररचनेवर फेररचनेचे विधेयक मार्गी लावण्यासाठी संख्याबळामागे लागलेल्या केंद्र सरकारनेही सर्वांशी संवाद साधून पुढे जाण्याचे दिलेले संकेतही स्वागतार्ह आहेत. आता या विषयावर सर्व राज्ये-पक्षांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या शंकांचे निराकरण करून पावले टाकली, तर फेररचनेचा तिढा सुटू शकतो; मात्र त्यासाठी ‘बहुमता’ऐवजी ‘सहमती’वर भर द्यावा लागेल.

चेन्नईतील कोवलम येथे शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या दक्षिण विभागीय परिषदेच्या बैठकीत या राज्यांच्या निधी किंवा पाणीवाटपासारख्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसह फेररचनेच्या विषयालाही तोंड न फुटते, तरच नवल! मतदारसंघांची फेररचना आणि महिला आरक्षणाची सांगड घालून संसदेच्या पूर्वीच्या अधिवेशनात आणण्यात आलेले विधेयक विरोधकांच्या ऐक्यामुळे सरकारला दोन तृतीयांश संख्याबळाअभावी मागे घ्यावे लागले. त्यानंतर तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि शिवसेनेतील खासदार फुटले. दुसरीकडे तमिळनाडूमध्ये विजय यांच्या सरकारला पाठिंबा देणारी काँग्रेस व द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) यांच्यातही दुरावा निर्माण झाला. ‘फेररचनेच्या मुद्द्यावर द्रमुक सरकारला पाठिंबा देऊ शकते,’ अशा चर्चा अजूनही आहेत. याच प्रश्नी विजय यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेचाही द्रमुकवर दबाव आहे. त्यातूनच तमिळनाडू विधानसभेत, लोकसभेच्या ५४३ जागांची संख्याच आणखी काही वर्षे कायम ठेवावी, असा ठराव झाला आहे.

त्या पार्श्वभूमीवर विजय यांनी शहा यांच्या उपस्थितीत ‘दक्षिणेकडील राज्यांच्या लोकसभेतील प्रतिनिधित्वाचा टक्का कमी होऊ नये,’ अशी भूमिका घेतली; मात्र त्यात ५४३ जागांवर लोकसभेची सदस्यसंख्या गोठवण्याच्या मुद्द्याचा उल्लेख नसल्याने त्यांची भूमिका सौम्य आणि विधानसभेतील ठरावापासून दूर जाणारी आहे, असा आरोप द्रमुकने केला. नंतर विजय यांच्या सहकारी मंत्र्यांनी आपण मूळ भूमिकेवरच कायम असल्याचे स्पष्टीकरण दिले; मात्र त्यांचा नवा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये त्यातून अस्वस्थता निर्माण झाली.

या सगळ्या मंथनामध्ये लोकसभेची सदस्यसंख्या आणखी २५ वर्षे कायम ठेवावी, या विरोधकांच्या मागणीने जोर धरल्याचे दिसते. सन १९७१ मध्ये ५४३ ही लोकसभेची सदस्यसंख्या ठरली, तेव्हा देशाची लोकसंख्या सुमारे ५५ कोटी होती; आता ती १४० कोटींहून अधिक आहे. एवढ्या मोठ्या संख्येने वाढलेल्या मतदारांपर्यंत पोहोचणे खासदारांना शक्य होत नसल्याने लहान मतदारसंघ हवेत आणि त्यासाठी लोकसभेची संख्या वाढवावी, असा एक मतप्रवाह आहे. दुसरीकडे लोकसभेत आताच सर्व सदस्यांना बोलण्याची संधी मिळत नाही. तेथील सदस्यसंख्या संख्या सातशेहून अधिक झाली, तर सभागृहाचे कामकाज चालवणे, सर्वांना बोलण्याची संधी मिळणे आणि शिस्त राखणे अवघड होईल, अशीही भीती व्यक्त होते.

लोकसंख्येचा एकमेव निकष लावून फेररचना केल्यास प्रचंड लोकसंख्या असलेल्या उत्तरेकडील राज्यांतील मतदारसंघ वाढतील आणि प्रभावी लोकसंख्यानियंत्रण करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी होऊन त्यांच्यावर अन्याय होईल, ही भीती आहेच. आता प्रत्येक राज्यात सरसकट ५० टक्के जागा वाढवण्यासह विविध पर्यायांवर साधकबाधक चर्चा व्हावी आणि सर्व राज्यांमध्ये संतुलन साधून पुढे पावले पडावीत, हीच अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी राजकीय चढाओढीऐवजी सर्वसहमती आणि समन्यायी भूमिकेवर भर द्यावा लागेल.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा