Sachin Ahir: सुनील शिंदे हे अस्सल शिवसैनिकाचा लसावि आहेत. त्यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार झालेले अहिर यांना या मतदारसंघात धूळ चारली व नंतर कायम हा मतदारसंघ शिवसेनेकडे राखून ठेवला.

‘राज्यात ऑपरेशन टायगर सुरूच’ अशा बातम्यांनी वाहिन्या ओसंडून वाहू लागल्या होत्या. खरे तर विधानसभेतील उपाध्यक्षपद व विधान परिषदेतील उपसभापतिपद ही दोन्ही पदे विरोधी पक्षांच्या हातात असावीत, अशी प्रथा होती. मात्र सर्वच प्रथा व परंपरांपेक्षा राजकीय शक्ती महत्त्वाची हे काँग्रेस काळापासूनच ठरत गेल्याने व सत्ताही काँग्रेसी मार्गानेच राबवावी लागते, असा देशातील सर्वच राजकीय पक्षांचा समज झाल्याने आता त्याविषयी बोलण्यात काहीही अर्थ नाही. खरे तर एकनाथ शिंदे हे म्हणू शकतात, की उपसभापतिपद विरोधी पक्षाकडे असावे, या थोर प्रथेचेच मी पालनच केले आहे.
सभापती वा उपसभापती अधिकृतरीत्या कोणत्याही पक्षाचे राहत नाहीत. तसेच त्या पदावर हेत्वारोप वा टीकाही करता येत नाही. त्यांना व्हिपही लागू होत नाही. त्यामुळे संजय राऊत यांच्यापासून उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत फारसे कुणीच अहिर यांच्यावर बोलू शकणार नाहीत. यानंतर वरळी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार सुनील शिंदे यांची प्रतिक्रिया मात्र बोलकी आहे. ‘आमच्या नेतृत्वालाही काही गोष्टी समजायला हव्या होत्या,’ असे सुनील शिंदे म्हणाले आहेत.
वरळीतील घराघरांतील व्यक्तीस नावासह ओळखणाऱ्या सुनील शिंदे यांनी शिवसेनेच्या युवराजांना विधिमंडळात येण्यासाठी स्वतः बांधलेला हा मतदारसंघ तत्काळ सोडून दिला. मात्र त्यानंतर अहिरच ठाकरेंसोबत आले आणि उद्धव व आदित्य यांच्या सर्वांत जवळ गेले. ‘अहिर हे काल परवापर्यंत माझ्याजवळ होते,’ असे स्वतः आदित्यच उद्वेगाने प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीने शिवसेनेत(उबाठा) फूट पाडतात, या आरोपापेक्षा ठाकरे पिता-पुत्रांनी स्वतःच्या मालकीच्या पक्षातील कोणावर, किती व का विश्वास ठेवला जातोय, याचा विचार करण्याचीही गरज आहे.

