पुणे — आजवर आपण चोरीच्या अनेक घटना वाचला असाल दागिने, मोबाईल, वाहनं किंवा महागड्या वस्तू चोरीला गेल्याच्या घडना घडल्या असतील.. पण तुम्ही कधी कोंबड्यांची चोरी एकलात का, पुण्याला शिक्षणाची पंढरी म्हणले जाते. आज त्याच शिक्षणाची पंढरीत कोंबड्या चोरीला गेल्या आहेत… ते पण एक दोन नव्हे तर तब्बल 800 जिवंत कोंबड्या जिवंत कोंबड्यांची चोरी झाल्याने पोलिसांसमोरही वेगळंच आव्हान उभं राहिलं आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मार्केटमधून तब्बल 800 जिवंत कोंबड्या चोरीला गेल्या आहेत. या कोंबड्यांची किंमत सुमारे एक लाख 60 हजार रुपये असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी लष्कर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फलटणहून कोंबड्या घेऊन एक टेम्पो पुण्यातील मार्केटमध्ये आला होता. चिकन विक्री करणाऱ्या विविध दुकानांना या सेंटरमधून कोंबड्यांचा पुरवठा केला जातो. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे टेम्पोमध्ये मोठ्या संख्येने कोंबड्या आणण्यात आल्या.
मार्केटमध्ये पोहोचल्यानंतर चालकाने टेम्पो पार्किंगमध्ये उभा केला आणि झोपण्यासाठी निघून गेला. मात्र, चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेतला. रात्रीच्या वेळी टेम्पोमधील तब्बल 800 जिवंत कोंबड्या चोरून नेण्यात आल्या.
सकाळी चालक पुन्हा टेम्पोजवळ आला आणि त्याने गाडीची पाहणी केली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कोंबड्या गायब असल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर संबंधितांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.
प्रत्येक कोंबडीची किंमत अंदाजे 200 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या चोरीमुळे सुमारे एक लाख 60 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
