Headlines

विरारच्या अर्नाळा बीचवर मोठी दुर्घटना:समुद्रात गेलेली 4 मुले बुडाली; 2 बेपत्ता; प्रशासनाची समुद्रात जाण्यास होती बंदी




विरारमधील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणांच्या अतिउत्साहामुळे एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलिसांचा स्पष्ट इशारा आणि बंदी आदेश धुडकावून समुद्रात पोहण्यासाठी गेलेली नालासोपारा येथील 4 अल्पवयीन मुले बुडाल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली. यापैकी 2 मुलांना वाचवण्यात पोलिसांना आणि होमगार्डना यश आले असून, बेपत्ता असलेल्या उर्वरित 2 मुलांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. पावसाळ्याच्या दिवसांत समुद्राला उधाण येत असल्याने आणि पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज येत नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाते. याच पार्श्वभूमीवर, विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी 30 सप्टेंबरपर्यंत पर्यटकांना समुद्राच्या पाण्यात उतरण्यास पोलिसांकडून सक्त मनाई करण्यात आली आहे. पर्यटकांना सावध करण्यासाठी अर्नाळा सागरी पोलिसांकडून किनाऱ्यावर ठिकठिकाणी धोक्याचे आणि बंदीचे फलकही लावण्यात आले आहेत. तरीही, पर्यटक या सूचनांकडे दुर्लक्ष करत असल्याने अशा जीवघेण्या दुर्घटना घडत आहेत. आतापर्यंत काय घडले? नालासोपारा पश्चिम भागात राहणारी 14 ते 17 वयोगटातील 4 अल्पवयीन मुले आज सकाळी अर्नाळा समुद्रकिनारी आली होती. सकाळी सुमारे 9.45 वाजता ही मुले समुद्रात उतरण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पोलीस अंमलदार, पुरुष होमगार्ड आणि महिला होमगार्ड यांनी त्यांना वेळीच हटकले आणि पाण्यात न जाण्याची सक्त ताकीद दिली. गस्त पथक सूचना देऊन पुढे जाताच, या मुलांनी पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा समुद्रात उडी घेतली. काही वेळातच पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. मुलांचा आवाज ऐकताच गस्त पथकातील पोलीस आणि होमगार्ड जवानांनी तातडीने धाव घेत जिवाची पर्वा न करता समुद्रात उड्या मारल्या. त्यांनी 2 मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, समुद्राच्या जोरदार लाटांमुळे उर्वरित 2 मुले खोल पाण्यात खेचली गेली. सध्या बेपत्ता असलेल्या 2 मुलांचा शोध घेण्यासाठी समुद्रात व्यापक मोहीम राबवली जात आहे. जीवरक्षक, स्थानिक सर्च क्लब, अग्निशमन दल आणि अर्नाळा पोलीस यांच्या संयुक्त पथकाकडून बोटींच्या साहाय्याने युद्धपातळीवर शोधकार्य (Search Operation) सुरू आहे. तसेच, वाचवण्यात आलेल्या 2 मुलांवर प्रथमोपचार करून त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू आहे. या दुर्घटनेमुळे नालासोपारा आणि विरार परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाची बंदी असतानाही मुले समुद्रात गेल्याने पालकांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अर्नाळा किनाऱ्यावरील गस्त आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत