Headlines

Mumbai Rain Updates: मुंबईत पावसाचा हाहाकार; अंधेरी सबवे बंद, सखल भागात अडीच फुटांपर्यंत साचले पाणी!


मुंबई :महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले आहे.मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असून दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड आणि अंधेरीसह अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. अंधेरी सबवेमध्ये अडीच फुटांपर्यंत पाणी साचल्याने तो वाहतुकीसाठी बंद करावा लागला, तर वीरा देसाई रोड, गोरेगाव फिल्म सिटी रोड आणि संतोषनगर परिसरातील रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरीजवळ वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असून वरळी आणि चेंबूरमधील अनेक सखल भागही जलमय झाले आहेत..

संध्याकाळी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर घरी परतणाऱ्या लाखो चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली. पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर, मुलुंड ते ठाणे या मार्गावर मुसळधार पावसामुळे वाहतुकीचा वेग मंदावला आणि अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

वसई-विरार परिसरातही पावसाने कहर केला. वसईतील वाघराळ पाड्यात पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की तीन दुचाकी आणि दोन कार वाहून गेल्या. सुदैवाने एका कारचालकाने वेळेत बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क आणि तुळींज परिसरात पाणी साचल्याने अंतर्गत वाहतूक विस्कळीत झाली. कल्याणमध्ये एका शाळेत पाणी शिरल्याने विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून घरी सोडण्यात आले.

ठाणे शहरात अवघ्या आठ तासांत तब्बल 82.76 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुख्य बाजारपेठ, वंदना डेपो, मासुंदा तलाव परिसर आणि कोपरी भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दुपारच्या भरतीमुळे मुंब्रा परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आणि सततच्या पावसामुळे मुंब्रा-शीळ मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अनेक वाहने पाण्यात अडकून पडली.

नवी मुंबईत सानपाडा परिसरातील रस्त्यांनी नदीचे स्वरूप धारण केले. सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. रायगड जिल्ह्यातही पावसाची संततधार कायम असून माणगावजवळील मुगवली फाटा आणि ढालघर फाटा परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर पाणी आल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. मुंबईतील मरोल मिलिटरी रोड आणि जोगेश्वरी परिसरात मोठी झाडे कोसळून अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर पुण्यात बाजीराव रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक वळवावी लागली. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मान्सूनपूर्व झाडांची योग्य छाटणी न झाल्याचा आरोप करत नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उर्वरित विदर्भात यलो अलर्ट कायम ठेवण्यात आला असून पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत