एका मुलीला १०० रुपयांची लिली महाग वाटली, तेव्हा फुलवाल्याने तिला “स्वतः उगवा” असं सांगितलं.हे वाक्य मनाला लागल्याने तिने जिद्दीने लिलीचं रोप लावलं आणि घरीच सुंदर फूल फुलवलं. तिची ही मेहनत आणि निसर्गावरचं प्रेम सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं.

सोशल मीडिया पेज Elisneo Haokip वर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये ही गोष्ट दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये एका मुलीने फुलवाल्याला लिलीच्या फुलाची किंमत विचारली. फुलवाल्याने सांगितले की, एका लिलीच्या फुलाची किंमत १०० रुपये आहे. किंमत ऐकून मुलीला ते थोडं महाग वाटलं. तिने आश्चर्याने म्हटलं की, “इतकी महाग?” यावर फुलवाला सहज म्हणाला, “मग स्वतः उगवा.” फुलवाल्याचे हे शब्द कदाचित सहज बोलले गेले असतील, पण त्या मुलीने ते आव्हान म्हणून घेतले. तिला हे वाक्य मनाला लागले आणि तिने ठरवले की बाजारातून फूल विकत घेण्यापेक्षा आपण स्वतःच लिलीचे रोप लावायचे आणि ते फुलवायचे. तिने मेहनत घेतली, योग्य पद्धतीने रोपाची काळजी घेतली आणि काही काळानंतर तिच्या घरात सुंदर लिलीचे फूल उमलले.
ही गोष्ट आपल्याला सांगते की, एखादी गोष्ट विकत घेण्यापेक्षा ती स्वतः निर्माण करण्याचा आनंद वेगळाच असतो. झाडे आणि फुलांची काळजी घेणे ही केवळ एक आवड नाही, तर संयम आणि मेहनत शिकवणारी प्रक्रिया आहे. रोप लावल्यापासून ते फुल येईपर्यंत प्रत्येक टप्प्यात आनंद आणि उत्सुकता असते. (फोटो सौजन्य :- @elisneo_haokip, iStock)
लिलीचे रोप कसे लावावे? (How to plant lilies for beginners)
लिली हे सुंदर आणि आकर्षक फूल आहे. योग्य काळजी घेतली तर घरच्या घरी कुंडीतही लिलीचे रोप वाढवता येते. नवशिक्यांसाठी लिली लावण्याची सोपी पद्धत खाली दिली आहे.
योग्य कुंडी आणि माती निवडा
- लिलीच्या रोपासाठी पाणी न साचणारी कुंडी निवडावी. कुंडीच्या खाली पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र असणे आवश्यक आहे.
- माती भुसभुशीत आणि सुपीक असावी. बागेची माती
- कंपोस्ट खत
- वाळू किंवा कोकोपीट
- यांचे मिश्रण लिलीच्या वाढीसाठी चांगले ठरते.
कंद लावण्याची पद्धत
कुंडीत माती भरल्यानंतर लिलीचा कंद सुमारे २ ते ३ इंच खोल लावावा. कंदाचा टोकाचा भाग वरच्या दिशेने ठेवावा. त्यावर हलकी माती टाकावी आणि थोडे पाणी द्यावे.
सूर्यप्रकाश आवश्यक आहे
लिलीच्या रोपाला चांगल्या वाढीसाठी सकाळचा सूर्यप्रकाश मिळणे फायदेशीर असते. मात्र खूप कडक उन्हापासून रोपाचे संरक्षण करावे.
पाणी देण्याची योग्य पद्धत
लिलीला जास्त पाणी देणे टाळावे. माती थोडी कोरडी वाटली की पाणी द्यावे. सतत ओलसर माती राहिल्यास कंद खराब होऊ शकतो.
खत आणि काळजी
रोपाची वाढ चांगली होण्यासाठी वेळोवेळी सेंद्रिय खत किंवा कंपोस्ट खत द्यावे. झाडाची पाने पिवळी पडत असतील किंवा वाढ थांबत असेल तर माती आणि पाण्याची स्थिती तपासावी.

