आषाढाचा महिना सुरू आहे त्यामुळे अर्थातच कवी कालिदासाची आठवण येणे आणि त्या निमित्ताने मेघदूताच्या वळणावर मी पोचणेही तितकेच सयुक्तिक. ह्यावर्षी कितीतरी काळ जूनमध्ये महाराष्ट्राने पावसाची वाट पाहिली. माणसे तर पावसाची वाट पाहातच आहेत, पण झाडांकडे पाहिले की तीदेखील एखाद्या चातकाप्रमाणे आकाशाकडे फांद्या उंचावून पाहात आहेत असा भास होतो. पाऊस हा सृजनाचा ऋतू. उन्हाने मरगळल्या सृष्टीच्या प्रतिभेला नवसंजीवनी देणारा. पावसामुळे सृष्टीला जसा बहर येतो तसेच रणरणत्या उन्हाने तापलेल्या, भेगाळलेल्या जमिनीवरून पावसाच्या पहिल्या-वहिल्या काळ्याभोर ढगाचे दर्शन कवी प्रतिभेलाही बहर आणतो आणि कालिदासाचे अभिजात मेघदूतकाव्य सुरू होते ‘कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्त:’ रामगिरी पर्वतावर आपल्या प्रिय पत्नीशिवाय एकांतवासात राहणारा कुणी एक यक्ष पावसाच्या पहिल्या काळ्या ढगालाच आपला दूत मानून त्याच्यासोबत आपल्या प्रिय पत्नीला संदेश पाठवत आहे.
मेघदूत हे जितके अप्रतिम विरहकाव्य; तितकेच किंवा त्याहूनही अधिक सुंदर असे ते प्रवासवर्णन आहे. ढगाच्या भ्रमंतीसोबत देशातील विविध स्थळांचे वर्णन कालिदास करत जातो. उपमा, उत्प्रेक्षा, शब्द, अलंकार यांनी नटलेली शृंगारयुक्त भाषा हे कवी कालिदासाचे वैशिष्ट्यच, पण त्याहीपेक्षा पावसाचा मागोवा काढत केलेल्या प्रवासाची त्याची कल्पनाही सुंदर. पावसाचा माग काढत रामगिरीहून हिमालयापार कैलासाच्या शिखरापर्यंत केलेल्या प्रवासामुळे त्याकाळच्या भारताचा त्याने घेतलेला तो एक उभा छेद आहे का ? पावसासोबत प्रवास करण्याची अशीच कल्पना घेऊन ॲलेक्झांडर फ्रेटर हा ब्रिटिश पत्रकार त्रिवेंद्रमपासून चेरापुंजीपर्यंत पोहोचला होता. त्या प्रवासावर त्याने एक पुस्तक लिहीले, ‘चेसिंग दी मान्सून’! कवी कालिदासाने अलंकारिक, शृंगारिक भाषेत पत्नीच्या विरहाची कल्पना केंद्रित करून प्रवासकाव्य लिहिले.
फ्रेटरची भ्रमंती आधुनिक भारताची यात्रा करते. वर्तमानकाळात संपूर्ण भारतातील पावसासंबंधी माहिती, घडामोडी, पद्धती, परंपरा सांगत जाते. त्यामुळे पाऊस देशाच्या उंबरठ्यावर आला की जसा कालिदास आठवतो तसेच हमखास फ्रेटरचे ‘चेसिंग दी मान्सून’ही आठवते. दरवर्षी प्रकर्षाने वाटते, उठावे आणि पाऊस येताना फ्रेटरप्रमाणे केरळातल्या किनाऱ्यावर पावसाला सामोरे जावे व पावसामागोमाग किमान आपल्या घरापर्यंत तरी परत यावे!
कालिदास हा चौथ्या-पाचव्या शतकातला उज्जैनच्या विक्रमादित्य राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक महाकवी (असा अर्थात अंदाज). फ्रेटर आताच्या काळातला अभारतीय पत्रकार; पण मला वाटतं एकेका माणसाचा आत्माच प्रवासी असतो. कालिदासालाही असाच प्रवासाचा डंख असावा; म्हणून तर एकाहून एक सरस अशी काव्ये त्याच्या आतून येत गेली जी खरेतर प्रवासवर्णनेच म्हणावीत. कालिदासाचे ‘ ऋतुसंहार ’ वाचले म्हणण्यापेक्षा मणिपुरी नाट्यकर्मी रतन थिय्याम यांचे ‘ऋतुसंहार’ रंगमंचावर घडताना पाहिले होते. ‘प्रचण्डसूर्य: स्पृहणीयचन्द्रमा:’ कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’ची सुरुवात ग्रीष्मापासून होते. यात आहे ग्रीष्माचे तळपते दाहक ऊन आणि अती उष्ण वारा, वर्षेचा घनघन पाऊस. यात गच्च काळे ढग आहेत. नीलकांती मोर आहेत. शरदाचे मादक चांदणे आहे. हेमंताचे सोनसळी वैभव आहे, शिशिराची उदास पानगळ आहे आणि वसंताची उत्फुल्ल लाल-पोपटी पालवी आहे. स्त्री-पुरुष शारीर प्रेम हा तर कालिदासकाव्याचा गाभाच आहे, पण त्याहीपलीकडे जाणवते की ज्याने सृष्टी बारकाईने निरीक्षिली आहे असा प्रवासीच निसर्गाचे इतके सूक्ष्म वर्णन करू शकतो. नेमके तेच सूत्र पकडून रतन थिय्याम यांच्या ‘ऋतुसंहार’च्या प्रयोगात एक विदेशी कपडे घातलेला फिरस्ता माणूस संपूर्ण प्रयोगात वारंवार रंगमंचावर प्रकट होत होता. कालिदासाच्या काव्याइतकेच अप्रतिम रंग आणि प्रकाश मंचावर उधळत सहा ऋतूंचे विभ्रम साकारत गेले.
कालिदासाच्या ‘कुमारसंभवा’तही जरी शिव-पार्वती दांपत्याचा अतीप्रणय आणि कार्तिकेय जन्म व तारकासूर वध हा विषय असला तरी मजा म्हणजे याही काव्याची सुरुवात करताना तो म्हणतो, ‘अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा:।’ नमनाच्या कितीतरी चरणांत दिव्य, भव्य, रत्न आणि वन औषधींनी संपृक्त अशा हिमालयाचे आणि तिथल्या निसर्गाचे तो जे वर्णन करतो ते त्याने केलेल्या हिमालयपर्वतच्या प्रवासाचे वर्णन आहे असेच म्हणावे लागते.
मात्र प्रवासी म्हणून तो पूर्णपणे खुलतो मेघदूतात. यक्षाचे विरहगीत हे माझ्या मते निमित्तमात्र. पार्श्वसंगीताप्रमाणे त्या काव्याला प्रेमी युगुलाची विरहावस्था मागे ठेवून बाकी मेघदूतात आहे ते रामगिरी पर्वतापासून थेट हिमालयातील कैलासाच्या पायथ्यापर्यंतचे अलंकारिक प्रवासवर्णन. मेघदूतात मेघाच्या मार्गावर येणाऱ्या नद्या, पर्वत, पठारे, नगरे या साऱ्यांवर असणारे प्रेमच कालिदासाच्या शब्दांतून मुक्त होते. झरझर एखादे स्केच काढावे असे मेघदूतातून सांगितलेल्या रस्त्याचे चित्र काढत जावे तर काय दिसते? तो मेघाला सांगतो आहे की, ‘रामगिरीहून निघून तू माल नावाच्या पठारावर जाशील तेव्हा नुकत्याच पार पडलेल्या नांगरणीमुळे निर्माण झालेल्या उन्मादक मृदगंधाच्या मोहात पडू नकोस, पुढे जरा पश्चिमेकडे आंब्यांची खूप झाडे असल्यामुळे दिसणाऱ्या पिकलेल्या गरगरीत आम्रफळांवर आकृष्ट होऊन तू आम्रकूटावर (अमरकंटक पर्वतावर) विसावशील तर मध्ये सावळीशी गाठ असलेल्या पृथ्वीच्या गोऱ्यापान उरोजाची शोभा त्या पर्वताला प्राप्त होईल. आम्रकूटाहून पुढे गेलास की अंगावर वेलबुट्टी रेखलेल्या गजराजाप्रमाणे तुला विन्ध्य पर्वत दिसेल.
तिच्या पायथ्याशीच नर्मदा असेल, जिच्या पाण्याचा ओघ जांभळीच्या जाळ्यांमुळे अडकला असेल व तिथे रानहत्तीचा उग्र दर्प असेल. तिला ओलांडून पुढे गेलास की तुला दशार्ण देश लागेल जिची विदिशा नावाची विश्वविख्यात राजधानी आहे जेथील नागरिक विलासप्रिय आहेत. त्यांनी भोगलेल्या सुखांची चव तूही चाख. वेत्रवती(बेतवा) नदीवर उठणाऱ्या चंचल लहरींमुळे ती भुवया उडवून तुला आकृष्ट करते आहे, असा भास होईल; पण तू तिच्यात रेंगाळू नकोस. पुढे जाताना प्रवासात तुला गम्भीरा नदी लागेल. प्रसन्न अंत:करणाप्रमाणे तिचे पाणी निर्मळ आहे. त्यात तुझे स्वच्छ प्रतिबिंब दिसेल. वाटेवरील मृदगंधाच्या, फुलांच्या सुवासावर चौफेर उधळीत वारा तुला भगवान कार्तिकेयाचे अधिष्ठान असलेल्या देवगिरीवर नेईल.
काही अंतर चालून तू पुढे जाशील तर चर्मण्वती (चंबळ) नदीचे पाणी पिण्यासाठी तुला वाकावे लागेल. ती नदी ओलांडून तू दशपुरात पोहोचशील. पुढे ब्रम्हावर्त प्रदेशावर आपली सावली पसरवून तू कुरूक्षेत्राचे दर्शन घे. कुरूक्षेत्रानंतर तुला सरस्वती नदीचे दर्शन होईल. अजून पुढे जात राहिलास की तू कनखल क्षेत्रावर पोहोचशील. तिथे तुला जान्हवी(गंगा) नदीचे दर्शन होईल. त्या पवित्र गंगामातेच्या जन्मस्थळाकडे, हिमालय पर्वताकडे तू जाशील तेव्हा हिमालयाची शोभा व भगवान शंकराला वंदन करून पुढे गेल्यावर तुला हंसद्वार दिसेल. ते ओलांडून पुढे गेल्यावर हिमालयातील प्रसिद्ध कैलास शिखर तुला लागेल. त्यावरील मानससरोवरांत छान सुवर्णकमळे उगवलेली दिसतील. सरोवरातील थंड पाणी पिऊन तू आपली तृष्णा भागवून घे. हिमालयावर तऱ्हेतऱ्हेचे विलास करून शेवटी तुला अलकानगरीकडे, जिथे माझी प्राणप्रिय सखी आहे, तिथे तुला पोहोचायचे आहे.’
हे सारे प्रवासवर्णन नाही तर काय?
या संपूर्ण प्रवासादरम्यान तो मेघाला विदिशानंतर वाट वाकडी करून अवंती देशाची राजधानी असलेल्या उज्जयिनीला जायला सांगतो. खरंतर मध्येच हे वाट वाकडी करणे आहे. पण कालिदासाचे उज्जयिनीवर खास प्रेमच आहे. त्या शहराच्या वर्णनात तो इतका रमतो की मेघदूताबरोबर उज्जयिनी मनात घनिष्ट राहते. आठवते मला, भोपाळहून पहिल्यांदाच मी उज्जैनला एका मिटिंगसाठी जात होते. असेच पाऊस लांबल्याचे दिवस होते. मनात उज्जैन नगरीची ओढ होतीच. क्षिप्रा दिसताच कालिदास अधिकच आठवला. उज्जैनला त्यादिवशी माझा मुक्काम होता. मिटिंगरूमच्या बंद दाराआड विकासाच्या आकडेवारीविषयी गंभीर ‘अर्थ’पूर्ण चर्चेत असताना मिटींग संपता संपता पहिल्या पावसाच्या परिचित मातीचा गंध मांजराप्रमाणे पायांत लाडिक घोटाळला. मिटींगरूममधून बाहेर येऊन मी मोकळा श्वास घेतला. ‘चलो, अब महाकाल चलते है’ मला उज्जैन दाखवण्याची जबाबदारी अंगावर घेतलेला माणूस मला म्हणाला. कालिदास, क्षिप्रा, पाऊस, उज्जैन, महाकाल असे वर्तूळ अचानक पूर्ण झाले.
‘अर्थ’विचार काव्यविचार झाला.
उज्जैनच्या हॉटेलच्या रुममधल्या विशाल बाल्कनीत बसून रात्रीचे निलकाळोखे उज्जैन पाहता पाहता हातातला कालिदास मला सांगत होता, ‘सौंदर्याच्या व आनंदाच्या बाबतीत स्वर्गतुल्य असलेल्या उज्जैन नगरीतल्या महालांमध्ये तू खुशाल वास्तव्य कर. सुवासित फुलांचा गंध तिथे दरवळत असेल व लावण्यलतिकांच्या चरणावरील मेंदीचे ठसे तिथे ठिकठिकाणी उमटलेले असतील. त्या महालांच्या गच्चीवरून अवघ्या उज्जयिनीचे तुला निरीक्षण करता येईल’. मी मेघ नव्हते. पण शतकांनंतरची प्रवासी मात्र होते. आणि त्याच नगरीत होते जी कालिदासाला प्रिय होती. क्षितिजावर काळ्या ढगांची दाटी होती. आमच्यातली शतकं जोडली जात होती. पावसाला एव्हाना सुरुवात झाली होती.

