Ajinkya Rahane Retires: आपल्या कारकिर्दीत बहुतांश काळ अजिंक्य हा विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या आधुनिक क्रिकेट नायकांच्या सावलीत खेळत राहिला. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील त्याच्या योगदानावर फारशी चर्चा झाली नाही.

बॉर्डर-गावसकर करंडकाच्या त्या ऐतिहासिक जेतेपदानंतर मुंबईतील निवासस्थानी त्याचे दणक्यात स्वागत झाले. त्याच्या सोसायटीतील सदस्यांनी कांगारूच्या आकाराच्या ‘टॉपिंग’ने सजवलेला केक आणला होता. अजिंक्यने ते टॉपिंग काढून केक कापला. कांगारू ऑस्ट्रेलियाच्या गौरवाचे प्रतीक असल्याने भारताच्या जेतेपदानंतरही प्रतिस्पर्धी संघाच्या राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान करणे अजिंक्यला रुचले नाही. ३८ वर्षांच्या अजिंक्यने ८५ कसोटी क्रिकेट सामन्यांत १२ शतकांसह पाच हजारांहून अधिक धावा केल्या.
संघातील काही अनुभवी खेळाडू जायबंदी असताना, नियमित कर्णधार कोहलीच्या अनुपस्थितीत आपल्यातील कुशल आणि प्रेरणादायी नेतृत्व त्याने सिद्ध केले. फलंदाज म्हणूनही त्याने छाप पाडली. तरीही अजिंक्यला कर्णधारपदासाठी बराच काळ ताटकळत ठेवले गेले. ‘सहा कसोटींत देशाचे नेतृत्व करताना अपराजित राहण्याची खणखणीत कामगिरी त्याने केली.
लॉर्ड्सवर पहिल्या दिवशी शतक करत अजिंक्यने जिगर आणि तंत्रशुद्धतेचे दर्शन घडवले; पण त्यावेळी वाहवा मिळाली ती अखेरच्या दिवशी सात विकेट टिपणाऱ्या ईशांत शर्मा याला! सन २०२१मध्ये मेलबर्नवर भारतीय संघ संकटात होता. त्या वेळी बदली कर्णधार अजिंक्यने शतक झळकावत मालिका बरोबरीत आणणाऱ्या विजयाची पायाभरणी केली. तरीही अजिंक्यने ऋषभ पंतला तिरंगा घेऊन विजयी मिरवणुकीचे नेतृत्व करण्यास सांगून स्वतः दुसरी रांग निवडली. चेतेश्वर पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेनेदेखील क्रिकेटचा निरोप घेतला. सरळ बॅटसह ‘व्ही’मध्ये खेळत डावाची उभारणी करणारे हे दोघे अखेरचे खेळाडू म्हणता येतील.

