Headlines

RTI Rules Maharashtra Stayed: उशिराचे शहाणपण – maharasthra cm devendra fadnavis stayed controversial amendments to right to information act


RTI Rules Maharashtra Stayed: संभाव्य परिणामांचा विचार न करता असे बदल सरधोपटपणे पुढे रेटण्याच्या प्रशासनाच्या धोरणांमुळेच हजारे आणि या क्षेत्रातील कार्यकर्त्यांची नाराजी सरकारला ओढवून घ्यावी लागली.

rre
RTI(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
माहिती अधिकार ाच्या चळवळीतील कार्यकर्त्यांकडून झालेला विरोध आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उपोषणाचा इशारा, यांमुळे राज्याच्या माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीतील जाचक बदलांवरून सरकारने माघार घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबाबत पुढाकार घेऊन माहिती आयुक्तांना हे बदल स्थगित करण्याची विनंती करावी लागली. मुळात असे बदल करण्यापूर्वीच या क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा करून पुढील पावले टाकली असती, तर हे सव्यापसव्य टळले असते.

राज्यात हा कायदा लागू होऊन अनेक वर्षे झाली, तरी त्यातील पारदर्शकता गोपनीयतेच्या कायद्यावर पोसल्या गेलेल्या नोकरशाहीच्या पचनी पडल्याचे दिसत नाही. त्यामुळेच त्यात शक्यतोवर आडकाठी आणण्याचा आटापिटा होताना सातत्याने दिसते. आता स्थगितीची घोषणा केलेल्या नियमावलीतील काही तरतुदी याच प्रयत्नांचा भाग होत्या. माहिती अधिकाराच्या प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र अर्ज करण्याचे बंधन त्यानुसार घालण्यात आले होते; तसेच प्रत्येक अर्जातील मजकुरासाठी दीडशे शब्दांची मर्यादाही होती. या अर्जासोबतच्या पूर्वीच्या दहा रुपयांच्या शुल्कात वाढ करून ते ३० रुपये, माहितीच्या प्रत्येक कागदाच्या प्रतीसाठी पाच रुपये आणि जागेवर निरीक्षण करण्यासाठी एका तासानंतर ताशी ५० रुपये अर्जदाराला मोजावे लागणार होते.

संकेतस्थळावर जाहीर केलेली माहिती अर्जाद्वारे मिळणार नाही, ही तरतूद वादग्रस्त ठरली. एकीकडे संकेतस्थळांवर माहिती जाहीर होत नाही आणि ‘तेथे जाहीर केली आहे,’ असे बोट दाखवून माहिती देण्याच्या जबाबदारीतून अलगद सुटण्याचा हा प्रयत्न होता. त्याबरोबरच माहिती मागताना ती सार्वजनिक हिताची असल्याबाबतचे प्रयोजन नमूद करण्याचे बंधनही अर्जदारांसाठी जाचक ठरले होते.

‘प्रक्रियेत सुधारणा’, ‘कायद्याचा दुरुपयोग रोखणे’ आणि ‘प्रशासकीय कार्यक्षमता’ या उद्देशांनी हे बदल करण्यात येणार होते! माहिती अधिकार अर्जांमुळे विविध खात्यांच्या कामकाजावर ताण असल्याचे काही अंशी मान्य केले, तरी स्वत:च अधिकाधिक माहिती सादर केल्यास हा ताण कमी होऊ शकतो; तसेच ‘ब्लॅकमेलिंग’च्या तक्रारी टाळण्यासाठी मुळातच ‘ब्लॅकमेल’ करता येईल, अशी कामे करावीच का, हा प्रश्नही गैरलागू नाही!

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा