Headlines

मेळघाटात पेसा अंतर्गत ८० कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती पदस्थापना:जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पुढाकाराने प्रक्रिया पूर्ण




जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा येथील शाळांसाठी ‘पेसा’ कायद्यांतर्गत ८० कंत्राटी शिक्षकांची तात्पुरती भरती केली आहे. या पुढाकारामुळे मेळघाटासारख्या दुर्गम भागातील शिक्षणाचा स्तर सुधारण्यास मदत होणार आहे. ही पदस्थापना प्रक्रिया समुपदेशनाने आणि अत्यंत पारदर्शकपणे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. या प्रक्रियेत विज्ञान विषयातील दोन शिक्षकांसह भाषा विषयातील २५ शिक्षकांना नवीन ठिकाणी पदस्थापना मिळाली. तसेच, ५४ सहायक शिक्षकांपैकी ५३ जणांना नव्या जागांवर रुजू व्हावे लागणार असून, एका शिक्षकाला त्याच शाळेत जागा उपलब्ध असल्याने ‘जैसे थे’ ठेवण्यात आले. सामाजिक शास्त्र विषयातील एका उमेदवारास जागा रिक्त नसल्याने पदस्थापना देता आली नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली. पात्र उमेदवारांनी समुपदेशनाद्वारे आपल्या पसंतीच्या प्राथमिक शाळा स्वीकारून पदस्थापना प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. मागील वर्षीच्या पदस्थापनेच्या ठिकाणी संबंधित शाळांमध्ये पद रिक्त नसणे किंवा शिक्षकांची आवश्यकता नसल्याने अनेक कंत्राटी शिक्षक अतिरिक्त ठरले होते. त्यांच्यासाठी ही समुपदेशन प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. एकूण ८१ कंत्राटी शिक्षकांपैकी ८० उमेदवार या प्रक्रियेसाठी उपस्थित होते. सदर समुपदेशन आणि भरती प्रक्रियेदरम्यान अधीक्षक नरेंद्र गायकवाड, सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, विजय कविटकर, जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार यावले, वरिष्ठ सहाय्यक शरद चहाकार, कनिष्ठ सहाय्यक अनिकेत हुरडे, विश्वनाथ तपासे, परिचर युसुफ शहा, पंचायत समिती धारणी येथील विस्तार अधिकारी सुनील खडे, पंचायत समिती चिखलदरा येथील जावेद शेख बिराम तसेच केंद्रप्रमुख प्रशांत उंडे यांनी उपस्थित राहून प्रक्रिया पार पाडण्यास मदत केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत