Headlines

Ajinkya Rahane Retires: दुर्लक्षित रत्न – cap 278 signing off- ajinkya rahane announces retirement from all forms of cricket


Ajinkya Rahane Retires: आपल्या कारकिर्दीत बहुतांश काळ अजिंक्य हा विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या आधुनिक क्रिकेट नायकांच्या सावलीत खेळत राहिला. त्यामुळे भारतीय क्रिकेटमधील त्याच्या योगदानावर फारशी चर्चा झाली नाही.

ajinkya rahane2
ajinkya rahane(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
कोलाहली क्रिकेटच्या गलबल्यात, स्वतःची तान राखणाऱ्या उत्तम शास्त्रीय गायकाप्रमाणे स्वतःचा खेळ जपणाऱ्या अजिंक्य रहाणे याची निवृत्ती मनात कळ उठवणारी आहे. पाच वर्षांपूर्वी ‘तारांकित’ खेळाडूंच्या अनुपस्थितीत, उपलब्ध खेळाडूंना सोबत घेऊन अजिंक्य रहाणेने भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकून दिली.

बॉर्डर-गावसकर करंडकाच्या त्या ऐतिहासिक जेतेपदानंतर मुंबईतील निवासस्थानी त्याचे दणक्यात स्वागत झाले. त्याच्या सोसायटीतील सदस्यांनी कांगारूच्या आकाराच्या ‘टॉपिंग’ने सजवलेला केक आणला होता. अजिंक्यने ते टॉपिंग काढून केक कापला. कांगारू ऑस्ट्रेलियाच्या गौरवाचे प्रतीक असल्याने भारताच्या जेतेपदानंतरही प्रतिस्पर्धी संघाच्या राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान करणे अजिंक्यला रुचले नाही. ३८ वर्षांच्या अजिंक्यने ८५ कसोटी क्रिकेट सामन्यांत १२ शतकांसह पाच हजारांहून अधिक धावा केल्या.

संघातील काही अनुभवी खेळाडू जायबंदी असताना, नियमित कर्णधार कोहलीच्या अनुपस्थितीत आपल्यातील कुशल आणि प्रेरणादायी नेतृत्व त्याने सिद्ध केले. फलंदाज म्हणूनही त्याने छाप पाडली. तरीही अजिंक्यला कर्णधारपदासाठी बराच काळ ताटकळत ठेवले गेले. ‘सहा कसोटींत देशाचे नेतृत्व करताना अपराजित राहण्याची खणखणीत कामगिरी त्याने केली.

लॉर्ड्सवर पहिल्या दिवशी शतक करत अजिंक्यने जिगर आणि तंत्रशुद्धतेचे दर्शन घडवले; पण त्यावेळी वाहवा मिळाली ती अखेरच्या दिवशी सात विकेट टिपणाऱ्या ईशांत शर्मा याला! सन २०२१मध्ये मेलबर्नवर भारतीय संघ संकटात होता. त्या वेळी बदली कर्णधार अजिंक्यने शतक झळकावत मालिका बरोबरीत आणणाऱ्या विजयाची पायाभरणी केली. तरीही अजिंक्यने ऋषभ पंतला तिरंगा घेऊन विजयी मिरवणुकीचे नेतृत्व करण्यास सांगून स्वतः दुसरी रांग निवडली. चेतेश्वर पुजारापाठोपाठ अजिंक्य रहाणेनेदेखील क्रिकेटचा निरोप घेतला. सरळ बॅटसह ‘व्ही’मध्ये खेळत डावाची उभारणी करणारे हे दोघे अखेरचे खेळाडू म्हणता येतील.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा